Tuesday, 5 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५  फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****

 पश्चिम बंगालमधल्या शारदा चिटफंड घोटाळ्यासंदर्भात कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयला सहकार्य करावं, आणि येत्या २० तारखेला सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सीबीआयनं काल दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. राजीव कुमार यांनी मेघालयाची राजधानी शिलाँग इथं सीबीआयसमोर चौकशीला हजर राहावं, आणि सीबीआयने त्यांना अटक करु नये, असं न्यायालयानं सांगितलं आहे.



पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, आणि कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या अवमान याचिकेवर, या तिघांनी येत्या अठरा तारखेपर्यंत उत्तर देण्यासंही न्यायालयानं सांगितलं आहे.



 केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाचं स्वागत केलं, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हेच यातून स्पष्ट होतं, असं प्रसाद यांनी म्हटलं आहे.



 पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं असून, हा आपला विजय असल्याचं, म्हटलं आहे.



 दरम्यान, संसदेत आजही या मुद्यावरून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. मात्र गदारोळ सुरुच राहिल्यानं, सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.



 कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांचा गदारोळ सुरुच होता, या गदारोळातच अध्यक्षांनी शून्य प्रहराचं कामकाज सुरू ठेवलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शन संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. तर भाजप खासदार निशीकांत दुबे यांच्यासह काही सदस्यांनी, शारदा चिटफंड घोटाळ्यासंदर्भात पश्चिम बंगाल सरकारची भूमिका पाहता, तिथलं सरकार बरखास्त करून, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं, अध्यक्षांनी कामकाज दुपारी दोन वाजेर्यंत स्थगित केलं.

****



 ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातला आरोपी राजीव सक्सेना याची सक्त वसुली संचालनायाची कोठडी दिल्ली न्यायालयानं आणखी चार दिवसांनी वाढवली आहे. ३१ जानेवारीला त्याचं दुबईहून प्रत्यार्पण झालं, त्यानंतर त्याला सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी करारात राजकीय नेते, नोकरशहा आणि हवाईदलाच्या अधिकाऱ्यांना लाच घेता यावी म्हणून जागतिक स्तरावरच्या कंपन्यांची सुविधा पुरवल्याचा आरोप सक्सेनावर ठेवला आहे.

****



 अमरावती लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षानंच लढवावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके यांनी सांगितलं आहे. ते आज अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते.



 दरम्यान, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय रिपब्लिकन पक्ष गवई गटासाठी सोडावी अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी केली आहे. या दोन्ही पक्षांनी रिपाईनंही निवडणूक काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावी, ही अट मान्य नसून, रिपाई स्वबळावर निवडणूक लढवेल, असा इशाराही गवई यांनी दिली आहे.

****



 पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी महानगरपालिका आणि नगरपालिकांनी कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावावी तसंच कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मितीला प्राधान्य द्यावं, अशा सूचना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केल्या आहेत. ते काल मुंबईत एका बैठकीत बोलत होते. आपल्याकडच्या सगळ्या शहरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत निर्मिती केली तर शेतकऱ्यांना पुरेल एवढं खत तयार होऊ शकतं, आणि यामुळे रासायनिक खतांचा वापर टप्प्याटप्प्यानं बंद  केला जाऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं.

****



 रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात कालपासून येत्या दहा तारखेपर्यंत  रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे, त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणं आवश्यक आणि कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य असल्याचं रावते यांनी स्पष्ट केलं.

****



 परभणी जिल्ह्यात जिंतूर जवळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या त्रिलोक कॉटन जिनिंगला आज सकाळी भीषण आग लागली. यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं. या आगीमध्ये कापसाची रुई पूर्णपणे जळाली असून, मशिनरी जळून खाक झाल्या. अगनिशमन दलाच्या बंबानं आग विझवण्यात आली असून, यात कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही. 

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 08.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 08 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...