Thursday, 7 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 07.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 07 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७  फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 रिजर्व्ह बँकेनं, शेतकऱ्यांसाठीच्या विनातारण कर्जाची मर्यादा साठ हजार रुपयांनी वाढवली आहे, त्यामुळे, आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. बँकेनं, रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६ पूर्णांक २५ शतांश टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के झाला आहे. या दरकपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत.

****



 आकाशवाणीची ॲनालॉग प्रक्षेपण केंद्रं एकापेक्षा अधिक वाहिन्या चालवण्यास सक्षम नसल्यानं, ती बंद करण्यात येत असल्याचं, माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सांगितलं आहे. ते आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देत होते.



 देशातल्या सर्व खेड्यांचं येत्या मार्चअखेरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण होईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. राजस्थान आणि छत्तीसगडमधली काही खेडी अद्याप विद्युतीकरणापासून वंचित आहेत, येत्या मार्चअखेर तिथेही वीज पोहोचल, अशी माहिती आर के सिंह यांनी दिली.



 भारतमाला योजनेअंतर्गत नव्यानं उभारल्या जात असलेल्या दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन केलं जाणार असून, अडीच वर्षांत हा रस्ता तयार होणं अपेक्षित आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. या नव्या महामार्गामुळे दिल्ली मुंबई अंतर बारा तासात कापता येईल, एकशे वीस मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या मागास भागाचा विकास होणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

****



 राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच, सभापती व्यंकय्या नायडू यांनी, अधिवेशनाच्या या सत्रातले अखेरचे चार दिवस शिल्लक असून, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेसाठी वेळ निश्चित करणं आवश्यक असल्याचं म्हटलं. दहा मिनिटांच्या तहकुबीनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आरक्षणाच्या मुद्यावरून समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला, यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोनवाजेपर्यंत तहकूब झालं.

****



 आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम आज सक्तवसुली संचालनालयासमोर हजर झाले. २००७ साली पी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडियामध्ये गुंतवणूक करण्यासाठी, विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाला मंजुरी देताना, आर्थिक गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****



 काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची काळा पैसा पांढरा केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयात आजही चौकशी सुरू आहे. वाड्रा यांनी, लंडन इथं दोन घरं, सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होत आहे.

****



 केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तसंच निमलष्करी दलातल्या ७६ हजार पाचशे पेक्षा अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया येत्या अकरा फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. संगणकीय परीक्षेच्या आधारे होणाऱ्या या पदभरतीत सुमारे ५५ हजार कॉन्स्टेबल, तर, लिपिक, वैद्यकीय अधिकारी, तसंच अभियंत्यांच्या वीस हजारांपेक्षा अधिक जागांसाठी उमेदवार निवडले जातील.

****



 राज्यातल्या आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असं आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. काल मुंबईत यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्यात ६१ हजार आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवल्या जात असल्याचं शिंदे म्हणाले.

****



 यंदाची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा विदर्भाच्या संघानं जिंकली आहे. नागपूरच्या जामठा मैदानावर आज झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट्र संघाचा ७८ धावांनी पराभव केला. पहिल्या डावातल्या पाच धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात विदर्भानं दोनशे धावा करत सौराष्ट्र समोर विजयासाठी २०६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पेलू न शकलेला सौराष्ट्रचा दुसरा डाव १२७ धावांमध्ये संपुष्टात आला.

****



 चेन्नईमध्ये सुरू असलेल्या एटीपी चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश गुणेश्वरनसह चार भारतीय खेळाडूंनी उप - उपांत्यपूर्व फेरीत प्रवेकेला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत प्रज्ञेशची लढत भारताच्याच अर्जुन खाडेशी होईल, तर साकेत मायनेनीची लढत स्पेनच्या अलेजांद्रो बरोबर होईल.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...