Saturday, 2 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जून २०१ सकाळी .५० मि.

****



Ø राष्ट्रीय किसान महासंघाच्या घोषणेनुसार राज्यातले शेतकरी कालपासून दहा दिवस संपावर

Ø असंघटित क्षेत्रातल्या घरगुती कामगारांची नोंदणी न करणाऱ्या राज्यांना कोणतंही अनुदान देऊ नये - सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 

Ø एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ

आणि

Ø मराठवाड्याच्या बहुतांश भागात कालही पूर्वमोसमी पावसाची हजेरी

*****



 राष्ट्रीय किसान महासंघाच्या घोषणेनुसार राज्यातले शेतकरी कालपासून दहा दिवस संपावर गेले. संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.



 लातूर इथं किसान महासभेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शेतकरी संघटना, शेकाप आणि डाव्या पक्षाचे नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.



 अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबासह इतर ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी पुणतांबा इथं श्राद्ध करून सरकारचा निषेध केला. अकोले इथं शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मराठवाडयात औरंगाबाद सह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी  निदर्शनं केली.

 परभणीत पाथरी तहसील कार्यालयाला भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला.

****



 असंघटित क्षेत्रातल्या सामाजिक सुरक्षा अधिनियमांतर्गत घरगुती कामगारांची नोंदणी न करणाऱ्या राज्यांना कोणतंही अनुदान देऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या कामगारांची नोंदणी करण्याचे निर्देश या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच न्यायालयानं दिले होते, मात्र अनेक राज्यांमध्ये या निर्देशांचं अजूनही पालन होत नसल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांनी, आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करावा, असंही न्यायालयानं सांगितलं आहे.

****



 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशाच्या शहरी भागातल्या गरीबांसाठी आणखी दीड लाख घरं बांधण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. या घरांच्या बांधकामासाठी सात हजार २२७ कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून त्यापैकी दोन हजार २०९ कोटी रूपये गुंतवणुकीचा वाटा, केंद्र सरकार उचलणार आहे. या नव्या मंजुरीमुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधल्या जाणाऱ्या एकूण घरांची संख्या ४७ लाख ५२ हजारावर पोहोचणार आहे.

****



 घरगुती वापराच्या गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर ४८ रुपयांनी, तर अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत प्रति सिलिंडर दोन रुपये ३४ पैशांनी वाढ झाली आहे.

****



 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ करण्यात आली आहे. एसटीच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात समानीकरणाच्या दृष्टीनं महत्त्वाचे अनेक निर्णयही तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणि कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनाही, रावते यांनी काल जाहीर केली. सुमारे एक लाख ५ हजार ६७९ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

****



 राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या ४ जुलै पासून या अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ होईल. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.

****



 दिवंगत माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. फुंडकर यांचं परवा गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते.

****



 राज्यात काल अपघाताच्या चार घटनांमध्ये अठरा जणांचा मृत्यू झाला. यातले दोन अपघात यवतमाळ जिल्ह्यात झाले. आरणी तालुक्यातल्या कोसधनी घाटात काल पहाटे, ट्रक आणि कारची समोरासमोर धडक होऊन बारा जणांचा मृत्यू झाला. मृत सर्वजण पंजाब राज्यातून नांदेड इथं दर्शनासाठी जात असल्याचं समजतं.

 धामणगाव रस्त्यावर झालेल्या दुसऱ्या अपघातात एक महिला ठार झाली. ट्रक आणि मोटारसायकलच्या धडकेत, या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्यानं, मृत्यू झाला.



 अहमदनगर जिल्ह्यात ट्रक आणि आराम बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. काल पहाटे हा अपघात झाला.



 मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यात काल झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा ट्रक अनेक वाहनांना धडक देत कालव्यात कोसळून ट्रकमधल्या तिघांचा मृत्यू झाला.

****



 १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातल्या एका मुख्य आरोपीला काल दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं, गुजरातमध्ये वलसाड इथून अटक केली. अहमद शेख उर्फ अहमद लंबू  असं या आरोपीचं नाव असून, या साखळी स्फोटांसाठी स्फोटक पाठवण्यात त्याचा मोठा हात असल्याचं, एटीएसकडून सांगण्यात आलं.

*****



हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 एव्हरेस्टवीर मनीषा वाघमारे हिचं काल औरंगाबाद इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. शहरातून तिची मिरवणूक काढण्यात आली. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे एक लाख रुपयांचा धनादेश देऊन मनीषाचा सत्कार करण्यात आला. एव्हरेस्टनंतर आता अमेरिकेतलं डेनाली शिखर सर करण्याचं स्वप्न असल्याचं मनीषानं यावेळी सांगितलं. गेल्या २१ मे रोजी मनीषा वाघमारे हिनं एव्हरेस्ट शिखर सर केलं.

****



 मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद शहरात काल दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसानं नागरिकांचा तारांबळ उडाली. िल्ह्यात ंगापूर, खुलताबाद, कन्नडसह अनेक ठिकाणी तर फुलंब्री परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला. 



 जालना जिल्ह्यातही जालना तसंच अंबड तालुक्यात हलका पाऊस झाला. काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाले तसंच फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



हिंगोली जिल्ह्यातही सोसाट्याचा वारा आणि गारांसह पाऊस झाला. औंढा, सेनगाव, शिरड शहापूरसह अनेक भागात पावसानं हजेरी लावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 नांदेड जिल्ह्यातही कंधार, हदगाव, उमरी, मुदखेड, हिमायतनगर भागात काल जोरदार पाऊस झाला.



 उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा परिसरात झालेल्या पावसामुळे काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले, त्यामुळे अनेक गावांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला.

****



निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादीत जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा, या मागणीसाठी परभणी इथं काल शेतकऱ्यांनी जायकवाडी वसाहतीसमोर सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. निम्न दुधनाच्या कालव्यासाठी संबर, पिंपळगाव इथल्या ७६ शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या, मात्र वाढीव मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

****



 हमीभाव केंद्रांमार्फत हरभरा खरेदीच्या मागणीसाठी काल बीड जिल्ह्यात माजलगाव इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. माजलगाव बाजारसमितीत सुमारे १८ हजार क्विंटल हरभरा खरेदी झाला असून, जवळपास ३५ हजार क्विंटल हरभरा खरेदीविना पडून असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 शेतीतलं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांनी गट शेती आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी पत्रकार आदिनाथ चव्हाण यांनी केलं आहे. औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवण्यात येत असून, याअंतर्गत काल औरंगाबाद इथं खरीप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक एन.व्ही आवाळे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जे.आर खोकड, यांच्यासह कृषीतज्ज्ञांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीकाचं नियोजनाबाबत मार्गदर्शन केलं.  

****



 शेतकरी संपकाळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी सतर्कता बाळगावी असे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिले. चौधरी यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित यंत्रणासमवेत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्याबाबत  प्रत्येक दिवशीचा अहवाल मुख्य सचिव आणि गृह सचिवांना पाठवण्यात येणार असल्याचं चौधरी यांनी यावेळी  सांगितलं.

****



धुळे तालुक्यातल्या देवभाने धरणात अक्कलपाडा धरणातून आरक्षित पाणी सोडण्यात यावं, या मागणीसाठी काल मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने फाट्यावर शेतकरी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे सुमारे तासभर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.

*****

***

No comments: