Friday, 2 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 02.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात येत्या २१ तारखेला मुंबईत मोर्चा काढून सर्वसामान्य जनतेकडून ईव्हीएमविरोधात अर्ज भरून घेतले जाणार असल्याचं, विरोधी पक्षांकडून सांगण्यात आलं आहे. आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत, ही माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ईव्हीएममुळे शंकेला वाव राहतो, यामुळे विधानसभा निवडणुकामतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणी या पक्षांनी केली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल, तर मतपत्रिकेवर मतदान घेण्यास हरकत काय, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला.
****
भारतीय जनता पक्षानं राज्यसभेतल्या सर्व खासदारांना आज व्हिप जारी केलं आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राज्यसभेत आजही चर्चा सुरू आहे. या विधेयकावर आज मतदान होणं अपेक्षित आहे. दहशतवादी कारवायांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून जाहीर करण्याची तरतूद या विधेयकात आहे. दरम्यान, ही तरतूद घटनात्मक दृष्ट्या वैध नसल्याचं, काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते या विधेयकाच्या विरोधात राज्यसभेत बोलत होते. या तरतुदीमागे भाजपची पक्षपाती भूमिका असल्याची टीका काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी केली. या चर्चेला उत्तर देताना, गृहमंत्री अमित शहा यांनी, दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त लोक कायद्यातल्या पळवाटांचा शोध घेत, नवनव्या दहशतवादी संस्था स्थापन करत असल्याकडे लक्ष वेधलं. या आणि अशा कारवाया रोखणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं गृहमंत्री म्हणाले.
****
देशातून कुपोषण निर्मूलनासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे. ते आज लोकसभेत बोलत होते. मातांना पोषण आहार पुरवल्यास, बालकांचं कुपोषण होणार नाही, याकडे लोकसभाध्यक्षांनी लक्ष वेधलं. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाच्या उत्तम अंमलबजावणीची गरजही त्यांनी व्यक्त केली. महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी, यासंदर्भात बोलताना, एक ते सात ऑगस्टपर्यंत पाळला जाणारा स्तन्यपान सप्ताह गांभीर्यानं पाळला जावा, बालकांना जन्मापासून तासाभरात आईचं दूध मिळेल, यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात जनजागृती करावी, असं नमूद केलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमधल्या खासदारांनी आज पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शनं केली. संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केलेल्या या आंदोलनात भाजप खासदारांनी, तृणमूल सरकारविरोधात फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, पश्चिम बंगालमधल्या डाव्या पक्षाच्या खासदारांनीही मजूरी कायद्यातल्या सुधारणांच्या विरोधात आज संसद भवन परिसरात आंदोलन केल्याचं वृत्त आहे.
****
मुंबईत गोरेगाव परिसरातल्या एका स्पा वर धाड टाकून, पोलिसांनी आठ युवतींची सुटका करत, स्पा मालक आणि व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी, मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रय केला जात असल्याचं, पोलिसांनी सांगितलं.
****
कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले आता दोन दरवाजांतून चार हजार दोनशे घनफूट वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी ४२ फुटावर गेली असून एकूण ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज पर्यंत आठ पूर्णांक चाळीस दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांशी संबंधित विविध विभागांतर्गत प्रलंबित असलेली कामं कालबद्धरित्या पूर्ण करावीत असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. महावितरण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आदी विभागांतर्गत जिल्ह्यातले विविध प्रलंबित विकास कामांचा आढावा पालकमंत्री चव्हाण यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या दोलेश्वर ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांची आजपासून गर्दी होत आहे. राज्यभरातून भाविकवर्ग पैठण इथं दर्शनासाठी दाखल होत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे.

श्रावण महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ इथं श्री क्षेत्र घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येतात. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद कन्नड धुळे तसंच फुलंब्री खुलताबाद या मार्गावरची वाहतुक या महिन्यात दर सोमवारी तसंच शनिवारी, अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. 
****

No comments: