Thursday, 7 June 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.06.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 June 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जून २०१ सकाळी .५० मि.

****



Ø बस प्रवासी भाड्यात १५ जूनपासून १८ टक्के वाढ करण्याचा राज्य परीवहन महामंडळाचा निर्णय

Ø ऊस उत्पादकांची थकित देणी देण्यासाठी, साखर कारखान्यांना ८ हजार ५०० कोटीं रूपयांचं पॅकेज

Ø रेपो दरात पाव टक्क्यांची वाढ;  गृह आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात वाढ होण्याची शक्यता

आणि

Ø रायगडावरच्या चेंगराचेंगरीत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या रहिवाशाचा मृत्यू



*****



 सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात येत्या १५ जूनपासून १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीवहन -एस.टी. महामंडळानं काल दिली. डिझेलचे वाढते दर तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं महामंडळानं म्हटलं आहे. याबरोबरच सुट्या पैशावरून होणारे वाद टाळण्यासाठी यापुढे तिकीटाची भाडे आकारणी पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.



 दरम्यान, इंधन दरवाढीमुळे महामंडळाचा जवळपास ४६० कोटी रूपयांचा तर कर्मचारी वेतनवाढीमुळे चार हजार ८४९ कोटी रूपयांचा वार्षिक खर्च वाढला आहे, त्यामुळे महामंडळानं तिकीट दरात ३० टक्के दरवाढ करण्याचं प्रस्तावित केलं होतं, मात्र प्रवाशांवर अधिक आर्थिक भार पडू नये म्हणून सरकानं केवळ १८ टक्के दरवाढ करण्यास मान्यता दिली. डिझेल करमाफी झाल्यास या निर्णयात बदल होऊ शकतो, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं.

****



 साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांची थकित देणी देता यावीत, यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळानं साखर कारखान्यांसाठीच्या ८ हजार ५०० कोटीं रूपयांच्या पॅकेजला काल मान्यता दिली असल्याचं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं.  याबरोबच कारखान्यांना तीस लाख टन साखरेचा बफर स्टॉक ठेवता येणार असून, इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं, कमी व्याजदरानं कर्जं उपलब्ध करून देण्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं. ऊस उत्पादकांना त्यांचे थकित पैसे मिळावेत यासाठी मागच्या महिन्यात सरकारनं सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी दिली होती.



 देशभरातल्या सुमारे तीन लाख सात हजार ग्रामीण टपाल सेवकांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सरासरी छप्पन्न टक्के वाढ करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.

****



 चालू आर्थिक वर्षातलं दुसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना, भारतीय रिझर्व्ह बँकेनं, काल रेपो दरामध्ये पाव टक्क्यांची वाढ केल्यामुळे हा दर आता सहा पूर्णांक २५ शतांश टक्के, इतका झाला आहे, तर रिव्हर्स रेपो दर सहा टक्के इतका झाला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के इतका राहण्याचा, तर महागाई दर चार पूर्णांक आठ ते चार पूर्णांक नऊ टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. रेपो दर वाढल्यामुळं गृहकर्ज तसंच वाहन कर्जाच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

****



 ‘संपर्क फॉर समर्थन’ या अभियानाअंतर्गत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र ही चर्चा बंद दाराआड झाल्यानं चर्चेचा नेमका तपशील समजू शकला नाही.

 दरम्यान, शहा यांनी काल उद्योगपती रतन टाटा तसंच अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचीही भेट घेतली.

****



 पुण्यात झालेली एल्गार परिषद तसंच भीमा कोरेगाव इथं झालेल्या दंगलीच्या प्रकरणी पुणे पोलिसांनी काल मुंबई, नागपूर आणि दिल्ली इथून माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांना अटक केली. यामध्ये रिपब्लीकन दलित पँथरचे सुधीर ढवळे, माओवादींचे आरोपपत्र घेणारे ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, महेश राउत आणि दिल्लीतील निवृत्त प्राध्यापक सोमा सेना यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात पुणे पोलिसांनी यापैकी काहींच्या घरावर छापे घातले होते, त्यात मिळालेली कागदपत्रं आणि माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 शंभर टक्के प्लास्टिक बंदी करणाऱ्या राज्यातल्या महानगर पालिकेस २५ लाख, नगर परिषदेस १५ लाख तर सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीस १० लाख रुपयांचे पारितोषिक पर्यावरण दिनी देण्यात येईल, अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. ते काल मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात बोलत होते. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांवर बंदी आणण्याबाबत गांभिर्यानं विचार सुरु असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. 

