Saturday, 29 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



vकेरळमधल्या शबरीमाला अयप्पा मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

vनक्षलवाद्यांशी संबंधांच्या संशयावरून पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

vराज्यसरकारचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर

vअखिल भारतीय व्यापारी संघाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद

आणि

vचुरशीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत, भारतानं आशिया चषक जिंकला

****



 केरळमधल्या शबरीमाला अयप्पा मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं काल हा निर्णय देताना, शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश न देणं हा लिंग भेद असून, हिंदू महिलांच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं, तसंच महिलांना प्रवेशबंदी ही अनिवार्य प्रथा नसल्याचं म्हटलं आहे.  न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे या मंदिराची ८०० वर्षाची परंपरा आता मोडीत निघणार असून, देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

****



 नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास विशेष पथकामार्फत करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठानं दोन विरूद्ध एक या मतानं या दोन्ही मागण्या फेटाळल्या. या पाच जणांच्या नजरकैदेत चार आठवड्यांची वाढ करण्याचे आदेशही न्यायालयाननं दिले आहेत. 

     

 सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या प्रकरणात पोलिस योग्य दिशेनं तपास करत असल्याचं म्हटलं आहे.



 दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पोलिसांनी सादर केलले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित असून, यासंदर्भात आणखी पुरावे सादर करुन अटक केलेल्या पाच जणांचा ताबा घेऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले. देशविरोधी षडयंत्र रचणारे, तसंच समाजात तेढ निर्माण करणारे नक्कीच गजाआड जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****



 राज्य सरकारतर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 पोषण अभियानाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी या अभियानास चळवळीचं रुप मिळणं आवश्यक असून, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं, महिला आणि बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला, मुंबईत काल या उपक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवभारताच्या निर्माणासाठी कुपोषणाचं समूळ उच्चाटन आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यकमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ४८ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 ऑनलाईन कंपन्यांद्वारे चालणाऱ्या खरेदी विक्री विरोधात अखिल भारतीय व्यापारी संघाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला काल संमिश्र प्रतिसाद दिसून आला. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठा बहुतांशी बंद होत्या,

लातूर इथंही व्यापाऱ्यांनी बंद पाळून शहरातून मूक मोर्चा काढला.



 ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनीही काल स्वतंत्र बंद पुकारला होता. उस्मानाबाद इथं या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं.



 जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथं औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. परभणी जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. हिंगोली जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे.



रत्नागिरी, सिंधुदुर्ग अमरावती, वाशिम, भंडारा, सोलापूर जिल्ह्यातही व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 भारतानं आशिया चषक सातव्यांदा जिंकला आहे. दुबई इथं झालेल्या स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला. बांग्लादेशानं भारतासमोर  विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक ५५ चेंडूत ४८ धावा केल्या, केदार जाधवनं अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बांगलादेशचा १२१ धावा करणारा लिंटन दास सामनावीर तर शिखर धवन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****



 केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल कुटुंबांनी मिळालेल्या अनुदानातून शौचालय बांधलं आहे. जिल्ह्यातील डुंगी पाडा इथं राहणाऱ्या पिंकी खरपडे यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.



मी पिंकी खरपडे, भिंगीपाडा-पालघर येथे राहते.  आम्हाला मोदी सरकारतर्फे स्वच्छता गृह बाधून दिले. स्वच्छ भारत अभियाना तर्फे म्हणून त्यांचे धन्यवाद. आणि येथे स्वच्छता गृह बाधून दिल्यामुळे आम्हाला खूप चांगलं झालं. पहिलं बाहेर जावं लागायचं पाऊसात, जंगलात असं, आता हि योजना बांधल्यामुळे घरात स्वच्छता गृह आले. खूप म्हणजे चांगली सुविधा घेतली.

****



 प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांच्या पर्थिव देहावर काल सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाजन यांचं परवा रात्री अल्पशा आजारानं निधन झालं, त्या ५१ वर्षांच्या होत्या. कविता महाजन यांच्या निधनानं मराठी साहित्यात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित करणारी एक महत्त्वाची लेखिका आणि समाज जीवनावरच्या प्रभावी भाष्यकार आपण गमावल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****



 परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थापन उका उच्चस्तरीय समितीनं काल जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती, त्या पार्श्वभूमीवर शासनानं या समितीची स्थापना केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीनंतर ही समिती आपला अहवाल सादर करेल.

****



 लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभा संगम’ या सतराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काल ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, घोडेस्वार लक्ष वेधून घेत होते. शहरातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, प्राध्यापक, साहित्यिक यात सहभागी झाले होते. महापौर सुरेश पवार, मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके, उपमहापौर देवीदास काळे यावेळी उपस्थित होते. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज होणार आहे. 

****



 जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा- भोगाव रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला काल सकाळी अपघात झाला. या अपघातात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कृषी पंपांची थकीत वसुली थांबवावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँगेस पक्षानं जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला काल टाळं ठोकलं. जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीनं करण्यात आलेली  तीन हजार रूपयांची वसुली थांबवावी आणि वीज वितरण कंपनीनं या संदर्भात  काढलेलं परिपत्रक मागं घ्यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या असं आमच्या वार्ताहरानं  कळवलं आहे.

****



 व्यभिचारासंबधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे समाजातली नैतिकता ढळेल आणि व्यभिचार वाढेल असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजीया खान यांनी काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केलं. व्यभिचार हा गुन्हा नाही तर तिन तलाक हा गुन्हा कसा? या एम आय एमच्या खासदार ओवेसी यांच्या  भूमिकेचं त्यांनी यावेळी समर्थन केलं.

****



 कोट्यवधींच्या वाहन घोटाळ्याप्रकरणी बीड प्रादेशिक परिवहन कार्यालयातल्या दोन अधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे अशी या दोघांची नावं असून, सय्यद शकीर नावाच्या एजंटलाही अटक करण्यात आली आहे.

****



 भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबादचे प्रदेश सरचिटणीस तसंच आमदार सुजीत सिंह ठाकुर यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. ७ जुलै २०२२ पर्यंत ही नियुक्ती करण्यात आहे.

*****

***

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 16 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 16 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...