आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०७ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज
या, महिला नेत्यांसाठी आदर्श होत्या, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी
म्हटलं आहे, नवी दिल्लीत आज सकाळी सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली
अर्पण केल्यानंतर ते बोलत होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
भाजप अध्यक्ष अमित शहा, पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी, यांच्यासह विविध पक्षांचे
ज्येष्ठ नेते, अनेक राज्यांचे विद्यमान तसंच माजी मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य नागरिकांनी,
सुषमा स्वराज यांचं दर्शन घेऊन, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख
व्यक्त केलं आहे.
सुषमा स्वराज यांचं काल दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र
धक्क्यानं निधन झालं, आज दुपारी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात
ठेवण्यात येईल, त्यानंतर त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, स्वराज यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या यात्रेअंतर्गत
बुलडाणा जिल्ह्यात आज होणाऱ्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या आहेत.
****
जम्मू
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० च्या तरतुदी रद्दबातल झाल्याचं, राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी जाहीर केलं आहे. हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेनं संमत केल्यानंतर
राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं.
****
भारत छोडो आंदोलन आणि गोवा मुक्ती संग्रामात
मोलाचं योगदान देणाऱ्या राज्यातल्या ९ स्वातंत्र्यसैनिकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या हस्ते शुक्रवारी ऑगस्ट क्रांतीदिनाचं औचित्य साधून राष्ट्रपती भवनात सन्मान
होणार आहे. यामध्ये औरंगाबाद
जिल्ह्यातले लक्ष्मण उखडे, लातूर जिल्ह्यातले शिवलींगप्पा इराप्पा
उर्फ विरभद्रप्पा सिद्रामप्पा मडगे, परभणी जिल्ह्यातले माधवराव
कुलकर्णी, बीड जिल्ह्यातले बन्सी जाधव यांच्यासह भंडारा,
नागपूर, बुलडाणा, कोल्हापूर
आणि वर्धा जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे.
****
नाशिक तसंच नांदूर मधमेश्वर आणि भंडारा धरणातून येत असलेल्या पाण्यामुळं जायकवाडी
धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असून धरणाची पाणी पातळी ५५ टकक्यांपर्यंत पोहचली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment