Friday, 1 June 2018

Text - AIR News Bulletin, Aurangbad 01.06.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 1 June 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ जून २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

नागरिकांना उत्तम सेवा, सुशासन प्रदान करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सिंगापूर इथल्या नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठात ते आज विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. सामान्य माणसाला तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी आपलं सरकार अनेक उपाययोजना राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं. तंत्रज्ञान हे स्वस्त, वापरण्याजोगं असलं पाहिजे, नैतिकता आणि मानवी मूल्यांची सांगड घातलेलं तंत्रज्ञान हे मानवजातीसाठी योग्य असेल, असं त्यांनी यावेळी नमूद केलं.   

****

बिहारमधल्या बोधगया इथं २०१३ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पाटणा इथल्या विशेष न्यायालयानं इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महाबोधी मंदिराच्या परिसरात सात जुलै २०१३ मध्ये नऊ बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये पाच जण जखमी झाले होते.

****

केंद्र सरकारचा बेटी बचाओ बेटी पढाओ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम देशात सर्वाधिक यशस्वी ठरल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

****

राष्ट्रीय किसान महासंघाच्या घोषणेनुसार राज्यातले शेतकरी आजपासून दहा दिवस संपावर गेले आहेत. संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफी, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. लातूर इथं किसान महासभेच्या वतीनं तहसिल कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. शेतकरी संघटना, शेकाप आणि डाव्या पक्षाचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबासह इतर ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकऱ्यांनी पुणतांबा इथं श्राद्ध करून निषेध केला. अकोले इथं शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

****

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री गिरीश महाजन, सदाभाऊ खोत यांनी यावेळी फुंडकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादीत जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा, या मागणीसाठी परभणी इथं आज शेतकऱ्यांनी जायकवाडी वसाहतीसमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करुन २५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. निम्न दुधनाच्या कालव्यासाठी संबर, पिंपळगाव इथल्या शहॅत्तर शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या, मात्र वाढीव मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.

****

शेतीतलं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतकऱ्यांनी गट शेती आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी क्षेत्रातल्या दैनिकाचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केलं आहे. औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान राबवण्यात येत असून, याअंतर्गत आज औरंगाबाद इथं खरीप मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक एन.व्ही आवाळे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जे.आर खोकड, कृषीतज्ज्ञ डॉ. संजय पाटील, डॉ. के. के. झाडे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीकाचं नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन केलं.  

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड खर्डा रस्त्यावर शिऊर फटा इथं ट्रक आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, काहींची प्रकृती गंभीर आहे.

****

धुळे तालुक्यातल्या देवभाने धरणात अक्कलपाडा धरणातून आरक्षीत पाणी सोडण्यात यावं, या मागणीसाठी आज मुंबई-आग्रा महामार्गावर देवभाने फाट्यावर शेतकरी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे सुमारे तासभर महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.

****

औरंगाबाद शहरात आज दुपारच्या सुमारास पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली. जालना जिल्ह्यातही सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. सेवली परिसरात काही वेळ हलका पाऊस झाला. जिल्ह्यातल्या काही भागात वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाल्यानं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या ४ जुलै पासून या अधिवेशनाला नागपूर इथं प्रारंभ होईल. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 20 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...