Tuesday, 20 June 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 20.06.2017 6.50




Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 20 June 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  २० जून २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·       राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतीपदासाठी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी जाहीर

·       दूधाच्या खरेदी दरात तीन रुपयांनी वाढ; मात्र विक्री दरात कोणतीही वाढ नाही

·       दहावीच्या परीक्षेसाठी गणित हा विषय ऐच्छिक ठेवता येईल का - मुंबई उच्च न्यायालयाची शिक्षण मंडळांना विचारणा

आणि

·       बनावट नोटा छापून चलनात आणणाऱ्या दोघांना बीड इथं अटक; लातूर बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणी आरोपीची संख्या पाचवर

****

भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राष्ट्रपतीपदासाठी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काल नवी दिल्ली इथं भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी वार्ताहर परिषदेत कोविंद यांचं नाव जाहीर केलं. येत्या २३ जूनला कोविंद आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोविंद यांच्या उमेदवारीबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांना माहिती देण्यात आली असल्याचं, या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं.  तेलंगणा राष्ट्र समिती, तेगलु देसम पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तसंच लोक जन शक्ती पक्षानं कोविंद यांना समर्थन दिलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत समाधान व्यक्त करत, ही बाब बिहारसाठी अभिमानास्पद असल्याचं म्हटलं आहे.

मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्षानं मात्र, कोविंद यांच्या विरोधात विरोधी पक्षांचा एक उमेदवार उभा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांची येत्या २२ तारखेला बैठक होणार आहे. शिवसेना मात्र यासंदर्भात एक दोन दिवसांत निर्णय जाहीर करेल, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  

****

मतांचं राजकारण देशाला रसातळाला नेतं, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रपती पदासाठी आपण देशाचं, शेतकऱ्यांचं भलं करणाऱ्यांची नावं सुचवली होती, असं ठाकरे यावेळी म्हणाले. मध्यावधी निवडणुका झाल्या, तर शिवसेना विजय मिळवून दाखवेल, असं त्यांनी नमूद केलं. शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात शिवसेना पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं ठाकरे म्हणाले.

****

शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरण्यासाठी शेतकरी सुकाणू समिती आणि राज्य सरकारच्या मंत्री उच्चाधिकार समिती यांच्यात बैठकीची पहिली फेरी काल झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कर्जमाफीसाठी जमीन धारणेची मर्यादा नाही, पात्र शेतकऱ्याचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा सरकारचा प्रस्ताव असून, याबाबतचा निर्णय सर्वसहमतीनं होणार असल्याचं सांगितलं.

दरम्यान, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये तातडीच्या कर्जवाटपास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या २० जिल्ह्यात कर्जवाटप सुरू झाल्याची माहिती, सहकार खात्याकडून देण्यात आली.

****

दुधाच्या खरेदी दरात तीन रुपयांनी वाढ करण्याच्या निर्णयाला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. मात्र ग्राहकांचं हित लक्षात घेऊन, दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आता गायीच्या दुधाचा खरेदी दर, प्रतिलीटर २४ रुपयांवरून २७ रुपये, तर म्हशीच्या दुधाचा खरेदी दर, प्रतिलीटर ३३ रुपयांवरून ३६ रुपये करण्यात आला आहे.

****

केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्रानं विविध नऊ पुरस्कार पटकावले आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते काल दिल्लीत हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी सातारा जिल्ह्याला सुवर्णपदक प्रदान करण्यात आलं.

****

इयत्ता दहावीच्या परिक्षेसाठी गणित हा विषय ऐच्छिक ठेवता येईल का, अशी विचारणा, मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षण मंडळांना केली आहे. दहावी मध्ये गणित विषयात अनुत्तीर्ण झाल्यानं, शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. ज्यांना दहावी नंतर कला शाखेला, किंवा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना पुढे गणित विषयाची आवश्यकता नसेल तर तो ऐच्छिक ठेवता येईल का, अशा आशयाची एक याचिका मानसोपचार तज्ज्ञ, हरीश शेट्टी यांनी दाखल केली आहे. काल  या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं ही विचारणा केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -२०१७ येत्या २२ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी ३० जून पर्यंत आहे. या परीक्षेसंबंधी इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतील. गेले दोन दिवस या पालख्या पुण्यात मुक्कामी होत्या. शेगाव इथून निघालेली संत गजानन महाराजांची पालखी काल दुपारी अंबाजोगाई शहरात दाखल झाली. शहर परिसरातल्या भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज सकाळी पालखी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे

****

मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी मुंबईच्या सिद्धीविनायक गणपती मंदीर संस्थानतर्फे आठ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. काल या रकमेचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे सुपूर्द केला. या निधीतून विभागात प्रत्येक जिल्ह्यात एक कोटी रुपयांची कामं केली जाणार आहेत.

****

बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना, बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं पोलिसांनी काल अटक केली. शाहनवाज खान आणि भारत लबडे अशी या दोघांची नावं असून, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून त्यांच्याकडे दोन हजार, पाचशे, आणि शंभर रुपये मूल्याच्या सुमारे दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. या प्रकरणात मोठं रॅकेट असण्याची शंका व्यक्त केली जात आहे.


****

लातूर इथल्या बनावट दूरध्वनी केंद्र प्रकरणात आरोपीची संख्या पाच झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या पोलीसांनी गेल्या दोन दिवसांत हैद्राबाद, सोलापूर आणि लातूरात आणखी एका ठिकाणी छापा मारून तीन जणांना अटक केली, मात्र एक आरोपी फरार झाला. या तिघा आरोपींना न्यायालयानं २३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  या प्रकरणी दोन आरोपींना गेल्या शनिवारी अटक करण्यात आली होती.

****

औरंगाबाद शहर परिसरात काल सायंकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. परभणी शहर आणि परिसरातही काल रात्री पाऊस झाला. मराठवाड्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसामुळे विभागातल्या जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. नांदेडच्या विष्णुपुरी जलाशयात सध्या एकूण क्षमतेच्या १६ टक्के तर जायकवाडी धरणात १९ टक्के जलसाठा असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

****

लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे अशोक गोविंदपूरकर विजयी झाले आहेत. या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत गोविंदपूरकर आणि भारतीय जनता पक्षाचे नितीश वाघमारे यांना समान आठ मतं मिळाली, त्यानंतर चिठ्ठी काढून ही निवड करण्यात आली.

****

नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी संवर्धनासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा पर्यावरण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. नांदेड इथं आयोजित जिल्हा पर्यावरण समिती बैठकीत काल ते बोलत होते. वीटभट्यांसाठी लागणाऱ्या मातीचा उपसा नदीकाठावरुन होवू नये याबाबत कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

उद्या साजऱ्या होत असलेल्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरामध्ये आज योग दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सव्वासात वाजता क्रांती चौकातून ही दिंडी निघणार आहे.

****

औरंगाबाद शहराचं वैयक्तिक शौचालयं बांधण्याचं लक्ष्य पूर्ण व्हावं, या उद्देशानं शासकीय अनुदानाच्या रकमेत महापालिका प्रत्येकी तीन हजार रुपयांची भर घालणार आहे. शासकीय अनुदानातून मिळणाऱ्या १२ हजार रुपयांत शौचालयाचं बांधकाम शक्य नसल्याची बाब, अनेक लाभार्थींनी पालिका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर पालिकेनं हा निर्णय घेतला. त्यामुळे आता या योजनेसाठी औरंगाबाद शहरातल्या लाभार्थ्यांना १५ हजार रुपये मिळणार आहेत.

****


No comments: