Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 August 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४
ऑगस्ट
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाची सर्व तयारी पूर्ण.
·
फेरीवाले आणि रस्त्यांवर सामान विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसल्यानं,
त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नसल्याचं, राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात
शपथपत्र.
·
व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक
सूचना जारी.
·
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात
असल्याचं, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण.
·
राज्यात आणखी आठ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २६६ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू.
·
औरंगाबाद आणि लातूरमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड चार तर उस्मानाबाद आणि परभणीत
प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू, बीडमध्ये ५६, जालना ४२ आणि हिंगोलीत सात नवे रुग्ण.
आणि
·
राखी पौर्णिमा देशभरात उत्साहात साजरी.
****
अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाची सर्व तयारी पूर्ण
झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अयोध्येत जाऊन तिथल्या
तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही काल जाहीर करण्यात आली. या
तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आज दुसऱ्या दिवशी सहा तासांचा विशेष राम रचा अनुष्ठान आयोजित
केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार
आहेत. या सोहळ्यावेळी एकशे पस्तीस संत उपस्थित राहणार आहेत. अयोध्येमधे सध्या उत्सवाचं
वातावरण असून लोक भूमीपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत
राममंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार नाहीत, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते
खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या सोहळ्याला
पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत, हे अधिक महत्त्वाचं आहे, उद्धव ठाकरे नंतर कधीही अयोध्येत
जाऊ शकतात, असं सांगत राऊत यांनी या भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, फेरीवाले आणि रस्त्यांवर सामान
विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसल्यानं, त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देता
येणार नसल्याचं, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गामुळे
लागू टाळेबंदीत अशा विक्रेत्यांकडे उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात
याचिका दाखल करून, शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. या याचिकेसंदर्भात राज्य सरकारनं
शपथपत्र दाखल केलं आहे. पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवर आधीच अतिरिक्त ताण असून, असंघटीत
क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या या व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम, आवाक्याबाहेरचं
असल्याचं शासनानं नमूद केलं.
****
उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक
सूचनानुसार स्पा-साउनासह, बाष्प स्नान आणि जलतरण तलाव बंद ठेवावे लागणार आहेत. प्रवेशद्वारावर
सॅनिटाइजरसह तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर असणं बंधनकारक आहे. कोविड-19 संसर्गाची
लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश देणं, साधनसामग्रीचं निर्जंतुकीकरण करणं, प्रत्येक व्यक्तीसासाठी
चार चौरस मीटर जागा असणं, एकमेकांमध्ये सहा फुट अंतर राखणं, मास्क ऐवजी चेहऱ्यावर
पारदर्शक आवरण-फेस शिल्ड घालणं बंधनकारक असणार आहे. ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा
कमी असणाऱ्यांना याठिकाणी व्यायाम करता येणार नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह
गर्भवती महिला आणि दहा वर्षांखालील मुलांना व्यायामशाळेत बंदी असेल. प्रतिबंधीत-कंटेनमेंट
क्षेत्रातल्या व्यायामशाळा आणि योग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचं या
मार्गदर्शक सूचनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना
सहकार्य केलं जात असल्याचं, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. या
तपासकार्यात कायदेशीर बाबींचं योग्य पालन करण्याच्या सूचना त्यांनी बिहार पोलिसांना
केल्या आहेत. सुशांतसिंह यांचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद असून, मृत्यू कोणत्या
परिस्थितीत झाला, याचा शोध घ्यायचा असल्याचं, परमबीरसिंह म्हणाले. सुशांतच्या मृत्यूच्या
आदल्या दिवशी त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नाही, तसंच आपल्या तपासात कोणत्याही
राजकीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
या तपासासाठी बिहारहून आलेल्या तपास पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्याला मुंबई पोलीस
आणि मुंबई महानगरपालिकेनं विलगीकरणात ठेवल्याप्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी
टीका केली आहे. या दोन्ही संस्थांची अशी भूमिका असल्यास, या प्रकरणाचा तपास कसा होणार,
असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत असल्याचं, राज्याचे
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचं संकट अजून टळलं नसून, अतिहत्वाच्या व्यक्तींनाही या
विषाणूचा संसर्ग होत आहे, त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये आणि अनावश्यक प्रवास टाळावा
असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या
येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करत असून, लोकांनी अनावश्यक प्रवास, गर्दी आणि
रहदारी कमी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. गावपातळीवर कोरोना दक्षता समिती स्थापन
करण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
राज्यात काल आणखी आठ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे
राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ५० हजार १९६ झाली आहे. तर काल २६६ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. तर काल दहा हजार २२१ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. राज्यात आतापर्यं दोन लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे झाले असून, सध्या एक लाख ४७ हजार
१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारामुळं आतापर्यंत ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल दिवसभरात आणखी ३४१ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या १४ हजार ८९४ झाली आहे. तर काल ३२८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात
आलं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार २२९ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, सध्या
तीन हजार १७८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे
जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या १०३ झाली आहे. तर काल जिल्ह्यात एकूण ७८ नवे रुग्ण आढळले,
यात ७२ रुग्ण हे अगोदरच्या रुग्णांच्या संपर्कातले आहेत तर सहा रुग्ण हे नवीन आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ५४७ झाली आहे. त्यापैकी चौदाशे रुग्ण
बरे झाले असून, लातूर जिल्ह्यात सध्या सध्या एक हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या
एकूण मृतांची संख्या ९४ झाली आहे. तर काल आणखी २०३ रूग्णांची नोंद झाली. यातले १२४
रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर ७९ रुग्ण ॲन्टीजेन चाचणीत बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३५९ झाली आहे. तर काल जिल्ह्यात ६६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
घरी सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २० रुग्ण बरे झाले असून, सध्या
एक हजार २३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी नऊ बाधित रुग्ण आढळले.
