Thursday, 17 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 17.06.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 June 2021

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      नव्या माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्यामुळे, केंद्र सरकारनं ट्वीटरचं कायदेशीर संरक्षण हटवलं.

·      कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, आवश्यक औषधी आणि वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेबाबत काळजी घेण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना.

·      मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा निर्णय.

·      राज्यात १० हजार १०७ नवे कोविड रुग्ण; मराठवाड्यात २८ जणांचा मृत्यू तर ५५२ बाधित.

आणि

·      कोणताही ठोस तोडगा न निघाल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचा निर्धार.

****

केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान-आयटी मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्यामुळे, केंद्र सरकारनं ट्वीटरचं कायदेशीर संरक्षण काढून घेतलं आहे. यासंदर्भात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करुन माहिती दिली. ट्विटरला नवीन आयटी नियमांचं पालन करण्यासाठी अनेक संधी दिल्या गेल्या होत्या. मात्र, त्यांनी जाणूनबुजून नियमांचे पालन केलं नाही, असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. भारताची संस्कृती आपल्या विशाल भूभागाप्रमाणे विस्तृत आहे. काही वेळा फेक न्यूजची एक छोटीशी ठिणगीही मोठं स्वरुप धारण करू शकते. या बाबी नवीन नियमावलीमध्ये आवश्यक म्हणून देण्यात आल्या असल्याचं, प्रसाद यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, आवश्यक ती औषधी आणि वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता राहील, तसंच ग्रामीण भागातही त्याचा पुरेसा साठा राहील, याची काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्या. टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणं, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करण्यावर भर देताना निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असल्याचं, यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी सांगितलं. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत, तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्यानं तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या परत दुपट्टीनं वाढू शकते, अशी भीती यावेळी आरोग्य विभागानं व्यक्त केली.

****

मराठा आरक्षण प्रकरणी कोल्हापूरमधल्या मूक आंदोलनानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला आहे. आज किंवा उद्या ही भेट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक, रायगड. अमरावती आणि औरंगाबाद इथले मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कालच्या मूक आंदोलनानंतर त्यांनी आपली ही भूमिका स्पष्ट केली. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनीही काल आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका मांडली. आरक्षण मिळवण्यासाठी खासदारांनी केंद्राकडे आग्रह धरावा, कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली, तर हा विषय लवकर सुटू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कालच्या आंदोलनात समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदी सहभागी झाले होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून, संभाजीराजे यांना मुंबईत येऊन मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचं आवाहन केलं होतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आंदोलनाला पाठिंबा देणारं पत्र, खासदार संभाजी राजे यांना दिलं.

****

मराठा आरक्षणा संदर्भात लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी, शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. त्यांनी काल यासंदर्भातलं लेखी निवेदन बिर्ला यांना दिलं. या अधिवेशनात इतर मागासवर्गीय-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरही चर्चा करण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या पाच जुलै पासून मुंबईत सुरु होणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

****

औरंगाबाद मधील अजिंठा - वेरूळ लेणी, बिबी का मकबरा, औरंगाबाद लेणी आणि दौलताबाद किल्ला ही पर्यटनस्थळे कालपासून खुली करण्यात आली आहेत. काल या पर्यटनस्थळांची साफसफाई करण्यात आली. आजपासून दोन सत्रात पर्यटकांना या ठिकाणी भेट देता येणार आहे. पर्यटकांनी या ठिकाणी भेट देतांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. ते म्हणाले –

सकाळच्या सत्रामध्ये एक हजार लोकं, दुपारच्या सत्रात एक हजार लोकं, अशी दोन हजार लोकं याला भेट देवू शकतील, ऑनलाईन बुकींगच्या सुविधेमध्ये ही मर्यादा घालूनच पर्यटकांना तिकीटं किंवा बुकींग दिलं जाईल. तिथं जे कोविड अप्रोपिअट बिहेविअर आहे, म्हणजे मास्क वापरणे, दो गज की दूरीचं अंतर ठेवणे, त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरणे हे अनिवार्य आहे. किंवा तिथं व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत, छोटे - मोठे खेळणे विक्रेते आहेत, काही फूड स्टॉलचे लोकं आहेत. गाईड आहेत, या सगळ्यांच्या बाबतीत आरटीपीसीआर टेस्टींग महत्वाची आहे. दोन डोस पूर्ण झाले असतील व्हॅक्सिनेशनचे त्यांना काही सिमटंन्स नसतील तर त्यांना टेस्टींगची काही आवश्यकता नाही.

****

विद्यार्थ्यांसाठी पहिले पंधरा दिवस आणि पुढील एक महिन्यात मागील वर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी वर्ग घेण्यात येणार असल्याची माहिती, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातल्या शाळा दरवर्षी सर्वसाधारणपणे १५ जूनला तर विदर्भात २६ जून पासून सुरु होतात. त्या प्रमाणे राज्यातल्या काही शाळांची ऑनलाईन सुरुवात झाली असून, गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचं नवीन शैक्षणिक वर्षात स्वागत केलं आहे. या वर्षी ब्रीज कोर्सची सोय उपलब्ध केली आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्याला नववीचा अभ्यासक्रम शिकून सत्र दहावी साठी लागणारा पाया मजबूत केला जाणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीमुळे राज्य सरकारनं यावर्षी चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या दोन्ही परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र यापूर्वीच एलिमेंटरी परीक्षा दिलेल्या १० वीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला मिळालेली श्रेणीच इंटरमीडिएटसाठी दिली जाणार आहे. त्याकरता असलेले अतिरीक्त गुणही त्यांना यंदाच्या वर्षी १० वीच्या परीक्षेत दिले जाणार आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भातला शासन आदेश काल जारी केला.

****

शिक्षक पात्रता परीक्षा - टीईटीला आव्हान देणाऱ्या आणि उत्तीर्ण होण्यासाठी मुदतवाढीची मागणी करणाऱ्या ८९ याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळून लावल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यान्वये टीईटी परीक्षा देणं बंधनकाकर असून, ही परीक्षा न दिलेल्या शिक्षकांना ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत आणखी वाढवण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.

****

राज्यात काल १० हजार १०७ नवे कोविड रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ३४ हजार ८८० झाली आहे. काल २३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख १५ हजार ३९० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ९४ शतांश टक्के झाला आहे. काल १० हजार ५६७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५६ लाख ७९ हजार ७४६ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक ७० शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख ३६ हजार ६६१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल ५५२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर २८ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नऊ, लातूर आठ, औरंगाबाद पाच, बीड चार, तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात १६५ नवे रुग्ण आढळले. उस्मानाबाद ११५, औरंगाबाद १००, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ५३, जालना ४०, परभणी २१, तर हिंगोली जिल्ह्यात पाच नवे रुग्ण आढळले.

****

कोविडवरील औषध वितरणासंदर्भात काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सोनू सूद यांची भूमिका तपासण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. हे लोक औषधं तपासत नाहीत आणि पुरवठा कायदेशीर आहे की नाही, याची पडताळणीही करत नाहीत, असं निरीक्षण न्यायमूर्ती एस देशमुख आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठानं नोंदवलं. कोरोनावरील समस्यांबाबत दाखल अनेक जनहित याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं, राजकारणी आणि अभिनेत्यांना कशा प्रकारे कोरोनावरील औषध कशी मिळतात, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

****

राज्य शासनानं कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्धार, आशा आणि गटप्रवर्तक संघटनेनं व्यक्त केला. राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आशा कर्मचाऱ्यांना सध्या पगार वाढ देता येणं शक्य नसल्याचं, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात कृती समितीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. आशा आणि गटप्रवर्तक कार्यकर्त्यांना किमान वेतन द्यावं, कोरोना संबंधित काम करण्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन विशेष भत्ता द्यावा, आरोग्य खात्याच्या नोकर भरतीत आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांना प्राधान्य देण्यात यावं, आदी मागण्यांसाठी १५ तारखेपासून, संघटनेनं राज्यात बेमुदत संप सुरू केला आहे.

****

राज्यात जीवन्नोन्नती अभियान - उमेद अंतर्गत कुटुंबांचा आरोग्य आणि पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी, ‘माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’, १५ जुलैपर्यंत राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून राज्यात दोन लाख ६३ हजार २५० सेंद्रिय पोषण परसबागा तयार केल्या जाणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सेंद्रिय पोषण परसबाग विकसन मोहिमेसाठी, सात हजार कुटुंबांमध्ये पोषण परसबागा तयार करण्यात येणार आहेत. यासाठी गाव पातळीवर कार्यरत चौदाशे संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून सेंद्रिय पद्धतीनं सात हजार पोषण परसबागांची निर्मिती जिल्ह्यातील सर्व गावात उमेद महिला बचत गटांच्या माध्यमातून केली जात आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –

या पोषण परसबागामुळे प्रत्येक कुटुंबाचा रसायनमुक्त भाजीपाल्यावरील वार्षिक सरासरी सहा ते आठ हजार रुपये खर्चात बचत होणार असून या माध्यमातून सात हजार कुटुंबामधे कमीत कमी चार कोटी वीस लाख रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. तसंच या पोषण परसबागांच्या माध्यमातून पिकवलेल्या सेंद्रीय भाजीपाल्यामुळे जिल्ह्यातील सातशे गावातील महिलांना परसबागातील विषमुक्त हिरवा भाजीपाला मिळणार असून त्यामुळे महिला आणि स्तनदा माता, गर्भवती मातांना लाभ होऊन बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण तसंच महिलांमधील ब्लड एनिमिया कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे निती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीतून उस्मानाबाद जिल्हा बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद

****

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा नगर परिषदेच्या दर्जात वाढ करून तो 'ब' वर्ग करण्यात यावा, अशी मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे. सध्या ही नगरपरीषद ‘क’ वर्ग दर्जाची आहे. चौगुले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना या मागणीचं पत्र दिलं आहे. दर्जावाढ झाल्यास शासनाकडून येणाऱ्या अनुदानात वाढ होऊन, यातून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं सोयीचं होईल, असं या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे. यासाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन, नगरविकास मंत्री शिंदे यांनी दिलं.

****

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितलं. सध्या जिल्ह्यात साथ आटोक्यात आली असून नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा तसंच त्रिसुत्रीचा अवलंब करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे. जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे रूग्ण संख्या देखील कमी होत असून या रूग्णांची शस्त्रक्रिया आता बीड मध्येच होणार असल्याचं डॉक्टर साबळे यांनी सांगितलं. ते म्हणाले –

भाकित केलं जातं की तिसरी लाट येणार. त्यामधे पेडियाट्रिक ग्रुप जो आहे १२ वर्षापर्यंतची मुलं वगैरे ही जास्त प्रमाणात इन्फेक्ट होतील असा एक अंदाज आहे. त्यामानानं आम्ही जिल्हाभरामधे ५६० बेड पेडियाट्रिक एज ग्रुपसाठी रिझर्व करून ठेवले आहे, ऑक्सिजन बेड. आणि प्रत्येक जिल्हा रुग्णालयामधे ५० खाटांचे आयसीयु ची तयारी करून ठेवली आहे. जिल्हा रुग्णालयामध्येच म्युकर मायकोसिसचं एक युनिट स्थापन केलं. एक ऑपरेशन थिएटर कार्यान्वित केलेलं आहे. त्यामधे त्याला लागणाऱ्या मोटेरेसिन बी इंजेक्शनचा स्टॉक आणून ठेवलेला आहे. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर जिल्हा रुग्णालय येथे सर्वप्रकारचे निदान आणि उपचार करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या गुंठेवारी आणि अकृषक जमिनीबाबत शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश, पालकमंत्री अमित देशमुख यांनी एका आढावा बैठकीत दिले आहेत. संबंधित नागरिकांचे अर्ज नियमानुसार आणि दिलेल्या मुदतीत निकाली काढावेत, तसंच नागरिकांना याबाबत त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं ते म्हणाले. लातूर जिल्ह्यातल्या आरोग्य विभागात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोविड चाचणी न करता दुकानं सुरु ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिला आहे. ग्रामीण भागातलं कोरोना विषाणू बाधितांचं प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्याचं प्रमाण वाढवणं आवश्यक असून, त्यानुसार व्यापारी, दुकानदार, ग्रामस्थांच्या सहभागातून चाचण्यांनी मोहिम राबवण्याचे निर्देश त्यांनी काल दिले.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...