****



 निवृत्त जिल्हा न्यायाधीश ईक्बाल बोहरी आणि सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक झाली आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना काल पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

****



 राज्यात हमी भावानं कापूस, तूर, हरभरा तसंच अन्य कडधान्यं आणि तृणधान्यं खरेदीसाठी गोदामांची जिल्हानिहाय उपब्धता, साठवण क्षमता तपासून राज्यात गोदामांचं जाळं निर्माण करण्यात येणार असल्याचं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. मुंबईत एका बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यामुळं जिल्हानिहाय उपलब्ध गोदामं, त्यातील एकूण साठवण क्षमता तसंच उपलब्ध  क्षमता याची माहिती तात्काळ मिळेल असंही देशमुख म्हणाले.

****



 रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर गड उतरताना झालेल्या चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. अशोक उंबरे असं मयत व्यक्तीचं नाव असून, तो उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असल्याचं आमच्या रायगडच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं काल हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.



 त्याआधी या सोहळ्यासाठी छत्रपती खासदार संभाजी राजे, छत्रपती शहाजी राजे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातून हजारो शिवभक्त गडावर उपस्थित होते. छत्रपतींच्या हस्ते उत्सवमूर्तीचं पूजन करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या मेघडंबरीतल्या मूर्तीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णाभिषेक करण्यात आला.

****



 उस्मानाबाद  जिल्ह्यात यावर्षी मृद सर्वेक्षण कार्यालयानं २६४ गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या मातीचं परीक्षण करून त्यांना मार्गदर्शन केलं आहे. यामुळे पीक लागवड करतांना या शेतकऱ्यांना या माहितीचा लाभ होणार आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर …



उस्मानाबाद  जिल्ह्या मृद सर्वेक्षण आणि मृद ससरणी कार्यालयानं सनं 2017-18 या वर्षांत जिल्ह्यातल्या 264 गावातल्या 29 हजार 876 शेतजमिनी माती नमुन्याचं परिक्षण केलं आहे. यात आर्यन, झिंन्क, सलफर, बोरॉन, मॅग्रेशियम ही सुक्ष्म मुलद्रव्याची कमतरता आढळून आली आहे. 1 लाख 91 हजार 159 शेतजमिन आरोग्य पत्रिका मधून शेतकऱ्यांना शेन खताचा वापर वाढवण्यासह गंधक, झिंन्क तसंच निंम्ब कोटेड युरियाचा वापर वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून जिल्ह्याचा सुपीकता निर्देशांक वाढण्यास मदत होणार आहे.

                  ----  देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहार, उस्मानाबाद.

****



 आजपासून मृग नक्षत्राला प्रारंभ होत आहे. भारतीय हवामान खात्यानं आजपासून पुढील सहा दिवस राज्यात विशेषतः कोकणात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची  शक्यता वर्तविली आहे. त्याअनुषंगानं प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



 दरम्यान, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. आज पहाटे नांदेड शहर तसंच उस्मानाबाद शहर आणि परिसरात पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असून, शेतीच्या मशागतीच्या तयारीला लागला आहे.

****



 केंद्रीय सामाजिक न्याय, आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल हिंगोली इथं ६२६ दिव्यांगाना वेगवेगळ्या प्रकारच्या १ हजार १० उपकरणांचं वाटप करण्यात आलं. दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता शासनामार्फत विविध योजना,आणि  उपक्रम राबवण्यात येत असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं.

****



 मराठवाड्यातल्या विकास कामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी दिली आहे. औंढा नागनाथ इथल्या वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि नवीन नगर पंचायत योजने अंतर्गत विविध कामांच्या भूमीपुजनप्रसंगी ते बोलत होते. औंढा गावाच्या विकासासाठी १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत - नांदेड रस्त्यावर चंदगव्हाण शिवारात बस आणि दुचाकीचा अपघात होऊन, दोन जण जागीच ठार झाले, तर तिसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात नेत असताना, मृत्यू झाला.

****



 हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं विस्कळीत वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ काल शिवसेनेच्या वतीनं उपविभागीय विजवितरण कंपनीच्या कार्यालयात निद्रा आंदोलन करण्यात आलं.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...