Sunday, 3 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.06.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 June 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक  जून २०१ दुपारी १.०० वा.

****



 स्वदेशी बनावटीच्या आण्विक सक्षम असलेल्या अग्नि पाच या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची भारतानं आज यशस्वी चाचणी केली. ओडीशा मधल्या बालासोर इथं अब्दुल कलाम बेटावरुन सकाळी नऊ वाजून ४८ मिनिटांनी जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी मोबाईल लाँचरच्या माध्यमातून करण्यात आली. अग्नि पाच हे नवीन तंत्रज्ञानासह सुसज्ज असं क्षेपणास्त्र असून पाच हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची त्याची क्षमता असल्याचं संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं.

****



 जम्मू काश्मीरमधल्या अकनूर क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तानी सैन्यानं आज पहाटे शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यावेळी झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले, तर तीन नागरिक जखमी झाले. पाकिस्तानी सैनिकांनी या भागातल्या पोलिस चौक्यांना लक्ष्य करुन तोफांचा मारा केला. त्यानंतर बराच वेळ ही चकमक सुरू राहिल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं.

****



 प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण रोखण्याकटीबद्ध असल्याचं दाखवून देण्यासाठी विविध मार्ग आणि नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून जागतिक पटलावर एक उत्तम उदाहरण भारतानं सादर केल्याचं संयुक्त राष्ट्र संघानं म्हटलं आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्र कार्यक्रमांच्या दूरसंचार आणि माहिती विभागाचे संचालक नायसन साबा यांनी, भारत प्रदूषणाशी संबंधित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उत्तम प्रकारे सक्रीय असल्याचं सांगितलं. भारत संयुक्त राष्ट्रांच्या  पर्यावरण सभेतला एक जबाबदार सदस्य असल्याचंही ते म्हणाले.

****



 राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा अभ्यासक्रम अर्धा करण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोलकाता इथं ही माहिती दिली. शिक्षण व्यापक स्तरावर असावं, तसंच शिक्षणामुळे व्यक्तिच्या ज्ञान आणि आकलन क्षमतेचा उपयोग केला जातो, असं सांगत शिक्षणाचा खरा अर्थ केवळ पाठांतर करून प्रश्नपत्रिका सोडवणं नसून, अभ्यासाबरोबरच शारीरीक शिक्षण, नैतिक शिक्षण तसंच कौशल्यही आवश्यक आहे, असं जावडेकर म्हणाले.

****



 गेल्या चार वर्षात देशातलं कृषी उत्पादन वाढलं असल्याचं मत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते पाटणा इथं बोलत होते. २०१० ते २०१४ या कालावधीत देशाचं सरासरी कृषी उत्पादन २५ कोटी ५० लाख टन होतं, तर २०१७-१८ मध्ये ते २८ कोटी टनांवर पोहोचलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकरी कल्याणाच्या योजना राबवताना शेती उत्पादनापेक्षा शेतकऱ्यांची मिळत वाढावी यावर सरकारचा भर असल्याचं सिंग यांनी नमूद केलं.

****



 ग्रामीण डाक सेवक संघटनांनी २२ मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप आज तेराव्या दिवशीही सुरु आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला आहे. देशातल्या सुमारे एक लाख ३ हजार शाखा आणि दोन लाख ७० हजार ग्रामीण डाकसेवक सध्या बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातली डाकसेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. बुलडाणा इथं काल मुख्य टपाल कार्यालयासमोर ग्रामीण डाक सेवकांच्या वतीनं धरणं आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज परळी इथल्या गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंचक्रोशीतले नागरिक मुंडे यांच्या समाधीला आदरांजली अर्पण करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****



 धुळे तालुक्यातल्या वरखेडी गावच्या शिवारातल्या एका शेतात घरावर झाड कोसळल्यानं एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे हे झाड कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****



 पॅरिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि रॉजर वॅसलिन या जोडीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्यांनी मार्सेलो मेलो आणि लुकास कुबोत जोडीचा सहा - चार, सात - सहा असा पराभव केला. उपांत्य फेरीत आज बोपन्ना - वॅसलिन जोडीचा सामना अ‍ॅलेक्झांडर पेया आणि निकोला मॅक्टीक यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेत बोपन्ना हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

****



 सातव्या महिला आशिया कप क्रिकेट स्पर्धेत सहावेळा अजिंक्यपद पटकावणारा भारतीय महिला क्रिकेट संघ आज क्वालालंपूरमध्ये मलेशिया संघाशी खेळणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीत टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये सहा देशांचे संघ आठ दिवसांसाठी आयोजित या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्यासाठी खेळणार आहेत.

*****

***

No comments: