Tuesday, 12 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१२ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज, दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या तैलचित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं. अटलजींचं जीवन हे सार्वजनिक जीवनाचं आदर्श उदाहरण असून, राजकारण तसंच पत्रकारितेसह, काम केलेल्या सर्वच क्षेत्रात त्यांनी, उत्तम कार्यशैलीचे मापदंड उभारल्याचं, राष्ट्रपती यावेळी म्हणाले.



उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.



 उपराष्ट्रपती नायडू यांनी अजातशत्रू अटलजी हे सर्वसामान्यांचे आदर्श असल्याचं नमूद केलं तर  स्वत:ची वेगळी ओळख जपतानाच, बहुमताचा आदर करणारे नेते, या शब्दांत लोकसभाध्यक्षांनी, अटलजींच्या स्मृतींना उजाळा दिला. अटलजींच्या शब्दांएवढीच त्यांच्या मौनातही ताकद होती, असं पंतप्रधान म्हणाले, तर गुलाम नबी आझाद यांनी, अटलजींच्या स्वभाववैशिष्ट्यांकडे सभागृहाचं लक्ष वेधलं.

****



 दिल्लीतल्या करोलबाग परिसरातल्या एका हॉटेलमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाचे २६ बंब आग विझवण्याचा प्रयत्न करत असून, बचावकार्य सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आतापर्यंत २५ जणांना आगीतून वाचवण्यात आलं आहे.

****



 भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभागाचा आरोप असलेले कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनाची मुदत येत्या बावीस तारखेपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं काल दिला. आता तेलतुंबडे यांच्या नियमित जामीनाच्या अर्जावर बावीस तारखेला सुनावणी होणार आहे.

****



 वंचितांची एकजूट झाली तर वंचितांची सत्ता येईल, असं मत भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. काल पालघर इथं, वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघातर्फे घेण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. आपण दुसऱ्या सामाजिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्याचं सांगत, वंचितांना जागृत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...