Tuesday, 25 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०१दुपारी १.०० वा.

****



 राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी एखादा लोकप्रतिनिधी फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरण्यापूर्वी त्याला निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. मात्र, अशा लोकप्रतिनिधींना रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं आहे. न्यायालय संसदेच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही, मात्र उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरच्या गुन्ह्यांची माहिती ठळक शब्दात द्यावी, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीची माध्यमांमध्ये जाहिरात द्यावी, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किमान तीन वेळा वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे आणि मगच निवडणूक लढवावी, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.  राजकारणातल्या भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरणामुळे लोकशाहीच्या मुळावर घाव घातला जात असल्याचं मतही न्यायालयानं व्यक्त केलं आहे.

****



 देशभरातल्या न्यायालयांमध्ये खासदार, आमदार आणि विधानपरिषदेच्या सदस्यांना वकील म्हणून काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.  खासदार आणि आमदार आपली वकीली कायम ठेऊ शकतात, असा निर्णय न्यायालयानं दिला आहे. भाजपाचे नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी लोकप्रतिनिधींना वकील म्हणून काम करण्याची बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. न्यायालयानं या जनहित याचिकेवरचा निर्णय नऊ जुलै रोजी राखून ठेवला होता. भारतीय विधिज्ञ परिषद - बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमात लोकप्रतिनिधींना वकीली करता येत नाही, असा कोणताही नियम नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****



 स्वच्छता ही सेवा पंधरवड्या अंतर्गत आज देशभरात अंत्योदय दिन साजरा केला जात आहे. दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी अंत्योदय दिन आयोजित केला जातो. अंत्योदय दिनादरम्यान प्रत्येक स्वच्छाग्रहीला स्वच्छाग्रहींचा गट तयार करायला सांगितलं जाणार आहे. प्रत्येक गटानं आपलं गाव उघड्यावर शौचापासून मुक्त करण्याच्या दिशेनं काम करण्याचे निर्देश पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं दिले आहेत. आतापर्यंत २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश उघड्यावर शौचापासून मुक्त घोषित करण्यात आले आहेत.



 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. ते एकात्मिक मानवता आणि अंत्योदयचे प्रणेते होते, असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****



 प्रधानमंत्री जनआरोग्य योजना लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी एक हजार लोकांना या योजेचा लाभ झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या रांची इथून या योजनेची सुरुवात केली होती. ही जगातली सर्वात मोठी सरकारी आरोग्य वीमा योजना असून, याचा लाभ १० कोटी कुटुंबांना होणार आहे.

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचं वितरण करणार आहेत. यात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारोत्तोलक मीराबाई चानु यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. भालाफेकपटू निरज चोप्रा, ॲथलीट हीमा दास आणि हॉकीपटू मनप्रीत सिंह यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. 

****



 अर्थव्यवस्थेंत दहा हजार कोटी रुपयांची तरलता आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक येत्या गुरुवारी खुल्या बाजार परिचालनाच्या माध्यमातून शासकीय रोख्यांची खरेदी करणार आहे. देशातल्या रोकड उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर येत्या २७ तारखेला खुल्या सरकारी रोख्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं रिझर्व्ह बँकेनं काल मुंबईत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****



 ऊर्जा संरक्षण योजना कामगिरी उपलब्धी आणि व्यापार या पीएटीच्या पहिल्या टप्प्यातल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ऊर्जा बचत ३० टक्क्यांनी जास्त असून, ८० लाख सदूसष्ठ हजार टन तेलाइतकी आहे, असं केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांन म्हटलं आहे. पहिल्या टप्प्यात देशातल्या प्रमुख ऊर्जा क्षेत्रातल्या चारशे पेक्षा अधिक मोठ्या उद्योगांनी गेल्या तीन वर्षात ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या, त्यामुळे वार्षिक साडेनऊ हजार कोटी रुपयांची ऊर्जा बचत झाली असल्याचं ते म्हणाले.

****



 दुबई इथं सुरु असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. बांगलादेश आणि पाकिस्तान संघातही आज सामना होणार असून, या सामन्यातल्या विजेत्या संघासोबत भारताची अंतिम फेरीत लढत होणार आहे.

*****

***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 16 August 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छ...