Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16 June 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
थकबाकीदार शेतकऱ्यांना दहा
हजार रुपयांपर्यंत कर्ज तातडीनं उपलब्ध करुन देण्याचे राज्यसरकारचे बँकांना निर्देश
·
पेट्रोल - डिझेलच्या दरात कपात; यापुढे रोज सकाळी दर बदलणार
·
आषाढी वारीला आजपासून प्रारंभ; संत एकनाथ आणि संत
तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं आज प्रस्थान
·
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
आणि
·
चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात
परवा भारताची पाकिस्तान संघासोबत लढत
****
राज्यातल्या
थकबाकीदार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज तातडीनं उपलब्ध
करुन देण्याचे निर्देश जिल्हा मध्यवर्ती सहकारी तसंच व्यापारी बँकांना सरकारनं दिले
आहेत. या संबंधीचा शासन निर्णय सहकार विभागानं काल जारी केला. राज्यातले आजी-माजी लोकप्रतिनिधी,
मंत्री, सरकारी, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, आयकर
भरणाऱ्या व्यक्ती, सहकारी संस्थांचे संचालक यांना हे
दहा हजार रुपयांचं
तातडीचं कर्ज मिळणार नाही.
३०
जून २०१६ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या हमीवर हे कर्ज उपलब्ध होणार
आहे. या हमीच्या आधारे संबंधित बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांचं स्वतंत्र खातं उघडण्याच्या
सूचना सरकारनं दिल्या आहेत.
हे
कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेकडे एक साधा अर्ज सादर करावा लागेल, असं सहकार मंत्री
सुभाष देशमुख यांनी सांगितलं. राष्ट्रीयकृत बॅंकांकडे शेतकऱ्यांची पुरेशी माहिती नसल्यानं,
या योजनेसाठी जिल्हा बॅंकांची मदत घेतली जाणार आहे. या योजनेसंदर्भात शंकांचं निरसन करण्यासाठी १८०० २३ ३० २४४ ही हेल्पलाईन
सुरू करत असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं.
शासनाच्या
या निर्णयाची जिल्हा बँकांना कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी
करावीच लागेल असं महसूल मंत्री
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल कोल्हापूर इथं
बोलत होते. काही बँकांनी आर्थिक टंचाईचं कारण पुढं केल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील
यांनी
ही बाब स्पष्ट केली
****
राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ देणार नसल्याचं शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली नाही तर राजकीय भूकंप येईल, मात्र मध्यावधी
निवडणुका होऊ देणार नाही, असं ठाकरे यांनी
नमूद
केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत राहणार असल्याचं सांगत, कर्जमाफीसह शेतकऱ्यांना हमीभाव मिळायला हवा या मागणीचा ठाकरे यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
****
वीज महावितरण कंपनीनं नवप्रकाश
योजनेला ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडीत झालेल्या
कृषी ग्राहकांसह उच्च आणि लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी ही योजना आहे.
या योजनेत सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी ३१ ऑगस्ट पर्यंत थकबाकीची
मूळ रक्कम भरली, तर ५५ टक्के व्याज आणि विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ होईल, असं
महावितरणकडून सांगण्यात आलं आहे.
****
मुंबईतल्या आदर्श इमारत प्रकरणी माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला सुरू करण्यास
मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालय निर्देश देत नाही तोपर्यंत केंद्रीय
अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयात चव्हाण यांच्याविरोधात
खटला सुरू करू नये,
असे आदेश न्यायालयानं काल दिले.
****
निवृत्त सरन्यायाधीश प्रफुल्लचंद्र नटवरलाल उर्फ पी एन भगवती
यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. जनहित याचिकेचे प्रणेते
आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेतले मुख्य शिलेदार म्हणून न्यायमूर्ती भगवती
यांच्याकडे पाहिलं जातं. पद्मविभूषण सन्मानानं गौरवण्यात आलेले न्यायमूर्ती भगवती यांनी
१९८५ ते १९८६ या काळात सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
पेट्रोल
आणि डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर एक रुपया १२ पैशांनी तर डिझेल
एक रुपया २४ पैशांनी स्वस्त झालं आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर, आजपासून रोज सकाळी
बदलणार आहेत.
****
आषाढी
वारीला आजपासून प्रारंभ होत आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातल्या देहू इथून
पंढरपूरकडे प्रस्थान करेल. या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक वारकरी देहूत दाखल झाले आहेत.
पुणे जिल्हा प्रशासन तसंच संत तुकाराम महाराज संस्थाननं वारकऱ्यांसाठी
अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या शनिवारी आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
पैठण इथल्या संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज
आषाढीवारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. नाथवंशजांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे
यंदा एकनाथ महाराजांच्या दोन पालख्या दोन स्वतंत्र मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होणार
आहेत. दरम्यान संत नामदेव यांच्या
पालखीचं काल हिंगोली शहरात आगमन झालं. रामलीला मैदानावर भाविकांच्या उपस्थितीत काल
या पालखीचा पहिला रिंगण सोहळा झाला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात
आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.नांदेड जिल्ह्यात काल दुपारच्या सुमारास अर्धापूर, मालेगाव, वारंगा परिसरात
जोरदार पाऊस झाला, तर
नांदेड शहर परिसरात रात्री सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब
तसंच तुळजापूर परिसरात तर जालना जिल्ह्यात बदनापूर आणि परतूर भागात जोरदार पाऊस झाल्याचं
वृत्त आहे. परभणी शहर आणि जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. रात्री उशीरापर्यंत पावसाच्या
हलक्या सरी कोसळत होत्या.
बीड जिल्ह्यात काल सर्वत्र चांगला पाऊस झाला. बीड शहरात नाल्या तुंबल्यानं
अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं होतं. दरम्यान, जिल्ह्यात पावसाचं दमदार आगमन झाल्यानं सध्या पेरण्यांना वेग आला आहे. यंदा जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात
वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं वर्तवली आहे. मागच्या
रविवार पासून पेरणी केलेल्या शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
****
क्रिकेट - चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या परवा होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत, पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या
पाकिस्तान संघासोबत होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं बांग्लादेशचा
नऊ गडी राखून पराभव केला.
नाणेफेक जिंकून बांग्लादेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केलेल्या, भारतीय संघासमोर विजयासाठी
निर्धारित पन्नास षटकांत २६५ धावांचं लक्ष्य होतं, सलामीला आलेला शिखर धवन ४६ धावांवर बाद झाला, मात्र रोहित शर्माच्या तडाखेबाज १२३ आणि कर्णधार विराट कोहलीच्या ९६
धावांच्या बळावर भारतीय संघानं ४१ व्या
षटकांत हे लक्ष्य साध्य केलं.
****
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी
भारतीय क्रिकेट संघ काल जाहीर झाला. सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत
बुमराह यांना या संघातून वगळण्यात आलं आहे. त्यांच्या जागी ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment