Sunday, 6 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 06.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 6 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ६ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार लवकरच एक कायदा करणार आहे. तसंच सन्मान हत्या - ऑनर किलिंगच्या पार्श्वभूमीवर अशा जोडप्यांना संरक्षण देण्यावर भर देणार असल्याचं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगिलतं. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अशा जोडप्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो, त्यांना कशा प्रकारे संरक्षण देता येऊ शकतं, यावर या कायद्यात जास्त भर देणार असल्याचं बडोले यांनी सांगितलं. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार, सन्मान हत्येमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चौथ्या क्रमांकावर आहे.     

****

देशात गेल्या सहा वर्षात मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलं असून, महाराष्ट्रात याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं सरकारनं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. २०१७-१८ या वर्षात देशात तीन हजार तीनशे शेहेत्तर बालकांना दत्तक घेण्यात आलं, त्यात एक हजार ८५८ मुली असल्याचं या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे. मुलींना दत्तक घेण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचं बाल दत्तक संसाधन प्राधिकरणानं सांगितलं आहे. २०१७ मध्ये देशात ६४२ मुली दत्तक घेण्यात आल्या, त्यात ३५३ मुली महाराष्ट्रात दत्तक घेण्यात आल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा दत्तक संस्था अधिक असल्यानं दत्तक घेण्याचं प्रमाणही सर्वाधिक असल्याचं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितलं.

****

राज्य शासनाच्या आगामी वृक्ष लागवड कार्यक्रमात राज्यातल्या कंपन्या आणि उद्योजकांनी सहभागी व्हावं आणि कार्बन फुटप्रिंट कमी करण्यात योगदान द्यावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. मुंबई इथं आज उद्योजकांना १३ कोटी वृक्ष लागवडीची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत वृक्षलागवड करून मोकळ्या जागेच्या ३३ टक्के वृक्षाच्छादनाचा निकष कंपन्या पूर्णत्वाला नेऊ शकतात, असं ते म्हणाले. वृक्षलागवडीत कंपन्यांच्या मालकांनी स्वत:सह कामगारांनाही सहभागी करून घ्यावं, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी यावेळी केलं.

****

भारताचा अंदाजित एकूण देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर चालू आर्थिक वर्षासाठी सात टक्क्यांहून अधिक राहील, असं आशियाई विकास बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ यासुयुकी सावदा यांनी म्हटलं आहे. भारताचा सध्याचा विकास दर उत्तम असून, अशाच प्रकारे विकास होत राहीला तर येत्या दहा वर्षात भारतीय अर्थव्यवस्था दुपटीनं वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतानं आठ टक्के विकास दर गाठण्याऐवजी उत्पन्नातली असामनता कमी करण्यावर आणि देशांतर्गत मागण्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सावदा यांनी नमूद केलं.

****

लातूरमधला काँग्रेस पक्षाचा पराभव हा तात्पुरता असल्याचं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांनी म्हटलं आहे. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. लातूर महानगरपालिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या ३४ नगरसेवकांपैकी १२ नगरसेवक काँग्रेसमधूनच भाजपत गेले असल्याचं त्यांनी नमूद केलं. मनपा निवडणुकीसाठीही भाजपकडे स्वत:चे उमेदवार नसल्याचं सांगून, देशमुख यांनी भाजपवर टीका केली. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष लातूरमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   

****

परभणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून येत्या मंगळवारी आठ मे रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दुधना नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावं, तसंच शेतकऱ्यांनी आपली जनावरे, पशु नदीपात्रात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा उपसा विद्युत मोटारीद्वारे कोणत्याही गावकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रयोजनासाठी करु नये, असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

जालना जिल्ह्यात जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या एकशे शहेत्तर गावांसाठी ग्रीड पद्धतीची पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येणार असून, या योजनेची स्थापत्य कामं ५५ टक्के पूर्ण झाली असल्याचं पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. या योजनेची तांत्रिक तपासणी उद्यापासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी या पथकासोबत लोणीकर यांनी या कामाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेचा स्त्रोत निम्न दुधना प्रकल्प असून, यात परतूर तालुक्यातल्या ७३, मंठा तालुक्यातल्या ९५ आणि जालना तालुक्यातल्या आठ गावांचा समावेश आहे. 

****

राज्यात आजही तापमानात वाढ कायम आहे. येत्या दोन दिवसात विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 25.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...