Wednesday, 26 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६  ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 सर्वोच्च न्यायालयात आज अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणी निकाल अपेक्षित आहेत. यात आधारची संवैधानिक वैधता, न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण, तसंच अनुसूचित जाती आणि जमातींच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षणाचा लाभ देणं, या प्रकरणांचा समावेश आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या आमदार किंवा खासदाराचा गुन्हा सिद्ध झाल्यास न्यायालयाच्या प्रतिबंधानंतरही संसद किंवा विधानसभेत त्याला सदस्यत्व बहाल केलं जावं का, याबाबतही आज न्यायालय निकाल सुनावेल, अशी शक्यता आहे.

****



 मराठा, बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रामाणिक आणि गांभीऱ्यानं प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे इथं काल दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८५ व्या जयंती निमित्त माथाडी भूषण पुरस्कार सोहळा आणि मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील तसंच उपाध्यक्ष संजय पवार यांच्या पदांना अनुक्रमे कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा दर्जा देत असल्याची घोषणा केली.

****



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनुसुचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसह फ्रीशिपचे ऑनलाईन भरलेले आणि महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असे अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार असल्याचं समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांतर्फे सांगण्यात आलं आहे. उद्या २७ सप्टेंबरपासून सहा ऑक्टोबर पर्यंत प्रलंबित पात्र आणि परिपूर्ण अर्जासह बी स्टेटमेंट ऑनलाईन सादर न केल्यास सदर प्रलंबित अर्ज रद्दबातल ठरणार आहेत.

****



 जालना इथं, औरंगाबाद रस्त्यावर एका वाहनांच्या दुकानाला काल रात्री आग लागून अनेक चारचाकी वाहनं जळाल्यानं, मोठं नुकसान झालं. आगीचे नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही.

****



 सर्व बँकर्सनी मुद्रा अंतर्गतची कर्ज प्रकरणं तत्काळ मंजूर करण्याची सूचना खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केली आहे. जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत काल ते बोलत होते.

*****

***

No comments: