आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१५ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
देशाचा एकाहत्तरावा स्वातंत्र्यदिन
आज सर्वत्र साजरा होत आहे. आज सकाळी सर्व शासकीय कार्यालयं, शैक्षणिक संस्था तसंच सामाजिक
संघटनांच्यावतीनं ध्वजारोहण करून, राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र
मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
देशवासीयांना आणि परदेशात स्थायीक असणाऱ्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
दिल्या आहेत.
नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अर्जून
खोतकर यांच्या हस्ते,
तर
लातूर इथं,
जिल्हा
क्रीडा संकुलावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आलं.
****
लिंगभेद किंवा धर्मभेद न करणारा नवभारत निर्माण करण्याचं आवाहन, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. देशाच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ते काल बोलत होते.
नागरिक आणि सरकार यांच्यातल्या सशक्त भागीदारीच्या बळावर 'नवीन भारताची' ही उद्दिष्टं
आपण नक्कीच साध्य करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
उत्तर प्रदेशात गोरखपूर इथं
बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात बालकांच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार
आयोगानं उत्तर प्रदेश सरकारकडून अहवाल मागितला आहे. अहवाल सादर करण्यासाठी आयोगाने
उत्तर प्रदेश सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणी 'मानवी अधिकाराचे गंभीर
उल्लंघन' झाल्याचे मानत आयोगानं, पीडित कुटुंबीयांना सरकारकडून काय मदत पुरवण्यात आली,
याबाबतचा तपशीलही मागितला आहे.
****
मराठवाड्यात
सध्या दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश
देणार असल्याचं आश्वासन पालकमंञी रामदास कदम यांनी दिलं.
औरंगाबाद इथं
७१ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंञी रामदास कदम यांच्या
हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याच्या दुष्काळ परिस्थिती,कर्जमाफी
संदर्भात मुख्यमंञ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही
देखील त्यांनी यावेळी दिली.
पोलीस दलात उल्लेखनीय
कार्य करणारे अधिकारी कर्मचारी, तसंच विद्यार्थांचा सत्कार पालकमंञी कदम यांच्या हस्ते
यावेळी करण्यात आला. विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम,
महानगर पालिका आयुक्त डी.एम.मुगळीकर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यावेळी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment