Saturday, 3 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०३ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय दररोज सुनावणी घेणार
v  बेकायदा कारवाया प्रतिबंधक विधेयक राज्यसभेत संमत 
v इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात सर्व विरोधी पक्षांचा येत्या २१ तारखेला मुंबईत मोर्चा
आणि
v औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सहा जणांचे अर्ज वैध
****

 अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय दररोज सुनावणी घेणार आहे. या प्रकरणी नेमलेली मध्यस्थ समिती, ३१ जुलैपर्यंत दिलेल्या मुदतीत तोडगा काढू न शकल्यानं, दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाच्या घटनापीठानं काल घेतला. येत्या मंगळवारी सहा तारखेपासून या सुनावणीला प्रारंभ होईल, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण होईपर्यंत सुनावणी सुरू राहणार असल्याचं, न्यायालयानं नमूद केलं आहे.
****

 बेकायदा कारवाया प्रतिबंधक विधेयक काल राज्यसभेत संमत झालं. विधेयकाच्या बाजूने एकशे सत्तेचाळीस तर विरोधात बेचाळीस मतं पडली. त्यापूर्वी विधेयकावरच्या चर्चेदरम्यान, काँग्रेस पक्षानं, हे विधेयक घटनात्मकदृष्ट्या अवैध तसंच व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरोधात असल्याचं सांगत, या विधेयकाला विरोध केला. या चर्चेला उत्तर देताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, दहशतवादाचा बिमोड करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं सांगत, दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. हे विधेयक संमत झाल्यामुळे आता संघटनेव्यतिरिक्त एका व्यक्तीला दहशतवादी घोषीत करणं शक्य होणार आहे.
****

 अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांनी काश्मीर खोऱ्यातला मुक्काम तत्काळ आटोपता घेऊन, आपापल्या घरी परतावं, असं आवाहन जम्मू काश्मीर प्रशासनानं केलं आहे. काश्मीर खोऱ्यात यात्रेकरुंवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची भीती गुप्तचर यंत्रणेकडून वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरच्या गृह सचिवांनी, या संदर्भात एक पत्रक जारी करत, यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर खोऱ्यातून तत्काळ परतण्याचं आवाहन केलं आहे.
****

 देशातून कुपोषण निर्मूलनासाठी लोकचळवळ उभी करण्याचं आवाहन लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत बोलत होते. मातांना पोषण आहार पुरवल्यास, बालकांचं कुपोषण होणार नाही, याकडे लक्ष वेधत, पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाच्या उत्तम अंमलबजावणीची गरजही त्यांनी व्यक्त केली. महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी, यासंदर्भात बोलताना, एक ते सात ऑगस्टपर्यंतचा स्तन्यपान सप्ताह गांभीर्यानं पाळला जावा, बालकांना जन्मापासून तासाभरात आईचं दूध मिळेल, यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात जनजागृती करावी, असं आवाहन केलं.
****

 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात सर्व विरोधी पक्ष येत्या २१ तारखेला मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या पक्षांच्या नेत्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार, छगन भुजबळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ईव्हीएममुळे शंकेला वाव राहतो, यामुळे विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात, अशी मागणी या पक्षांनी केली.  या नियोजित मोर्चात, सर्वसामान्य जनतेकडून ईव्हीएमविरोधात अर्ज भरून घेतले जाणार असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
****

 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला दोष देण्याएवजी विरोधकांनी आत्मचिंतन करावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपची महाजनादेश यात्रा काल वर्ध्यात पोहोचली, याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. जनतेचा पाच वर्ष पाठींबा हीच खरी पावती असून आपण जनतेप्रती उत्तरदायी असल्याचं, ते म्हणाले. शिवसेना आणि मित्रपक्षांसोबतचा जागा वाटपाचा मुद्दा वाद न होता सुटेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****

 सामान्य माणसांच्या समस्या सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य यांनी म्हटलं आहे. ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा काल नांदेड इथं पोहोचली, त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. सामान्यांच्या समस्या समजून घेणं हा या जनआशीर्वाद यात्रेचा उद्देश असल्याचं, ठाकरे यांनी सांगितलं.
****

 यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार रवीशकुमार यांना मिळाला आहे. निवड समितीनं काल ट्वीट करून रवीशकुमार यांच्यासह एकूण पाच जणांना हा पुरस्कार देत असल्याचं जाहीर केलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी, इन कॅमेरा सुनावणी घेण्याची आवश्यकता राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा एनआयएनं व्यक्त केली आहे. या सुनावणीला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, यामुळे ही सुनावणी इन कॅमेरा करावी, असं एनआयएनं विशेष न्यायालयाकडे दाखल याचिकेत म्हटलं आहे.
****

 विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सहा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची काल छाननी करण्यात आली. या छाननीत विशाल नांदरकर यांचा अर्ज कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बाद ठरला. शिवसेना भाजप युतीचे अंबादास दानवे, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे भवानीदास उर्फ बाबुराव कुलकर्णी, यांच्यासह एकूण सहा जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. परवा पाच ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल. १९ ऑगस्टला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
****

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळानं बीड जिल्ह्यात पाच हजार लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचं उद्दीष्ट ठेवलं असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काल सांगितलं. विविध बँकांच्या जिल्हा समन्वयकांसोबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

 दरम्यान, बीड जिल्ह्यासाठी पीक विम्याचे ८३१ कोटी रुपये प्राप्त झाले असून साडे दहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. दुष्काळी अनुदानापैकी शिल्लक ११८ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
    ****

 लातूर जिल्ह्यात सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी वारकरी भवन उभारलं जाणार आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही माहिती दिली. ते काल निलंगा इथं काल एका बैठकीत बोलत होते. प्रत्येक भवनासाठी दहा लाख रुपयांप्रमाणे १ कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 
****

 हिंगोली जिल्ह्यातल्या साडेचारशे प्राध्यापकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पगाराकरता निधीची तरतूद करावी या मागणीसाठी झालेल्या या आंदोलनात ७८ विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातले प्राध्यापक सहभागी झाले.
****

 औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा ओढ्यात बुडून मृत्यू झाला. वडोदबाजार इथं गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली. तमजील शेख आणि मिनाज शेख अशी या विद्यार्थांची नावं आहेत. काल या दोघांचे मृतदेह सापडल्याचं, पोलिसांकडून सांगण्यात आलं.
****

 जालना जिल्हा परिषदेअंतर्गत भोकरदन इथल्या जलसंधारण कार्यालयातला टंकलेखक अनिल कुलकर्णी याला पाचशे रुपयांची लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. अकृषक परवाना देण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, त्यापैकी पाचशे रुपये घेताना, त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
****

 भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या  दौऱ्यात तीन टी ट्वेंटी सामने, तीन एक दिवसीय सामने, तर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
****

 राज्यात काल अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला, नांदेड जिल्ह्यात काल दुपारपासून संततधार सुरु असून पहाटे पावसाचा जोर वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यासह बहुतांश भागात काल सुमारे अर्धातास जोरदार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं काल हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही काल सकाळपासून दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हिंगोली जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
*****
***

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...