Sunday, 6 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.05.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 5 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे  २०१ दुपारी १.०० वा.

****



 जम्मू काश्मीर मधल्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. यात हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या कमांडरचा समावेश आहे. या चकमकीत एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. बडीगाम गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जनावांनी आज पहाटे शोधमोहीम सुरु केली, त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. ही चकमक संपल्याचं जम्मू काश्मीरचे विशेष पोलिस महासंचालक एस पी वैद यांनी सांगितलं. 

****



 मुंबई - औरंगाबाद - नागपूर या शहरांना विशेष पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. जयपूर - दिल्ली - आग्रा त्रिकोणी पर्यटन सर्किटच्या धर्तीवर या शहरांचा टूरिस्ट सर्किट म्हणून विकास करण्यात येणार असल्याचं पर्यटन विभागाचे मुख्य सचिव विजय कुमार गौतम यांनी सांगितलं. ते पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यासंदर्भातला सविस्तर प्रकल्प अहवाल तीन महिन्यात पूर्ण होईल, असं ते म्हणाले. मुंबईहून पर्यटकांना औरंगाबादला वेरुळ अजिंठा लेण्यांसह, अहमदनगरचा किल्ला, शिर्डी, शनिशिंगणापूर ही स्थळं पाहता येतील, आणि तिथून नागपूरला जंगल सफारी करता येईल, असं या प्रकल्पात प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले. राज्यात पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीनं हा विचार करण्यात आल्याचं गौतम यांनी सांगितलं.

****



 ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. दाते यांच्या निधनानं मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारे एक श्रेष्ठ भावगीत गायक आपल्यातून निघून गेले, मराठी रसिकांमध्ये भावगीतं लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, त्यांचा श्रद्धांजली अर्पण केली. तर दाते यांच्या निधनानं मराठी भावसंगीताचा ‘शुक्रतारा’ आज निखळला. त्यांनी भावसंगीतांची परंपरा खऱ्या अर्थानं पुढे नेली, अशा शब्दात तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अरुण दाते यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. 

****



 महाराष्ट्र, तेलंगणा, तसंच आंध्र प्रदेश राज्यांनी गोदावरी नदीतून जलमार्गांचा विकास करण्यासाठी पुढे यावं असं आवाहन केंद्रीय परिवहन तसंच जलमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. हैदराबाद इथं ते बोलत होते. अशा योजनांना दोन हजार कोटी रुपयांचं प्राथमिक अर्थसहाय्य मंजूर केल्याची घोषणाही त्यांनी केली. गोदावरी नदीवर राष्ट्रीय जलमार्ग तसंच या मार्गाला कृष्णा नदीशी जोडण्याचा प्रस्ताव सादर करावा, या राज्यात जलमार्गाच्या विकासासाठी विशेष कंपनी स्थापन करावी आणि प्रत्येक राज्यांनी खर्चाच्या दहा टक्के रक्कम दयावी असंही ते म्हणाले.

****



 देशाच्या जडणघडणीत सहभाग असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी सुंदर इमारती बांधून अधिकाधिक स्मार्ट शहरं निर्माण करावी, असं आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केलं आहे. मुंबईत बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बांधकाम व्यावसायिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं एक खिडकी योजना सुरु केली असून महारेरा कायद्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्यानं बांधकाम क्षेत्रावरील त्यांचा विश्वास वाढला आहे असं राज्यपालांनी यावेळी नमूद केलं. २०२२ पर्यंत सर्वांना घरं देण्याचं सरकारचं स्वप्न असून, राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चार लाख घरं बांधली असून, २०१९ पर्यंत आणखी बारा लाख घरं तयार होणार असल्याच ते म्हणाले.

****



 ठाणे जिल्ह्यात नागरी नोंदणीच्या अहवालानुसार २०१७ मध्ये मुलींच्या जन्माचा दर ९२७ इतका नोंदवला गेला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी यांनी ही माहिती दिली. प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंधक कायदा - पी सी पी एन डी टी अंतर्गत जिल्ह्यात दक्षता समिती अस्तित्वात असून तिच्या नियमित बैठकाही होतात तसंच सोनोग्राफी केंद्राच्या धडक तपासणी मोहिमही राबवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 श्रीलंकेत कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ११ सुवर्ण, १० रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अर्शदीप सिंगनं, गोळाफेक स्पर्धेत महिलांच्या गटात किरण बलियानं, लांब उडीत लोकेश सत्यनाथन यानं, तर शंभर मीटर अडथळा शर्यतीत सपना कुमारीनं सुवर्णपदक पटकावलं. पंधराशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुर्गा देवरेला आणि फोर बाय हंड्रेड मीटर रिले शर्यतीत भारतीय पुरुष संघानं सुवर्णपदक पटकावलं. याच प्रकारात भारतीय महिलांच्या संघाला रौप्य पदक मिळालं. पुनिता रामस्वामी, अजय, कुणाल चौधरी, प्रज्वल रवी आणि अंकित रवी यांनी देखील आपापल्या क्रीडाप्रकारात सुवर्णपदकं पटकावली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...