Monday, 4 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.06.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

४ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता

****  



 देशातल्या सर्व राज्यपाल आणि नायब राज्यपालांची दोन दिवसांची परिषद आजपासून नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन  इथं सुरू होत आहे. राष्‍ट्रपति रामनाथ कोविंद या परिषदेच्या अध्यक्ष्यस्थानी असून, त्यांच्या भाषणानं  या संमेलनाला  सुरुवात होईल, तर  दुसऱ्या सत्रात  केंद्र सरकारच्या प्रमुख योजना आणि त्यांची अंमलबजावणी या मुद्यांवर चर्चा होईल. स्वच्छ भारत अभियान, अंतर्गत सुरक्षा, उच्च शिक्षण आणि कौशल्य विकास हे मुद्दे या परिषदेत चर्चेत असतील. अशा प्रकारची  ही  ४९ वी  परिषद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या संमेलनात मार्गदर्शन कारणात आहेत.  नीति आयोगाचे  उपाध्‍यक्ष आणि  मुख्‍य कार्यकारी अधिकारी तसंच  राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागारही या परिषदेला उपस्थित राहणार असून ते  उपस्थितांना आपापल्या कामाची  माहिती देतील.

****



 दक्षिण आफ्रिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्याच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. पुढल्या  वर्षी जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या ब्रिक्स राष्ट्रांच्या वार्षिक शिखर संमेलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी ही  बैठक आयोजित करण्यात आली आहे. ब्रिक्स राष्ट्रांमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांचा समावेश आहे. दरम्यान, स्वराज यांनी काल दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांची भेट घेतली.

****



 पालघर इथं काल बुलेट ट्रेन विरोधी जनमंचाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार अमित घोडा, यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल आदी राजकीय पक्षांचे नेते, या व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्वांनी बुलेट ट्रेन विरोधातली आपापली भूमिका मांडली.

****



 परभणी जिल्ह्यात पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात काल पशू प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात ‘जाफराबादी शेरु’ हा बैल आणि महाद्या रेडा पाहण्यासाठी पशूपालकांनी गर्दी केली होती. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी उपस्थितांना प्रदर्शनातल्या पशूंबाबत माहिती दिली.

*****

***

No comments: