आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज संपूर्ण देशभर राबवण्यात
येत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेची, सर्व आरोग्य केंद्रं, रेल्वेस्थानक, बसस्थानक
तसंच बाजारपेठांमध्येही केंद्रं उभारून ही लस देण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी आपल्या
पाच वर्षांपर्यंतच्या बाळांना ही लस जरूर देऊन घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या "परीक्षा पे चर्चा" या
कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत संवाद साधणार
आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्लीत होणार आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये या
कार्यक्रमाची उत्सुकता वाढली असून, देशभरातून दोन हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक
आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गेल्यावर्षीही जानेवारीमध्ये परीक्षा
पे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उद्या
सोमवारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी फडणवीस हे पक्ष बांधणी मेळाव्यास
मार्गदर्शन करतील, तसंच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नांदेड शहरातील जनसंपर्क
कार्यालयाचं उदघाटनही करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये आज फुटबॉल, हॉकी
आणि खो-खो या खेळांसाठीच्या अंतिम स्पर्धा होतील. विविध वयोगटांसाठीच्या या स्पर्धा
असून, जलतरण आणि भारोत्तोलन, तसंच कुस्तीत कोण पदकं पटकावणार, याचाही निर्णय आज होईल.
काल महाराष्ट्रानं २१ वर्षांखालील वयोगटात खो-खो या खेळात सुवर्णपदक
मिळवलं. खेलो इंडिया या स्पर्धेनं खो-खो या खेळासाठी विशेषतः ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी
मोठं दालनच उघडून दिल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या खो-खो पुरूष संघाचे प्रशिक्षक
जतीन यांनी दिली.
या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्र १७१ पदकांसह अव्वलस्थानी असून,
हरियाणा दुसऱ्या, तर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
****
No comments:
Post a Comment