Sunday, 19 January 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.01.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जानेवारी २०२० सायंकाळी ६.००
****

 आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातली सर्व उपकेंद्रं, प्राथमिक आरोग्य केंद्रं तसंच नागरी आरोग्य केंद्रांचं आरोग्यवर्धिनी केंद्रांत रूपांतर केलं जात आहे. अशा प्रकारची साडे सहा हजार आरोग्यवर्धिनी केंद्रं तयार केली जात असून, मार्च अखेर ही सर्व केंद्रं कार्यान्वीत होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

 या केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवांसह आपत्कालीन सेवा दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद  आणि नंदुरबार हे चार आकांक्षित जिल्हे तसंच लातूर, नांदेड, हिंगोली आणि अहमदनगर सह १९ जिल्हयातल्या एकूण तीन हजारावर  आरोग्य केंद्रांचं आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जालना, बीड, परभणी या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसह उर्वरित जिल्ह्यात ही केंद्रं सुरू होणार असल्याचं, टोपे यांनी सांगितलं.
****

 पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज मराठवाड्यासह राज्यभरात राबवण्यात आली. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वत्र शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला.
****

 परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरातले सुमारे अडीच हजारावर विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील, तर काही विद्यार्थी पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकणार आहेत. नांदेड इथली विद्यार्थिनी ऐश्वर्या मुंडकर सहभागी होत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असून, हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण असेल, या शब्दात ऐश्वर्याने आकाशवाणी प्रतिनिधीशी बोलताना आपली भावना व्यक्त केली. ती म्हणाली....

 परीक्षापे चर्चा एक अतिशय वेगळा आणि व्यापक कार्यक्रम आहे. परीक्षा फक्त गुण मिळवण्यासाठीची घोडदौड आहे, हा समज दूर सारूण त्यात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा हा अतिशय यशस्वी प्रयत्न आहे.  माझी आजी भागिरथी बाई मुंडकर तीला याबाबतीत कळताच तिच्या आनंदाला पाळावळ नव्हता. त्यामुळे सुद्धा माझा आनंद द्वविगुणीत झाला. हा माझ्यासाठी एक सणस्मरणीय अनुभव असेल.
****

 शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटी आज घेण्यात आली. हिंगोली इथं, परीक्षेसाठी दहा मिनिटे उशिरा पोहोचलेल्या परीक्षार्थींना केंद्रप्रमुखांनी नियमावली दाखवत परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला. त्यामुळे पंचवीस परीक्षार्थींना ही परीक्षा देता आली नाही, त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहिलेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राजवळ गोंधळ घातला, या प्रकरणामुळे परीक्षा केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता, असं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****

 हिंगोली इथले ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जी. आर. गांजापूरकर याचं आज जालना इथं प्रदीर्घ आजारानं निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. हिंगोलीच्या अग्रवाल समाजाचे अध्यक्ष, लायन्स क्लब हिंगोलीचे अध्यक्ष, लायन्स क्लब महाराष्ट्राचे पदाधिकारी, जिल्हा डॉक्टर संघटनेचे पदाधिकारी आणि अन्य अनेक सेवाभावी संस्था, संघटना, च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला होता.
****

 गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं आतापर्यंत ५२ सुवर्णपदकं जिंकत पदकांवरचे वर्चस्व कायम राखले आहे.

 सतरा वर्षांखालील खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने दिल्लीला पराभूत करत सुवर्ण पदक मिळवलं, भारोत्तोलनामध्ये किरण मराठे आणि अभिषेक निप्पणे यांनी महाराष्ट्रासाठी दोन सुवर्ण पदक जिंकले. खो खो, लॉन बॉल्स, बॉक्सिंग, कुस्ती, जलतरण, यासह फुटबॉल सामने वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहेत.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...