Saturday, 9 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.02.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 February 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९  फेब्रुवारी २०१९ दुपारी .०० वा.

****



 इशान्येकडची राज्यं विकसित झाली, तरच नवभारताची सुरुवात होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर इथं आज विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. इशान्येकडच्या राज्यांमध्ये अनेक नवनविन सुविधा निर्माण होत आहेत, त्यामुळे पर्यटनाचा विकास होत असून, या भागात रोजगार देखील वाढणार असल्याचं ते म्हणाले. ईटानगर इथं दूरदर्शन अरुण प्रभा या प्रादेशिक वाहिनीचं लोकार्पण, होलोंगी इथल्या ग्रीनफील्ड विमानतळाची पायाभरणी, तवाग खोऱ्याला जोडणाऱ्या सेला बारमाही बोगद्याच्या कामाच्या कोनशिलेचं अनावरण, अरुणाचल प्रदेशमध्ये सुरु होत असलेल्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी संस्थेच्या परिसराचं उद्घाटन, नैसर्गिक वायू पुरवठा सुरळीत रहावा याकरता गॅस ग्रिड तसंच नळातून स्वयंपाकाचा गॅसपुरवठा करण्याचा प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला.



 दरम्यान, पंतप्रधान आज आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. 

****





 भारतीय निवडणूक आयोगानं मतदान तपासणी आणि माहिती कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत येत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नावं, नवीन नोंदणी तसंच मतदान कार्डात दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी आयोगानं सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी संपर्क केंद्रं सुरु केली असून, एक नऊ पाच शून्य हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे. आयोगानं माहिती आणि संवाद तंत्रज्ञानावर नवी दिल्लीत राबवलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण आणि कार्यशाळेदरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात केली. तंत्रज्ञानामुळे निवडणूक प्रक्रियेत अमुलाग्र सकारात्मक बदल घडले असल्याचं, मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी यावेळी सांगितलं. दिव्यांगांना मतदार यादीत नावं नोंदवण्यासाठी किंवा काही बदल करण्यासाठी पी डब्लू डी ॲपची सुरुवात  करण्यात आहे.

****



 बँकांनी ग्राहकांची परवानगी न घेता ग्राहकांचा पॅन आणि त्यांच्या व्यवहारांची पतनिर्धारण करणाऱ्या संस्थांना माहिती देण्यावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयानं भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारला त्यांचं याबाबत म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे. न्यायालयानं अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेला याबाबत नोटीस बजावली आहे. सदरची माहिती ग्राहकांच्या परवानगी शिवाय दिल्यामुळे त्यांच्या खासगीपणाच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तसंच आयकर कायदा १९६१ अंतर्गत देखील पॅनची माहिती इतरांना देण्यावर निर्बंध असल्याचंही याचिकाकर्त्यांनं म्हटलं आहे.

****



 बिहारमधल्या मोतीहारीमध्ये आज तीन-दिवसीय कृषी कुंभला सुरुवात झाली. या कुंभमध्ये देशभरातले १५ हजारहून अधिक शेतकरी आणि सुमारे दोनशे कृषी संशोधक सहभागी होत आहेत. पुर्वोत्तर भागातला हा सर्वात मोठा कृषी कुंभ असून, बिहारचे राज्यपाल लालजी टंडन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह या कुंभमध्ये सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाला पोत्साहित करणं हे या कुंभचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

****





 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि केंद्रीय रेशीम मंडळानं आज नवी दिल्लीत संयुक्तपणे रेशीम महामेळाव्याचं आयोजन केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. देशात गेल्या चार वर्षातली रेशीम उद्योगाची वाढ अधोरेखित करण्यासाठी वाढत्या रेशीमउद्योगाचं संचित आणि यशस्वी वाटचालीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 व्यवसायिक रॉबर्ट वाड्रा आज सलग तिसऱ्या दिवशी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयात चौकशीसाठी हजर राहीले. वाड्रा यांनी, लंडन इथं दोन घरं, सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होत आहे.

****



 बल्गोरियात सुरु असलेल्या सोफिया खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णा आणि दिविज शरण या जोडीनं काल उपान्त्य फेरीत प्रवेश केला. अलेक्झांडर दोन्स्की आणि अलेक्झांडर लाझारोव या जोडीचा त्यांनी सहा - तीन, सहा - एक असा पराभव केला.

****



 चेन्नई खुल्या ए.टी.पी. चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अँन्ड्र्यू हॅरिस बरोबर होणार आहे, तर शशीकुमार मुकुंद याचा सामना फ्रान्सच्या कोरेन्टिन मूटेट बरोबर होणार आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रज्ञेशनं ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा सहा - चार, सहा - तीन असा पराभव केला, तर मुकुंदनं ब्रिटनच्या ब्रायडन क्लेनचा सहा - दोन, तीन - सहा, सात - सहा असा पराभव केला.  

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 July 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...