Monday, 6 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.08.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

६ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची तरतूद करणारं विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत हे विधेयक सादर करतील. लोकसभेनं गेल्या आठवड्यात हे विधेयक मंजूर केलं. सर्व राजकीय पक्षांनी या विधेयकाच्या बाजुनं मतदान करण्याचं आवाहन गहलोत यांनी केलं आहे. फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक आणि केंद्रीय होमिओपॅथी परिषद दुरुस्ती विधेयकही आज राज्यसभेत सादर होण्याची अपेक्षा आहे. लोकसभेत आज अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. 

****



 जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. काल रात्री सोमाग इथल्या जंगलात शोधमोहीमेदरम्यान त्याला पकडण्यात आलं. हा दहशतवादी कंडाहार लोलाब परिसरात हत्यारं हिसकावून घेतल्याच्या घटनेनंतर फरार होता, असं पोलिसांनी सांगितलं.

****



 जपान मधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याला आज ७३ वर्ष पूर्ण झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सहा ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेनं जपानमधल्या हिरोशिमा शहरावर तर ९ ऑगस्ट १९४५ रोजी नागासाकी शहरावर अणुबॉम्ब हल्ला केला होता. या हल्ल्यातल्या मृतांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

****



 इंडोनेशियाच्या लोम्बोक बेटावर काल झालेल्या भूकंपात ८२ जणांचा बळी गेला  असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. सात रिश्टर क्षमतेच्या या भूकंपाचे धक्के शेजारच्या बाली बेटावरही जाणवले.

****



 औरंगाबाद शहरातल्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून औरंगाबाद महानगरपालिकेला पहिल्या टप्प्यात १६ कोटी सहा लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्रसरकारकडून एकूण ३२ कोटी १२ लाख ८२ हजार रुपये निधी मिळणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...