Saturday, 16 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१६  फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी धुळे इथं कृषी सिंचन योजनेंतर्गत ‘निम्न पांझरा’ प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. धुळे तसंच यवतमाळ जिल्ह्यातल्या विविध योजनांचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड इथं, एकलव्य निवासी विद्यालय योजनेंतर्गत, आदिवासी मुला-मुलींसाठी बांधलेल्या शाळेचं उद्धाटनही पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते नव्या घराचा ताबा देणार आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस तसंच अजनी-पुणे रेल्वेगाडीला दूरदृष्य संवाद यंत्रणेनं हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील.

****



 जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आज सकाळपासून रेल रोको आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

****



 जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुकुंदराज कलशेट्टी यांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं लाच घेताना रंगेहात पकडलं. ऊसाला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी कलशेट्टी यानं, तक्रारदार शेतकऱ्यांकडून चार हजार रुपये लाच मागितली होती. पाथरी उपविभागीय कार्यालयात सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****



 राज्यभरात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृती परीक्षा आणि अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश पुनर्परीक्षा, येत्या २४ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. सर्वत्र एकाच दिवशी होणाऱ्या या दोन्ही परीक्षा देणं विद्यार्थ्यांना सोयीचं होण्यासाठी शिष्यवृती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...