त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७५ झाली आहे. त्यापैकी ५२२
रुग्ण बरे झाले असून, सध्या ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात
या आजारानं आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित
रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७२० झाली आहे. तर काल तीन रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३९५ रुग्ण बरे झाले असून,
सध्या २८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ९६० झाली आहे. त्यापैकी ४२८ रुग्ण बरे झाले असून, ३४ जणांचा मृत्यू
झाला. जिल्ह्यात सध्या ५०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात
अँटिजेन चाचणीत ११ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार
३७७ झाली आहे तर काल १२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात
आतापर्यंत एक हजार ५६२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ७४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या ७१६ झाली असून, सध्या २०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परवा सहा ऑगस्टपासून
१९ ऑगस्टपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयंवशी यांनी
काल ही माहिती दिली. अनेक मोबाईल संदेशाद्वारे गैरसमज पसरत असल्यामुळे त्यावरही स्वयंस्फूर्तीने
प्रतिबंध घालावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
मुंबईत काल ९७० रुग्ण आढळले. पुणे जिल्ह्यात काल एक हजार ९९८ नवे रुग्ण आणि
४५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल आणखी एक हजार १८ रुग्ण आढळले, तर अकरा
जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ३३२, अहमदनगर ४५३, रायगड ३८३, सांगली ३५४,
नागपूर २४६, सोलापूर १९३, सातारा १४८, अमरावती ९६, वाशिम ९२, यवतमाळ ८९, गोंदिया २२,
तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२
टक्के झालं असून, मृत्यूदरही कमी झाला असल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
केला आहे. लोकप्रतिनिधींसोबत कोविड19 परिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते
बोलत होते. नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती विकसित होत असल्यानं, रोगप्रतिकारक तपासणीसाठी
सर्वेक्षण करुन चार ते पाच हजार निवडक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांची तपासणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय- घाटीच्या प्रयोगशाळेत केली जाईल, असं ते म्हणाले.
दिल्लीच्या धर्तीवर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी वाळूज-बजाज महानगर,
महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण अशा तीन विभागांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली
असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सलग दुसऱ्यांदा
उदगीर इथल्या युवकांनी प्लाझ्मा दान केला आहे. दात्यास कसलाही धोका नसल्यानं उत्स्फुर्तपणे
प्लाझ्मा दान करा आणि प्लाझ्मा योद्धा बना असं आवाहन, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय
विज्ञान संस्थेचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता, डॉक्टर मोहन डोईबळे यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथील
करावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा, लातूर
जिल्हा शहर भारतीय जनता पक्षानं दिला आहे. जिल्ह्यात सततच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट
असणारे कामगार, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. टाळेबंदीच्या काळात
शहर परिसराअंतर्गतच कडक नियम करण्यात आले असून, जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी मात्र शिथिलता
आहे. त्यामुळे आता शहराअंतर्गतही टाळेबंदी शिथील करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे शहर
जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गमुक्त झाल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष
आमदार बाबाजानी दुर्राणी यांना काल संध्याकाळी औरंगाबाद इथल्या खाजगी रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. काल त्यांचा दुसरा चाचणी अहवाल नकारात्मक आला होता.
****
राखी पौर्णिमा अर्थात रक्षा बंधनाचा सण काल देशभरात उत्साहात साजरा झाला. कोरोना
विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यावर मर्यादा
आली, मात्र, डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण आणि संपर्कामुळे
यात थोडासा दिलासा मिळाल्याचं दिसून आलं. नारळी पौर्णिमा म्हणून विशेषत: राज्याच्या
समुद्र किनाऱ्यावरच्या कोळी बांधवांसाठी महत्वाच्या या दिवशी समुद्राला नारळ अर्पण
करुन पूजन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी परवा ६ ऑगस्टपासून राज्यभरात विविध प्रकारची
आंदोलनं छेडली जाणार असून, ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून आंदोलनं अधिक तीव्र होतील,
असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. नाशिक इथं काल
मेटे यांच्या अध्यक्षतेखाली छावा युवा संघटना, छावा श्रमिक सेना, शिव क्रांती सेना,
बळीराजा अशा विविध नऊ संघटनांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर त्यांनी
वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
****
औरंगाबाद शहरातील हर्सुल तलाव पूर्ण भरल्यानंतर पाणी खामनदी पात्रात न सोडता
तलावाची क्षमता वाढवून, साठवलेलं पाणी फिल्टर करुन लगतच्या सर्व वार्डातील नागरीकांना
पोहोचवण्यावर भर देण्यात यावा अशी चर्चा औरंगाबादचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त
तसंच संबंधित अधिकाऱ्यांसोबत झाल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काल त्यांनी, तलाव भरल्यानंतर सोडण्यात
येणाऱ्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या खामनदी पात्रालगतच्या हिलाल आणि जलाल कॉलनी भागाची
पाहणी करुन स्थानिक लोकांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना युध्दस्तरावर
उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात कपात
करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पातून तीन हजार ८०८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पूर्णा
नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं १४ दरवाजे
बंद करण्यात आले असून, आता फक्त पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment