Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१९ ऑगस्ट २०१९ सकाळी ७.१० मि.
****
v धुळे जिल्ह्यात
राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कंटेनर यांच्या टक्करीत १३ प्रवासी ठार
v भारतीय जनता पक्षाचं काँग्रेसीकरण होत असल्याची
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका तर विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहणार
असल्याचे संकेत
v विधान परिषदेच्या
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
आणि
v राज्य सरकारचा ‘ज्ञानोबा-तुकाराम' पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर
मधुकर जोशी यांना तर
v माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना
मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान
****
धुळे जिल्ह्यात शहाद्यानजिक निमगुळ गावाजवळ राज्य
परिवहन महामंडळाची बस आणि शहाद्याकडून दोंडाईचाकडे येत असलेल्या कंटेनर ट्रक यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात १३ प्रवासी ठार झाले. बसमधील अन्य ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती धुळे पोलिसांनी
दिली. मृतांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे. बस औरंगाबादहून शहाद्याकडे
जात असताना काल रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात
दाखल करण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
देशात विधी साक्षरता निर्माण करणं आवश्यक असल्याचं
प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी केलं आहे. काल नागपूर इथं अखिल
भारतीय राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सतराव्या परिषदेच्या समारोप सत्रात ते संबोधित
करत होते. क्रमिक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा कायद्याबाबतची माहिती दिली गेली पाहिजे,
असं मत सरन्यायाधिशांनी व्यक्त केलं. या समारोप सत्राला सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती
एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती बी.आर. गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती
नंद्रा जोग, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सरन्यायाधिशांच्या हस्ते नागपूर जवळ वारंगा
इथं राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या नियोजित इमारतीचं भूमीपूजनही करण्यात आलं. केंद्रीय
परिवहन मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षानं तयार
केलेले नेते भारतीय जनता पक्ष पळवून नेत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीला
अनुपस्थित राहिलेले काही नेते, सत्ताधारी शिवसेना - भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या
शक्यतेसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना पाटील यांनी, भाजपनं आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना
सहभागी करून घेण्याऐवजी त्यांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असं नमूद
केलं. भाजपचं काँग्रेसीकरण होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर भाजपचे
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच असतील असं वृत्त, पीटीआय या वृत्तसंस्थेनं
दिलं आहे. पक्ष अध्यक्ष अमित शाह यांनी हरीयाणाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सध्याचे
मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच असतील, असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्या बरोबरच
पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांनी राज्यात पुन्हा फडणवीस तसंच झारखंडमध्ये पुन्हा रघुबर
दास मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं स्पष्ट केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे स्थगित झालेली मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या बुधवारपासून नंदुरबार इथून पुन्हा सुरू
होत आहे. नंदुरबार इथं बुधवारी २१ तारखेला
सकाळी ११ वाजता या यात्रेत, मुख्यमंत्री जाहीर सभेद्वारे नागरिकांशी संवाद साधतील.
नंतर ही यात्रा धुळे आणि जळगाव इथं जाणार आहे. येत्या शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्यात
मलकापूर इथं ही यात्रा पोहोचेल.
****
विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य
संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरूवात होत आहे.
सायंकाळी चार वाजेपर्यंत औरंगाबाद आणि जालना
जिल्ह्यातल्या १७ केंद्रांवर हे मतदान होईल. या निवडणुकीसाठी एकूण ६५७ मतदार आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून बाबुराव कुलकर्णी
तर शिवसेना - भाजप युतीकडून अंबादास दानवे यांच्यात मुख्य लढत आहे. या मतदानाची
२२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारीत केलं जात आहे.
****
राज्य सांस्कृतिक संचालनालयाचा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्य संशोधक-
संत साहित्य अभ्यासक डॉक्टर मधुकर जोशी यांना काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या
हस्ते पुरस्कार देऊन जोशी यांना गौरवण्यात आलं. संतांनी
मानवतेचा मंत्र जगाला दिला, सामान्यांना समजेल अशा सोप्या शब्दात जीवनाचं सार
सांगितलं असं डॉक्टर जोशी यांनी, पुरस्कारला उत्तरादाखल केलेल्या भाषणात नमूद केलं.
****
शंभर वर्षांची वैचारिक आणि शहाणपणाची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात शहाणपणा आणि विवेकवाद उरला नसल्याची
भावना ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश
कर्णिक यांनी व्यक्त केली. औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना कर्णिक
यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मातृसंस्था असलेल्या मराठवाडा
साहित्य परिषदेच्यावतीनं होणारा सन्मान हा मसापच्या उभारणीत राबलेल्या, निरपेक्ष कष्ट
घेतलेल्या प्रत्येकाचा सन्मान असल्याची भावना पुरस्कारप्राप्त न्यायमूर्ती नरेंद्र
चपळगावकर यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांनी
चपळगावकर यांच्या लेखन साहित्यावर प्रकाश टाकला.
****
औरंगाबाद इंथ काल प्राख्यात शायर बशर नवाज यांच्या स्मरणार्थ बज्म -ए -बशर ग्रुप आणि आम्ही
परभणीकर सांस्कृतिक मंचच्यावतीनं ‘हे जगण्याचे भाषांतर’ या विषयावर मराठी गझल गायन
आणि सादरिकरण झालं. यात सतीष दराडे, राहुलदेव कदम आणि वैभव देशमुख यांनी बशन नवाज यांच्या
गझल, कवितांचं गायन, वाचन केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात भराडी इथं
बैलगाड्यांच्या शर्यतीत बैलांना अमानुष मारहाण करणाऱ्या दोन जणांविरूद्ध पोलिसांनी
गुन्हा दाखल केला आहे. दोन बैलगाड्यांसह चार बैलदेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
भराडीत आठवडी बाजाराच्या दिवशी ही बैलगाडी शर्यत सुरु होती. या शर्यतीदरम्यान, बैलांच्या
पाठीवर काठीने मारल्याचे आणि लोखंडी खिळा टोचल्याचे व्रण दिसून आल्यानंतर पोलिसांनी
प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
****
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ टिकला पाहिजे यांची काळजी
राज्यकर्त्यांनी केली पाहिजे असं मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त
केलं आहे. नांदेड इथं मराठी पत्रकार परिषदेच्या ४२ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप
प्रसंगी काल ते बोलत होते. प्रसारमाध्यमातले संपादक, पत्रकार, छायाचित्रकारांपासून
वितरकांपर्यंत प्रत्येक घटक महत्वाचा असल्याचं ते म्हणाले.
****
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या
निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्हा प्रशासनानं तामिळनाडूतल्या तिरुचिरापल्ली इथून मतदान
यंत्र ताब्यात घेतली आहेत. बेंगलोरच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतल्या पाच अभियंत्यांनी
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या
पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मतदान यंत्रांची तपासणी केली. मतदान यंत्रासंदर्भात
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनाचं काटेकोरपणे पालन केलं जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी
दीपा मुधोळ- मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल भाविकांचं वाहन उलटून झालेल्या
अपघातामध्ये तेरा जण जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी
हिंगोलीला हलवण्यात आलं आहे. सेनगाव तालुक्यात वरुड चक्रपान रस्त्यावर काल हा अपघात झाला. या जखमींना उपचारासाठी सेनगावच्या ग्रामीण
रुग्णालयात नेलं असता, तिथे डॉक्टर नसल्यानं, जखमींचे नातेवाईक तसंच शिवसेना कार्यकर्त्यांनी
ठिय्या आंदोलन केलं.
****
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
नांदेड इथं साहित्य संमेलनाचं आयोजन सत्यशोधक
विचार मंच आणि जन्मशताब्दी महोत्सव समितीनं केलं असून येत्या शनिवारी २४ तारखेला हे
संमेलन होईल. साहित्यिक प्राध्यापक डॉ. मच्छिंद्र सकटे यांचं
या संमेलनात बीजभाषण होणार आहे. या संमेलनात अण्णाभाऊ साठे : साहित्य, विचार आणि चळवळ
या विषयावर परिसंवाद होणार असून कथाकथनाचा कार्यक्रम ही होणार आहे.
****
जालना जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या चाळीस टक्क्यांहून
कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांश लघू आणि मध्यम प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. जिल्ह्याची
पावसाची वार्षिक सरासरी ६८८ पूर्णांक २१ मिलीमीटर असून, आजपर्यंत केवळ २७३ पूर्णांक
२५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. खरीपातल्या पिकांसाठी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची
प्रतीक्षा आहे. दरम्यान, जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे अंबड आणि घनसावंगी
तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
****
परभणी इथं घेण्यात आलेल्या आंतर जिल्हा बँटमिंटन
स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद मुंबई उपनगरच्या कौशल धर्मामेर यानं तर महिला एकरीचं
विजेतेपद पुण्याच्या पुर्वा भावे हिनं पटकावलं. काल या स्पर्धेचा बक्षिस वितरणासह समारोप
झाला. पुरुष दुहेरी प्रकारात ठाण्याच्या संघानं तर महिलांच्या दुहेरी प्रकारात पुण्याच्या
संघानं विजेतेपद पटकावलं.
****
झेक प्रजासत्ताकमध्ये सुरु असलेल्या मिंतिंक रीइटर-
२०१९ क्रीडा स्पर्धेत भारतीय धावपटू हिमा दासनं
महिलांच्या तर मोहम्म्द अनस यांनं पुरुषांच्या तीनशे मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण
पदक पटकावलं. पुरुषांच्या याच स्पर्धेत भारताच्या निर्मल टॉमनं कांस्य पदक मिळवलं आहे
*****
***
No comments:
Post a Comment