Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 February
2019
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्यात बैठक सुरु आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अण्णा यांनी उपोषण मागे घेण्याची
विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री
सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन बैठकीस उपस्थित आहेत. लोकपाल नियुक्तीच्या
मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून उपोषण सुरु केलं आहे. लोकपाल आणि लोकायुक्तांच्या
नियुक्तीवरुन राज्य आणि केंद्र सरकारनं निराशा केली असल्याची भावना अण्णा यांनी व्यक्त
केली आहे. दरम्यान, पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह
बैठकीतून परतले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लोकसभेत
आज राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली. सरकारनं देशातल्या गरीबांच्या
कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे हुकुमदेव नारायण यादव
यांनी प्रस्ताव मांडतांना सांगितलं. जन धन योजेनअंतर्गत आतापर्यंत ३४ कोटी खाती उघडण्यात
आली असून, त्याअंतर्गत ८४ हजार कोटी रुपये लाभार्थ्यांना मिळाल्याचं यादव यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आयुष्मान भारत योजना यासारख्या योजनांचा दाखला देत
त्यांनी सरकारच्या कामाची माहिती दिली. भाजपच्या जगदंबिका पाल यांनी, राष्ट्रीय लोकशाही
आघाडी सरकारनं शेतकरी आणि गरीबांच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना केल्याचं नमूद केलं.
दरम्यान,
या चर्चेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्रीय अन्वेषण
विभाग - सीबीआयमध्ये सुरु असलेल्या वादाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे झालेल्या
गदारोळामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज काही वेळासाठी स्थगित केलं
होतं.
****
केंद्र
सरकारच्या विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर आयकर विभागानं बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्याअंतर्गत
एक हजार ८००हून अधिक कारणे दाखवा नोटीस बजावल्याचं सरकारनं आज राज्यसभेत सांगितलं.
ज्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली, मात्र त्यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षात आयकर
परतावा भरलेला नाही, अशांना ही नोटीस जारी करण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं.
****
बचत
गटाच्या महिलांनी गावातल्या समस्यांवर जनजागृती करावी, असं उस्मानाबादचे आमदार राणा
जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. उस्मानाबाद इथं आज राष्ट्रीय जीवन्नोन्नती अभियान
उमेद अंतर्गत आयोजित महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते. दारूबंदी, पाणी बचत, आणि शौचालयं बांधकाम आणि त्याचा वापर यासाठी बचत
गटाच्या महिलांनी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
****
जालना
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम देवरे याच्या विरुध्द एक
लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आज औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्ते दुरुस्ती कामाचं देयक देण्यासाठी लाच मागितल्याची
तक्रार दाखल झाल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करून जालना लाचलुचपत विभागानं ही कारवाई
केली. कार्यकारी अभियंता देवरे यानं यापूर्वी याच कामासाठी तक्रारदाराकडून चार लाख
रुपयांची लाच स्वीकारली होती.
****
कवयित्री
संध्या रंगारी यांना राज्यस्तरीय “सत्यशोधक साहित्य पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या
बहुचर्चित ‘वाताहतीची कैफियत’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार घोषित करण्यात आला.
नांदेडच्या सत्यशोधक विचार मंचाच्या वतीनं नांदेड इथं आयोजित आंबेडकरवादी साहित्य संमेलनात
येत्या १७ फेब्रुवारी रोजी रंगारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सत्यशोधक
विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी ही माहिती दिली.
****
परभणी
जिल्ह्यातल्या जिंतूर तहसिल कार्यालयावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं विविध
मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. रोजगार हमी योजनेची कामं सुरु करण्यात यावी, शेतकऱ्यांना
संपूर्ण कर्जमाफी आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं.
****
जालना
शहरालगतच्या वळण रस्त्यावर भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा
मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. या अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक काही वेळ
विस्कळीत झाली होती.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात नाणार इथल्या प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबतची भूमिका समजावून घेण्यासाठी
आज रत्नागिरीत आयोजित केलेली सुकथनकर समितीची जनसुनावणी स्थगित करण्यास शिवसेनेच्या
शिष्टमंडळानं भाग पाडलं. नाणार प्रकल्पाबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी राज्याचे माजी
मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पानं पाच
तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे, या समितीची जनसुनावणी आज सकाळी सुरु झाली होती.
****
No comments:
Post a Comment