Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यास राज्य जल परिषदेनं आज मान्यता दिली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या सहाव्या जल परिषदेच्या बैठकीत
ही मान्यता देण्यात आली. यात सर्व सहा नदी खोऱ्यांच्या जलनियोजनाचा समावेश आहे. या
जल आराखड्यात २०३० पर्यंतच्या पाण्याच्या मागणीचं उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून सर्व नदी
खोऱ्यातल्या पाण्याची उपलब्धता आणि पाण्याचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. हा जल आराखडा
जुन्या प्रस्तावित जल वापर तसंच अकृषी पाण्याचा वापर, लोकसंख्या आणि इतर घटकांवर आधारित
आहे. पाणी प्रदुषण आणि पर्यावरण व्यवस्थापनाचं नियोजनही या जल आराखड्यात करण्यात आलं
आहे.
****
लोकसभेत आज २०१९च्या अंतरिम अर्थसंकल्पावरची चर्चा पुन्हा सुरु झाली. चर्चेत
सहभागी होत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे थंबी दुराई यांनी, अर्थसंकल्पात
शेतकर्यांसाठी केलेल्या घोषणा खूप कमी असून, यात देशाच्या रोजगार स्थितीवरही काही उपाययोजना
केल्या नसल्याचं सांगितलं. हा अर्थसंकल्प म्हणजे भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीसाठीचा
जाहीरनामा असून, विमुद्रीकरणामुळे छोट्या व्यवसायिकांचं नुकसान झाल्याचा आरोप दुराई
यांनी केला. अर्थसंकल्पातली संरक्षण क्षेत्रासाठीची
तरतूद गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचं काँग्रेसचे विरप्पा मोईली यावेळी म्हणाले. विमुद्रीकरणामुळे
औद्यागिक उत्पादनात घट झाली असून, मध्यम आणि लघू उद्योगांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
झाल्याचं ते म्हणाले.
सत्ताधारी पक्षाकडून बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी, राष्ट्रीय
लोकशाही आघाडी सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत सर्वोत्तम कामगिरी करणार्या अर्थव्यवस्थांपैकी
एक असल्याचं नमूद केलं. मुद्रा योजना, विमानतळांचा विकास, वीज पुरवठा आदी कामांचा उल्लेख
करत सिन्हा यांनी, सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
भाजपचे किरीट सोमय्या, तेलंगणा राष्ट्र समितीचे ए पी जितेंद्र रेड्डी, धर्मनिरपेक्ष
जनता दलाचे एच डी देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकरराव कुकडे यांनी या चर्चेत
सहभाग घेतला.
****
सकस आहार आणि निरोगी बालपण हा नवभारताचा पाया असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात वृंदावन इथं आज अक्षय पात्र फाऊंडेशननं घेतलेल्या
एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय पोषण आहार योजना, इंद्रधनुष योजना आणि स्वच्छ
भारत योजनेद्वारे सरकार बालकांच्या पोषक आहार, लसीकरण आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष देत
असल्याचं ते म्हणाले. मिशन इंद्रधनुष अंतर्गत आतापर्यंत तीन कोटी चाळीस लाख मुले आणि
९० लाख गर्भवती महिलांचं लसीकरण केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.
****
स्वच्छतेमध्ये जागतिक स्तरावर लातूर शहराची नवी ओळख निर्माण करण्यासाठी
सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं
आहे. लातूर इथं आज संत गाडगेबाबा सुका कचरा संकलन आणि वर्गीकरण केंद्राच्या
उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरात निर्माण होणार्या कचर्याची त्याठिकाणीच
विल्हेवाट लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं ते म्हणाले.
****
स्वातंत्र्य सेनानी डॉ. राघवेंद्र शाईवाले यांचं आज उस्मानाबाद
जिल्ह्यात गुंजोटी इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते १०४ वर्षांचे होते. गुंजोटी परिसरात
निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले शाईवाले हे, निजामकालीन श्रीकृष्ण
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांना मराठवाडा चॕरीटेबल ट्रस्टच्या "जीवन गौरव"
पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
****
विदर्भाच्या काही भागात तापमानात घट झाली असून, उर्वरित
राज्यात तापमान सरासरीच्या जवळपास आहे. आज सर्वात कमी सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस
तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. नाशिक १० पूर्णांक दोन, औरंगाबाद १२ पूर्णांक चार,
तर परभणी आणि नांदेड इथं सरासरी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं
वर्तवली आहे.
//***********//
No comments:
Post a Comment