आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
६ जून २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी नमो ॲपच्या
माध्यमातून संवाद साधला. २०२२पर्यंत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला घर मिळावं, यासाठी
सरकार प्रतिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पंतप्रधान, स्टार्ट अप इंडियाच्या
माध्यमातून उद्योग सुरू करण्याऱ्या युवकांशीही आज संवाद साधत आहेत. नवीन उद्योग सुरू
करण्यासाठीच्या या आधीच्या जाचक अटी बदल्यामुळे युवकांना उद्योग सुरू करण्याची इच्छा
प्रत्यक्षात आणता येत आहे, असं सांगून, स्टार्ट अपचं जाळं देशभरात पसरलं असून, युवावर्ग
आता रोजगार मागणारा नाही, तर रोजगार देणारा होत आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी या युवकांची
प्रशंसा केली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या
कूपवाडा जिल्ह्यातल्या माछिल भागात सैन्यानं आज पहाटे केलेल्या कारवाईत तीन सशस्त्र
अतिरेकी ठार झाले. मोठ्या प्रमाणात शस्त्रं घेऊन हे अतिरेकी भारतीय सीमेच्या आत येण्याचा
प्रयत्न करत होते. या भागात सैन्याची शोध मोहीम सुरू असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं.
****
सिमि या विद्यार्थी
संघटनेच्या कारवायांविषयी केंद्र सरकारनं सगळ्या राज्यांकडून माहिती मागवली आहे. या
संघटनेवर बेकायदा कृत्य विरोधी कायद्यांतर्गत घातलेली बंदी पुढच्या वर्षीच्या ३१ जानेवारीला
संपत असून, ती कायम ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्रसरकारनं ही माहिती मागवली
आहे.
****
राज्य सरकारनं,
युनिसेफ ही जागतिक संघटना आणि ब्रिजस्टोन ही बहुराष्ट्रीय कंपनी यांच्यासह राज्यात
एक जलसंवर्धन आणि शुद्ध पेय जल योजना हाती घेतली आहे. ड्रॉप्स ऑफ होप, या नावाच्या
या योजनेत पुणे, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून, या
जिल्ह्यांमधली पेयजलाची सध्याची स्थिती जाणून घेऊन, नजिकच्या भविष्यात तिथे शुद्ध पेयजल
उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा हेतू आहे.
****
नैऋत्य मोसमी
पावसाचं उद्या, मुंबई, गोवा आणि राज्याच्या काही भागात आगमन होईल, अशी अपेक्षा आहे.
मॉन्सूनचं आगमन झाल्याच्या पुढच्या चोवीस तासात या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
असल्याचंही हवामानखात्याच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment