Monday, 4 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.02.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04 February 2019

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ फेब्रुवारी  २०१ सकाळी ७.१० मि.

****



v       ‘राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान - रुसाच्या ’ दुसऱ्या टप्प्याला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

v मागण्या मान्य न केल्यास पद्मभूषण परत करणार- अण्णा हजारे यांचा सरकारला इशारा

v जालना इथं जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण

आणि

v न्यूझीलंडसोबतच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत पाचवा सामना जिंकत भारताचा 4-1 नं मालिकाविजय

****



  ‘राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान - रुसाच्या ’ दुसऱ्या टप्प्याला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  श्रीनगर इथून डिजिटल अनावरणाच्या माध्यमातून प्रारंभ झाला. या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे दोनशे महाविद्यालयांसह जवळपास एक लाख विद्यार्थी डिजिटल माध्यमातून तर, दोन कोटी पस्तीस लाख विद्यार्थी सामाजिक संकेतस्थळांद्वारे सहभागी झाले होते. रुसा अंतर्गत सत्तर नवीन शासकीय आदर्श पदवी महाविद्यालय, व्यावसायिक कला महाविद्यालय, एक महिला विद्यापीठ, साठहून अधिक नवकल्पनांच्या उद्योगांचं उद्घाटन करण्यात आलं. यात राज्यातल्या २५ राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान प्रकल्पांचं पंतप्रधानांनी यावेळी अनावरण केलं. मुंबईत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह आमदार राज पुरोहित या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****



 ग्रामीण रोजगाराला चालना देण्यासाठी आणि अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रात संरचनात्मक बदल करण्याची आवश्यकता असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबाद इथं एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. कृषी पद्धतीत विविधता आणायची तसंच उत्पादना नंतरच्या तंत्रज्ञानात सुधारणा करून उत्पादनाचं विक्री मूल्य वाढवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

****



 ेत्या आठ तारखेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत, तर पद्मभूषण पुरस्कार परत करणार असल्याचा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिला आहे. अण्णा यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल राळेगणसिद्धी इथल्या ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं.



 विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी काल राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला, तसंच प्रकृतीच्या कारणास्तव उपोषण सोडण्याची विनंती केली. भ्रष्टाचार विरोधी लोकपाल आंदोलनाचा राजकीय लाभ घेऊन सत्तेवर आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हजारे यांना विसरल्याचा आरोपही विखेपाटील यांनी केला.



 दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगण सिद्धी इथं अण्णांची भेट घेऊन, मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं. आपल्या जवळपास सर्व मागण्या केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आल्या असल्यानं, उपोषण मागे घ्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रातून केलं आहे. हजारे यांचा उपोषणाचा काल पाचवा दिवस होता. दरम्यान, आज पुन्हा आपण अण्णा हजारे यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

****



 मुख्यमंत्री आज जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जालना इथं सुरू असलेल्या पशूपक्षी प्रदर्शनाचा आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरणही होणार आहे.

****



 मराठा आरक्षण प्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ आणि देशाचे माजी महान्यायवादी मुकुल रोहतगी हे उच्च न्यायालयात शासनाची बाजू मांडणार आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. रोहतगी यांच्या नियुक्तीचे आदेश शासनानं काढले असून, त्यांच्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ परमजीत सिंह पटवालिया आणि सर्वोच्च न्यायालयातले सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर यांची देखील नियुक्ती करण्यात आली असल्याचं पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयात सहा फेब्रुवारीपासून याप्रकरणी सुनावणी होणार आहे.  

****



 मौज प्रकाशनचे संपादक - प्रकाशक संजय भागवत यांचं काल ठाणे इथं खासगी रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते साठ वर्षांचे होते. उत्कृष्ठ लेखन सामग्री तसंच अनेक नामांकित पुस्तकांच्या प्रकाशनात त्यांचा मोलाचा सहभाग होता, राज्य सरकारतर्फे उत्कृष्ट प्रकाशक म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी मुंबईत विलेपार्ले-पूर्व इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथं एका इमारतीचं छत खालच्या मजल्यावर कोसळलं, या दुर्घटनेत तीन जण ठार तर दोन जण जखमी झाले.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाज मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांच्या विकासासाठी अल्पसंख्यांक आयोगामार्फत शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक दृष्टीनं विचार करुन त्यांच्या विकासाला आयोगाचं प्राधान्य असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 जालना शहरातल्या १०० खाटांच्या जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भारतीय जनता पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते काल झालं. या रुग्णालयाच्या माध्यमातून महिलांना चांगली सेवा मिळेल, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून एका व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंतचं उपचार मोफत मिळणार असून, जिल्ह्यातल्या २२ लाख नागरिकांना या योजनेचा फायदा होणार असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं.

****



 भारत आणि न्यूझीलंडदरम्यान वेलिंग्टन इथं काल झालेला पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं ३५ धावांनी  काल जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं न्यूझीलंडसमोर २५३ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडचा संघ ४५व्या षटकात २१७ धावांवरच सर्व बाद झाला. यजुवेंद्र चहलनं तीन, मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन, तर भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येकी एक गडी बाद केला. पाच सामन्यांची मालिका भारतानं चार - एकनं जिंकली आहे.



 दरम्यान, या दोन्ही संघादरम्यान, तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका परवा बुधवारपासून सुरू होत आहे, बुधवारी पहिला सामना वेलिंग्टन इथेच खेळवला जाणार आहे.

****



 स्पेनमध्ये मर्शिया इथं झालेल्या दुसऱ्या हॉकी सामन्यात भारताच्या महिला हॉकी संघानं आयर्लंडला 3-0 असं पराभूत केलं. परवा या दोन संघांमधला पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला होता. त्यामुळे दोन मैत्रीपूर्ण सामन्यांची ही मालिका भारतानं 1-0 अशी जिंकली.

****



 नागपूर इथं विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर विदर्भ आणि सौराष्ट्र या दोन संघात सुरू असलेल्या, रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, विदर्भ संघानं काल दिवसअखेर सात बाद दोनशे धावा केल्या. सौराष्ट्र संघाच्या उनाडकटनं 2 तर चेतन सकारिया, प्रेरक मंकड, धर्मेन्द्र सिंग जडेजा आणि कमलेश मकवाना यांनी प्रत्येकी एक गडी टिपला.

****



 औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतर विभाग क्रीडा स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे येत्या नऊ ते १२ फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या या स्पर्धांमध्ये ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. प्रभारी क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी ही माहिती दिली.

****



 लाच घेतल्याप्रकरणी बीड जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे आणि बीड तहसीलच्या पुरवठा विभागाचे अव्वल लिपिक महादेव महाकुडे यांना काल न्यायालयानं, उद्या मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोघांना, पाच लाख रुपये लाच घेताना  परवा दोन फेब्रुवारीला रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.

****



 औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या भालगाव इथं बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले. घराबाहेर पडवीमध्ये झोपलेल्या दोघांवर काल पहाटे बिबट्यानं हल्ला केला. जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

****



 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियाना अंतर्गत वाशीम जिल्ह्यातल्या चिखली इथं नवीन शासकीय आदर्श पदवी महाविद्यालय सुरु करायला मंजुरी मिळाली. यासाठी १८ कोटी पेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली आहे. या महाविद्यालयाच्या कोनाशिलेचं अनावरण  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीनगर इथं  केलं

****



 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यासाठी पंचाहत्तर कोटी साठ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.  जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात विविध ३४ आणि जवळपास एकूण नव्वद किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा याद्वारे सुधारला जाणार आहे.

****



बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं विविध विकासकामांचा शुभारंभ काल पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. यामध्ये यशवंतराव चव्हाण चौक ते संत भगवानबाबा चौक रस्त्याचं डांबरीकरण, नागरी आरोग्य केंद्र इमारत आणि तालुका लघु पशुचिकित्सालय इमारतीचं उद्‌घाटन, यासह इतर कामांचा समावेश आहे.

****



उस्मानाबाद जिल्ह्यात पळसप इथं आयोजित सातव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. समारोप सत्रात संमेलनाध्यक्ष लेखिका ललिता गादगे यांच्यासह नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर उद्धव भोसले  उपस्थित होते.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...