आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ ऑगस्ट २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज महाराष्ट्र दौऱ्यावर
येत आहेत. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम इथल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या
सुवर्णजयंती समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. सेवाग्राम इथं बापू कुटीलाही
राष्ट्रपती भेट देतील. १९६९ साली गांधी शताब्दी योजने अंतर्गत डॉ सुशीला नय्यर यांनी
स्थापन केलेल्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि
समुदाय आधारित वैद्यकीय शिक्षणासाठी जगभरात नावलौकीक आहे.
****
अण्वस्त्राचा प्रथम वापर
करणार नाही हे भारताचं सध्याचं धोरण आहे. मात्र भविष्यात काय होईल, हे परिस्थितीच ठरवेल
असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल पोखरण इथं बोलत होते. यावेळी
त्यांनी माजी पंतरप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या पुण्यतिथी प्रसंगी त्यांना
आदरांजली वाहिली.
दरम्यान ,सदैव देशहित आणि पक्ष वाढीचा विचार ही भारतीय जनता पक्षाची
संस्कृती आहे. अटलजी, अडवाणी यांनी ही संस्कृती प्राणपणानं जपली असं प्रतिपादन भाजपा
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त
काल मुंबईत भाजपा मुख्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.
****
राज्य सरकारच्या कुठल्याही
गृह योजनेत यापुढे एकच घर घेता येणार असून . घरांची मागणी जास्त आणि उपलब्धता कमी असल्यानं
सरकारी गृहनिर्माण धोरणात बदल केले जाणार आहेत. म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी काल
रत्नागिरीत ही माहिती दिली. या संदर्भातल्या नव्या धोरणाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव
विचाराधीन आहे, त्याला मान्यता मिळाल्यानंतर सरकारी योजनेतून एकदाच घर मिळेल. आधी सरकारी
योजनेतून घर मिळालेल्या व्यक्तीला त्यानंतर राज्यातल्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेत
अर्ज सादर करता येणार नाही, असं सामंत यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment