Sunday, 23 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०१दुपारी १.०० वा.

****



 राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करणाऱ्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीचा भागीदार म्हणून रिलायन्स कंपनीची निवड करण्यात भारत आणि फ्रान्स दोन्ही देशांचा सहभाग नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. या कंपनीनंच मेक इन इंडिया मोहिमेत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीची निवड केली असून, याबात फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी केलेल्या विधानाचं फ्रान्स सरकारनं खंडन केलं असल्याचं जेटली यांनी फेसबुकवरच्या संदेशात सांगितलं. भारतीय भागीदाराची निवड करण्याचं फ्रेंच कंपन्यांना स्वातंत्र्य असतं, असंही फ्रान्स सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे. भारत आणि फ्रान्स सरकारांमध्ये ३६ राफेल लढाऊ विमानांबाबत झालेला करार हा विमानांचा दर्जा आणि वितरण या संबंधातला असल्याचं यात म्हटलं आहे.

****



जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक अज्ञात दहशतवादी मारला गेला. आज सकाळी ही चकमक झाली. या परिसरात आणखी दोन दहशतवादी असण्याची शक्यता असून, शोध मोहीम सुरु आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झारखंडमधल्या रांची इथं प्रधानमंत्री आयुष्यमान भारत -जन आरोग्ययोजनेचं उद्घाटन होणार आहे. देशातल्या ५० कोटी जनतेला लाभ देणारी ही जगातली सर्वात मोठी सरकारी विमा योजना असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात होत आहे.

****



 चित्रपट निर्मात्या, दिगदर्शक कल्पना लाजमी यांचं आज सकाळी मुंबई इथं कर्करोगानं निधन झालं, त्या ६१ वर्षांच्या होत्या. एक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. स्त्रियांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या लाजमी यांनी, रुदाली, एकपल, चिंगारी, दमन यांसारख्या उत्तमोत्तम कलाकृतींचं दिग्दर्शन केलं होतं. १९७८ मध्ये लघुपटापासून त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली होती.

****



 भारतीय सेना कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, असं लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे. १९१८ मध्ये भारतीय जवानांनी इस्त्रायल मधल्या हाइफा शहर मुक्त केल्याला शंभर वर्षं पूर्ण झाल्याबद्दल काल जयपूर इथं आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारचं परराष्ट्र धोरण स्पष्ट असून, दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरु राहू शकत नाही. पाकिस्ताननं भारताविरुद्ध केल्या जाणाऱ्या कारवायांना पायबंद घातला पाहिजे, असंही लष्कर प्रमुख म्हणाले.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवाव्यात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****



 आज अनंत चतुर्दशी. दहा दिवसांच्या उत्सवानंतर गणपतीचं आज विसर्जन होत आहे. औरंगाबाद शहरातल्या संस्थान गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, घरगुती तसंच सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचंही विसर्जन सुरु झालं आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा परिषद मैदान, शिवाजी नगर, टी व्ही सेंटर, भावसिंगपुरा, हर्सुल, चिकलठाणा, मुकुंदवाडी, संतोषी माता नगर, सातारा देवळाई, जालान नगर, ज्योती नगर अशा १३ ठिकाणच्या विहिरींमध्ये महापालिकेतर्फे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे.

****



 औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास रस्त्यावर सतत होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी जड वाहनांना लागू करण्यात आलेल्या प्रवेशबंदीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी याबाबतची स्वतंत्र अधिसूचना नुकतीच जारी केली. या मार्गावर सकाळी आठ ते ११ आणि सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत जड वाहनांना आजपर्यंत प्रवेशबंदी होती, आता ही मुदत ३० तारखेपर्यंत वाढवली आहे. 

****



 ‘स्वच्छता ही सेवा’ या सध्या देशभर सुरू असलेल्या विशेष अभियानाच्या पार्श्वभूमीवर उद्या नांदेड इथं स्वच्छता जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही रॅली उद्या सकाळी नऊ वाजता शहरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून निघणार आहे. कार्यशाळेनं रॅलीचा समारोप होणार असून, या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेनं केलं आहे.

****



 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर गटात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत गेल्या बुधवारी अ गटात झालेल्या लढतीत भारतानं पाकिस्तानचा आठ गडी राखून दणदणीत पराभव केला. आज दुसरा सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघात होणार आहे.

*****

***

No comments: