Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 7 August 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा.
****
बिहारमधल्या मुजफ्फरपूर बालिकाश्रम शोषण प्रकरणाचा मुद्दा
आज संसदेच्या दोन्ही सदनात गाजला. राज्यसभेत आम आदमी पक्ष तसंच समाजवादी पक्षाच्या
सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली, या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदनाचं
कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं. लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकाजुर्न खरगे यांच्यासह
विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
त्याला उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
यांनी मुजफ्फरपूर बालिकाआश्रम शोषण प्रकरणी तपासासाठी राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव
तसंच अतिरिक्त पोलिस महासंचालकांची समिती नियुक्त करण्यात आली असल्याचं सांगितलं. या
प्रकरणी संबंधित आश्रमाच्या संचालक आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली असल्याचंही गृहमंत्र्यांनी
सांगितलं. मात्र गृहमंत्र्यांच्या या उत्तरानं समाधान न झालेल्या सदस्यांनी घोषणाबाजी
करत, सभात्याग केला.
****
सोलापूरचे खासदार शरद बनसोड यांनी, पंढरपूर इथं भाविकांना
पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणं सुलभ व्हावं, यासाठी दररोज नियमित रेल्वेगाडी सोडण्याची
मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या मन की बात मधून नागरिकांना पंढरपूरला
येण्याचं आवाहन केलं होतं, या कडे त्यांनी लक्ष वेधलं.
उस्मानाबादचे
खासदार रवींद्र गायकवाड यांनी, कृषी कर्जासाठी येणाऱ्या अडचणींकडे सदनाचं लक्ष वेधलं.
राष्ट्रीयकृत बँकांनी कर्जवितरण सुलभ करावं, अशी मागणी त्यांनी केली.
****
जम्मू काश्मीरमधल्या गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय सैन्यानं
आज दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत सैन्यदलाच्या
अधिकाऱ्यासह चार सैनिकांना वीरमरण आलं. या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेल्याचं वृत्त
आहे.
****
एयरसेल मॅक्सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, माजी
केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ति चिदंबरम यांना दिल्लीच्या
विशेष न्यायालयानं अटकेपासून दिलेल्या संरक्षणाची मुदत वाढवली आहे. केंद्रीय अन्वेषण
विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायालयानं चिदंबरम पितापुत्रांना
आठ ऑक्टोबर पर्यंत अटके पासून संरक्षण दिलं आहे. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्रिपदाच्या
कार्यकाळादरम्यान २००६ साली आयएनएक्स मीडिया आणि एयरसेल मॅक्सिस प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार
केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
****
न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी, न्यायमूर्ती विनित सरन
आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ
घेतली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या
न्यायमूर्तींची संख्या आता २५ झाली आहे.
****
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेनं कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या
विविध मागण्यांसाठी आजपासून तीन दिवस संप पुकारला आहे. औरंगाबाद जिल्हा महसूल कर्मचारी
संघटना या संपात सहभागी झाली असून, महसूल विभागातलं कामकाज ठप्प झालं आहे. जालना इथंही
कर्मचारी निदर्शनं करत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद इथं राज्य
कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात
येत आहे. जिल्ह्यातले २५ हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
****
अपघातात
अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढणाऱ्या गिर्यारोहकांचा गट विमा असणं ही अत्यंत आवश्यक
असून, येणाऱ्या काळात विविध विमा कंपनीशी चर्चा करुन गिर्यारोहकांचा गट विमा करण्याला
प्राधान्य देण्यात येईल, असं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत
एका कार्यक्रमात बोलत होते. आपत्कालीन परिस्थितीत जेव्हा हे गिर्यारोहक बचतकार्यासाठी
जात असतात तेव्हा त्यांच्य्याकडे अत्याधुनिक सामुग्री असणं आवश्यक आहे, येणाऱ्या काळात
२० जिल्हयातल्या गिर्यारोहकांना क्रीडा विभागामार्फत अत्याधुनिक सामुग्री देण्याचा,
तसंच त्यांना पोलीसांमार्फत ओळखपत्र देण्याचा प्रयत्न असल्याचं, असं तावडे यांनी सांगितलं.
****
रायगड जिल्ह्यात पोलादपूरनजिक आंबेनळी घाटात झालेल्या
बस अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत यांच्यासह या अपघाताची सखोल चौकशी कऱण्यात येणार
असल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस प्रमुख अनिल पारस्कर यांनी दिली. या प्रकरणी
पोलादपूर ठाण्याचे पोलीस निरिक्षकांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
२८ जुलै रोजी आंबेनळी घाटात बस ६०० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोपोलीच्या
कृषी विद्यापीठातल्या ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यात वाचलेले एकमेव प्रवासी प्रकाश
सावंत हेच बस चालवत होते असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment