Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 17 June 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जून २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
अभियंत्यांनी लष्करात नवनवीन
तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाचं रक्षण करावं, असं आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी
केलं आहे. पुणे इथल्या सैन्य अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात ते आज
बोलत होते. तंत्रज्ञान हे परिवर्तनाचं महत्वाचं माध्यम असल्याचं ते म्हणाले. सशस्त्र
दलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त
केली.
****
केंद्र सरकारनं घेतलेला विमुद्रीकरणाचा
निर्णय धाडसी आणि भ्रष्टाचाराला आळा घालणारा असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय
अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी
त्यांनी गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या कामांचा आणि विविध योजनांचा आढावा
घेतला. सरकारनं गरीब, महिला, आदीवासी यांच्यासाठी अनेक योजना आणल्या, तसंच देशात रोजगाराच्या
अनेक संधी निर्माण केल्या असल्याचं ते म्हणाले. भाजपच्या एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा
आरोप झाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. वस्तू आणि सेवा कर - जीएसटी भाजप सरकारचं मोठं
यश असल्याचं सांगून, महाराष्ट्राच्या विकासातही केंद्राची महत्वाची भुमिका असल्याचं
ते म्हणाले. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत शहा यांनी, एनडीएच्या उमेदवाराबाबत अद्याप
चर्चा सुरु असल्याचं सांगितलं. राज्यात मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर भाजप तयार असल्याचं
ते म्हणाले.
****
सरकारनं २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं
उद्दिष्ट ठेवलं असून, त्यासाठी सात कलमी कार्यक्रम तयार केला असल्याचं केंद्रीय मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. ते आज गुजरातमधल्या आणंद इथं एका कार्यक्रमात बोलत
होते. सिंचन क्षेत्र वाढवणं, दर्जेदार बियाणं उपलब्ध करुन देणं, तसंच शेतकऱ्यांचं नुकसान
टाळणं, आदी मुद्यांचा या कार्यक्रमात समावेश असल्याचं ते म्हणाले.
****
अर्थमंत्री अरुण जेटली उद्या
नवी दिल्ली इथं वस्तू आणि सेवा कर परिषदेची १७ वी बैठक घेणार आहेत. या बैठकीला सर्व
राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आधीच्या
बैठकीचा आढावा घेण्यात येणार असून, जी एस टी नियमांच्या मसूद्याला मंजूरी देण्यात येणार
आहे.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबरोबरच प्रधानमंत्री आवास
योजनेतही महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामविकास मंत्री
पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली. सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी सन २०१६-१७ मध्ये या योजनेंतर्गत,
संवर्गनिहाय उद्दिष्टाएवढी पाच हजार १२९ प्रकरणं मंजूर करुन त्यापैकी एक हजार ४१ घरं
सहा महिन्याच्या आत पूर्ण केली आहेत. यासाठी राज्य तसंच जिल्हा विकास यंत्रणेची पुरस्कारासाठी
निवड झाली आहे.
****
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर
गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज समीर
गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, त्यावेळी न्यायालयानं २५ हजार रूपयांच्या
जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास,
तसंच कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायला बंदी घातली आहे. त्याचबरोबर दर रविवारी तपास
यंत्रणांकडे हजेरी लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. समीर गायकवाडला १६ सप्टेंबर
२०१५ ला अटक केली होती.
****
आषाढी वारी कालपासून सुरु झाली असून, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीनं आज आळंदीहून पंढरपूरकडे
प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात वेगेवगळ्या मानाच्या दिंड्या आहेत. जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी आणि संत
एकनाथ महाराजांची पालखीही पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. वारकऱ्यांसाठी पुणे महानगेपालिकेनं
सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
****
अहमदनगरध्ये पोलिसांनी एक कोटी रुपयाचा
गांजा पकडला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करताना ही कारवाई केली.
औरंगाबादकडून नगरच्या दिशेनं जाणाऱ्या दोन कारमधून हा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी
पाच जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला आहे.
दरम्यान, पोलिसांना गांजा तस्करीचं
रॅकेट असल्याचा संशय असून, पुढील तपास सुरु आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू के श्रीकांत
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आज
झालेल्या उपान्त्य सामन्यात श्रीकांतनं दक्षिण कोरियाच्या वान हो सून चा पराभव केला.
तर दुसरीकडे एच एस प्रणयला मात्र उपान्त्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. जपानच्या
काझुमासा सकाईनं प्रणयचा २१-१७, २६-२८, १८-२१ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment