Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 01 January 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
संरक्षण व्यवहार विभाग आणि संरक्षण दल प्रमुख हे
पद, यांची निर्मिती ह्या महत्वपूर्ण आणि सर्वसमावेशक सुधारणा आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल
जनरल बिपिन रावत यांचं ट्विट संदेशातून अभिनंदन करताना पंतप्रधानांनी आज हे वक्तव्य
केलं. या सुधारणांमुळे सातत्यानं बदलणा-या युद्धस्थिती सदृष स्थितींचा सामना करण्यास
मदत होईल, असं पंतप्रधानांनी म्हटलं.
****
भारतानं चीनला लागून असलेल्या सीमेकडे अधिक लक्ष
देण्याची गरज आहे, असं मत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी व्यक्त केलं आहे.ते
आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आपल्या कार्यकाळात लष्कराची सज्जता आणि आधुनिकीकरण
याला प्राधान्य राहणार असल्याचं नमूद करत,भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी
सक्षम असल्याचं नरवणे यांनी यावेळी सांगितलं.
****
भारताच्या ”गगनयान” या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी
चार अंतराळवीरांची निवड करण्यात आल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोचे
प्रमुख के.सिवन यांनी दिली आहे.ते आज बेंगलुरु इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या अंतराळवीरांचं
प्रशिक्षण या महिन्याच्या तिस-या आठवड्यात सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
चंद्रयान ३ या मोहिमेला सरकारकडून मंजुरी मिळाल्याची
माहितीही सिवन यांनी यावेळी दिली.
****
जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा भागात
भारतीय सेनेच्या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झालं. आज सकाळी या भागात सुरू असलेल्या
एका शोध मोहिमेदरम्यान ही घटना घडली.ही मोहीम अजूनही सुरू आहे.
****
संपूर्ण देशभरात आतापर्यंत एक कोटीहून जास्त फास्टॅग्स
जारी करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे जलद गतीनं पथ कर संकलित करता यावा,
यासाठी सरकारनं वाहन मालकांना फास्टॅग अनिवार्य केला आहे. सध्या दररोज एक लाखाहून जास्त
फास्टॅग्स जारी करण्यात येत आहेत.
****
काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या एकोणीस समर्थकांना
अटक केल्याची माहिती पुणे पोलिसांनी आज दिली. थोपटे यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात
समावेश न झाल्यानं नाराज कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातल्या कार्यालयात
काल तोडफोड केली होती. काल रात्री या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून नंतर त्यांची
जामिनावर मुक्तता करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं
****
पनवेल ते नांदेड या मार्गावर आठ साप्ताहिक विशेष
गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. या महिन्याच्या चार ते सव्वीस तारखांदरम्यान
या विशेष गाड्या चालणार असून, नांदेडहून पनवेलला जाणारी गाडी दर शनिवारी संध्याकाळी
साडेपाच वाजता तर पनवेलहून नांदेडला जाणारी गाडी दर रविवारी सकाळी दहा वाजता सुटणार
आहे.
****
राज्यात काल थंडीचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं. राज्याचं
सरासरी कमाल तापमान अट्ठावीस तर सरासरी किमान तापमान चौदा अंश सेल्शियस इतकं होतं.
राज्यातलं कालचं सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर इथे,पाच पूर्णांक सात अंश सेल्शियस
इतकं नोंदलं गेलं. उद्या सकाळपर्यंत मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलका पाऊस होईल,
अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
जंगलांखेरीज इतर भागातल्या वृक्षांच्या संख्येसंदर्भात
महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. केंद्रशासनानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन
सर्वेक्षण अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ या वर्षात राज्यातल्या
वनेतर भागातल्या वृक्षाच्छादनात नऊशे पंचाहत्तर चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे. राज्यातल्या
जंगलक्षेत्रातल्या वृक्षाच्छादनातही शहाण्णव चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली आहे. राज्यातल्या
कांदळवन क्षेत्रातही सोळा चौरस किलोमीटरनं वाढ झाली असून, याबाबतीत राज्य देशात दुस-या
क्रमांकावर असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
****
रायगडच्या पर्यटनवृध्दीसाठी लवकरच रेवस-करंजा पुलाची
उभारणी करण्यात येईल असं आश्वासन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिलं आहे.कालपासून
सुरू झालेल्या मुरुड महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रेवस-करंजा पूल रायगडला
मुंबईशी जोडणारा महत्वाचा दुवा ठरेल, असं त्यांनी म्हटलं.
****
No comments:
Post a Comment