Monday, 5 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 05.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -०५ ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v जम्मू -काश्मीरमध्ये मध्यरात्रीपासून जमावबंदी आदेश लागू; शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या सूचना; तणावाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक
v कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; मुंबईत रेल्वेसेवा खंडीत, अनेक रेल्वेगाड्या रद्द
vाशिक जिल्ह्यातल्या पावसामुळे पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ
 आणि
v थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीनं इतिहास रचत मिळवलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद
****

 जम्मू -काश्मीरमधल्या तणावाची स्थितीतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं श्रीनगरसह इतर जिल्ह्यात मध्यरात्री बारा वाजेपासून जमावबंदीशी संबंधित १४४ कलम लागू केलं आहे. यामुळे जमावबंदी तसंच कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास आणि सभा घेण्यास बंदी आली आहे. किश्तवाड, रियासी, डोडा, राजौरी आणि उधमपूर जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. किश्तवाड, राजोरी जिल्ह्यात आणि रामबन जिल्ह्याच्या बनिहान भागात संचारबंदी लागू केली आहे. जम्मू विद्यापीठ आज बंद ठेवण्यात आले असून, परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहे सोडण्याचे आदेश दिले असून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातली इंटरनेट आणि मोबाईल दूरध्वनी सेवा खंडीत करण्यात आली असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना सॅटेलाईट दूरध्वनी देण्यात आले आहेत. 

 जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना निवासस्थानीच स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी आपल्या व्टिटवरुन दिली आहे. याशिवाय राज्यातल्या इतर राजकीय नेत्यांनाही सुरक्षा यंत्रणांनी स्थानबद्ध केल्याचं या नेत्यांनी ट्विट करून सांगितलं.

 दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल दिल्लीत बैठक घेतली.

 या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रीमंत्रीडळाचीही सकाळी साडेनऊ वाजता बैठक होत आहे.
****

 राज्यातल्या बहुतांश भागात कालही चांगला पाऊस झाला. विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला.

 मुंबईत झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झालं. शहराच्या विविध भागात पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वेसेवा बंद झाली होती. मुंबई- पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही रद्द करण्यात आल्या, नागपूरहून मुंबईकडे येणारी दुरांतो एक्सप्रेस इगतपुरीमध्ये थांबवण्यात आली. त्याचबरोबर मुंबईहून सुटणाऱ्या काही रेल्वेगाड्याही रद्द कराव्या लागल्या, यामध्ये नंदीग्राम आणि देवगिरी एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचाही समावेश आहे. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्याही नाशिक, इगतपुरी आणि मनमाड आदी स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या, काही रेल्वे गाड्या या स्थानकावरून मागे फिरवण्यात आल्या.

 दरम्यान, मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातली  अतिवृष्टी लक्षात घेता आणखी सहा तुकड्या पाठविण्याची विनंती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाकडे करण्यात आली असून, शासन लष्कर, नौदल आणि अन्य यंत्रणांच्याही संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****

 नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणातून सोडण्यात येणारं पाणी काल रात्री अकरा वाजता कमी करण्यात आलं, त्यामुळे नाशिक शहरातली पुराची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आलेल्या पुरांमुळे आणि विविध धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे, या पाण्यामुळे पैठणच्या जायकवाडी प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही मोठी वाढ होत आहे.
****

 कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. यामुळे अनेक ठिकाणी घर, गोठे पडल्याच्या घटना घडल्या.

 रायगड जिल्ह्यात पूर आणि समुद्राच्या भरतीमुळे पेण तालुक्यातल्या वाशी, कणे आणि मोजे गावात पाणी घुसल्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, तट रक्षक दलाच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं.
****

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. नद्यांना आलेल्या महापुराचा फटका ऊस, भातासह सर्व खरीप हंगामी पिकांना बसला आहे.
****

 सातारा जिल्ह्यातल्या कोयना, कान्हेर, धोम धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे कृष्णा, कोयना, आणि वेन्ना नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
****

 पांझरा नदीला पूर आल्यानं धुळे शहरातले दोन पूल पाण्याखाली गेले आहेत, या पूलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे, त्याचबरोबर आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
****

 जालना शहरात काल हलका पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातले धामणा आणि जुई धरण वगळता जिल्ह्यातले ४१ लघुप्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. विहिरींची पाणीपातळीही वाढलेली नाही. त्यामुळे खरीपाच्या पिकांसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 दरम्यान, या अतिवृष्टीमुळं आणि आजही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातल्या ठाणे, नवी मुंबई, रायगड, पुणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा जिल्ह्यातले माण आणि खटाव तालुके वगळता जिल्ह्यातल्या सर्व शाळांना तसंच सांगली जिल्ह्यातल्या शिराळा, वाळवा, मिरज, आणि पलूस तालुक्यातल्या शाळांना सुटी देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातल्या शाळांनाही सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आपल्या कार्य क्षेत्रातल्या सर्व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारीत केलं जात आहे.
****

 नवं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीसाठी नागरिकांनी मदत करावी, असं आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बीड इंथ केलं. राज्य परीवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुर्नबांधणी भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. समाजकारणाच्या माध्यमातून नवमहाराष्ट्र बनवायचा आहे. या करिता आपल्या सहकार्याची अपेक्षा करत असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी बोलताना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गाव तिथं एसटी हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.
****

‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’संस्थेनं वाढीव आरक्षण रद्द कण्याची मागणी करत काल औरंगाबाद आणि हिंगोलीमध्ये आंदोलन केलं. औरंगाबाद शहररात आंदोलकांनी हे आरक्षण रद्द करण्याच्या फलक प्रदर्शित करून घोषणा देत धरणं आंदोलन केलं.
हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला.
****

 लातूर महापालिकेनं काल, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवलं. यामध्ये नटश्रेष्ठ श्रीराम गोजमगुंडेंच्या नावे दिला जाणारा पुरस्कार अभिनेते सयाजी शिंदे यांना प्रदान करण्यात आला, तर, पंडित शांताराम चिगरी पुरस्कार तबला वादक पांडुरंग मुखडे यांना, जिजाऊ पुरस्कार डॉक्टर सुरेखा काळे, बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार अशोक चिंचोले, भारतरत्न डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार डॉक्टर राजशेखर सोलापुरे, गोपीनाथ मुंडे पुरस्कार पालिका कर्मचारी रमाकांत पिडगें यांना, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्य पुरस्कार कांचन वाघमारे यांना देण्यात आला.
****

 थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. पुरुष दुहेरीच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात, या जोडीनं चीनच्या ली जून हुई आणि लिऊ यू चेन, या जोडीला २१-१९, १८-२१, २१-१८, असं हरवलं. जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेचं किंवा कुठल्याही जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावणारी, भारताची ही पहिली जोडी ठरली आहे.
****

 भारत-वेस्ट इंडिज यांच्यात काल झालेला दूसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं ‘डकवर्थ लुईस नियमाद्वारे’ २२ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतानं वेस्ट इंडिज समोर जिंकण्यासाठी १६८ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजच्या संघानं सोळाव्या षटकांपर्यंत चार बाद ९८ धावा केल्या, मात्र त्यानंतर पाऊस आल्यानं खेळ थांबवावा लागला. परिणामी ‘डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला २२ धावांनी विजयी घोषित करण्यात आलं. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन-शुन्यनं विजय मिळवत ही मालिका जिंकली आहे.
*****
***

No comments: