Saturday, 21 August 2021

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.08.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ ऑगस्ट २०२१ सकाळी ७.१० मि.

****

देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-१९ प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरुणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

ठळक बातम्या

·      जनतेचं हित आणि विकासाच्या आड कुणालाही येऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही 

·      माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राज्यसरकार राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्काराने गौरवणार

·      राज्यात नवे चार हजार ३६५ कोविड रुग्ण; मराठवाड्यात काल पाच जणांचा मृत्यू तर नव्या १८५ बाधित

·      बीड मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार शांताबाई कोटेचा यांचं वृद्धापकाळानं निधन

·      बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

·      मराठा बांधवांच्या संयमाची परीक्षा पाहू नका - खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा इशारा

आणि

·      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथं आज फिट इंडिया फ्रिडम रनचं आयोजन

****

राज्यातल्या विकास कामांसाठी केंद्र शासनाला आवश्यक ते सहकार्य करू, जनतेचं हित आणि विकासाच्या आड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पातल्या काही मार्गांचं काल उद्घाटन झालं, या सोहळ्यात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या वाहतूक आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिलं.

 

दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विदर्भ सहायता सोसायटी आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमानं, दोनशे सद्भावना जीवनरथ लसीकरण वाहनांचं, काल नागपूर इथं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आलं, या कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. सद्भावना जीवनरथाच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात लसीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार असल्याचं, थोरात यांनी यावेळी सांगितलं. या दोनशे वाहनांपैकी नागपूर विभागासाठी १२८ तर अमरावती विभागासाठी ७२ वाहनं कार्यरत राहणार आहेत.

****

राज्यातल्या मनोरुग्णालयांसाठी दीड हजार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात, ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला टोपे यांनी काल भेट देऊन, मनोरुग्णालयातील रुग्णांची व्यवस्था, उपलब्ध मनुष्यबळ, तसंच सोयीसुविधांची पाहणी केली. या मनोरुग्णालयातील रिक्तपदांवर तातडीनं नेमणुका करण्यात याव्या अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी केल्या. मनोरुग्णालयातील रुग्णांची प्रवेश प्रक्रिया सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी सुधारित नियमावली प्रमाणे "वॉलन्ट्री बोर्ड" तसंच जिल्हानिहाय "रिव्ह्यूह बोर्ड" तातडीनं स्थापन करणार असल्याचं, टोपे यांनी यावेळी सांगितलं.

****

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी, तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या उपक्रमशीलतेत वाढ, माहिती तंत्रज्ञानाचा गतिमान वापर होण्यासाठी प्रोत्साहन, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक रोजगार निर्मिती, तसंच पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन, अशा विविध पाच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना, हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे.

****

दरम्यान, राजीव गांधी यांची जयंती काल देशभरात 'सद्भावना दिवस' म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त येत्या पाच सप्टेंबरपर्यंत, 'सामाजिक ऐक्य पंधरवडा' पाळला जाणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनी राजीव गांधी यांना अभिवादन केलं.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त दिल्ली गेट इथल्या राजीव गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

बीड तसंच परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातही राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली.

****

राज्यात काल चार हजार ३६५ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६४ लाख १५ हजार ९३५ झाली आहे. काल १०५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३५ हजार ६७२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. काल सहा हजार ३८४ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६२ लाख २१ हजार ३०५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ९७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ५५ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल १८५ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या दोन, तर औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९३ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ७०, औरंगाबाद ११, लातूर सहा, नांदेड तीन, तर जालना जिल्ह्यात काल दोन रुग्ण आढळले. परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सांगली जिल्ह्यात झरे परिसरात पोलिसांना हुलकावणी देत, बैलगाडी शर्यत घेतली. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असल्यामुळे बैलगाडी शर्यत होऊ द्यायची नाही, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनानं या परिसरात संचारबंदी लागू केली होती, ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती, मात्र तरीही झरे गावाच्या हद्दीवर वाक्षेवाडी पठारावर, बैलगाडी शर्यत घेण्यात आली.

दरम्यान, पडळकर यांनी राजकीय स्टंटबाजीसाठी शर्यत घेतल्याची टीका, मनसेचे सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी केला आहे. सावंत यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही शेतकऱ्यांसह सांगली जिल्हाधिकारी कार्यालया समोर, पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सर्वोच्च न्यायालयात बैलगाडी शर्यतीसंदर्भात सुरू असलेल्या खटल्यात या शर्यतीमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो, असं मत व्यक्त करण्यात आलं आहे.

****

बीड मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार शांताबाई कोटेचा यांचं काल वृद्धापकाळानं पुण्यात निधन झालं, त्या ९५ वर्षांच्या होत्या. १९५२ साली त्यांनी बीड नगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली होती. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. १९५७ साली बीड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून त्या बीडच्या पहिल्या महिला आमदार झाल्या. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 

****

बुलडाणा जिल्ह्यात काल मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा भीषण अपघात होऊन, १३ मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले. सिंदखेडराजा - मेहकर महामार्गावर तढेगाव फाटा या ठिकाणी काल हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांसह लोखंडी गज आणि सिमेंटची पोती घेऊन जाणारं हे वाहन, समोरून येणाऱ्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नांत रस्त्याच्या खाली उलटल्यानं, वाहनातले मजूर लोखंडी गजांखाली दबले गेले. अपघातग्रस्त सर्व मजूर मध्यप्रदेशातले असून, जखमींवर जालना इथं उपचार सुरू आहेत, तर सर्व मृतदेह जालना जिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तसंच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

****

सकल मराठा समाज शांत आणि संयमाने आपला अधिकार मागत असून, त्याच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे, नांदेड इथं काल सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मूक आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून केंद्र आणि राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता समाजाला आरक्षण देण्यासाठी निर्णायक भूमिका घ्यावी, असं आवाहन, संभाजीराजे यांनी यावेळी केलं. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आंदोलनाच्या वेळी हजर राहिले नाहीत, याबद्दल त्यांनी जोरदार टीका केली. या मूक आंदोलनात इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

****

नवनियुक्त केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा काल औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाली. परळी इथल्या गोपीनाथगडावरून सुरु झालेल्या आणि पाच जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आलेल्या या यात्रेचा आज कन्नड इथं समारोप होणार आहे. काल औरंगाबाद इथं बोलताना कराड यांनी औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न प्राधान्यानं सोडवणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –

शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल, टुरिझम असेल, मनपाच्या माध्यमातून कामं करायची असतील पाणी सप्लाय असेल, यामध्ये विशेष मी लक्ष देणार आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून आठ दिवसाला पाणी येतंय. १६८० कोटीची पाणी योजना मंजूर झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलं. पण पाहिजे तसं काम झालं नाहीये. त्याचासुद्धा आढावा मी लवकरच घेणार आहे. आणि शहरामधे पाणी याला प्राधान्य देईल. आणि बाकीच्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देऊन शहराचा विकास हा माझा प्राधान्य असेल. एक आराखडा तयार करून या शहराचा आणि या मराठवाड्याचा विकास कसा होईल हे मी करणार आहे.

****

केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा काल दुसरा दिवस होता. त्यांनी मुंबईत अनेक भागांना भेट देऊन नागरीकांशी संवाद साधला.

केंद्रीय कुटुंब कल्याण आणि आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची जन आशीर्वाद यात्रा काल धुळे जिल्ह्यात पोचली. यात्रेदरम्यान काल दोंडाईचा शहरात रॅली काढली गेली.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशातल्या तरुणाईला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देण्यासाठी, देशातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ७५ ठिकाणी, फिट इंडिया फ्रिडम रन आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगानं नेहरु युवा केंद्राच्या वतीनं आज औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत, या दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सव्वा आठ वाजता ही दौड होणार असल्याचं, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांनी सांगितलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या बामणी गावचे जवान सुधाकर शिंदे यांना छत्तीसगड मधल्या नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आलं. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे काल सलग दुसऱ्या वर्षी मुहर्रम साध्या पद्धतीने पाळण्यात आला. मातमी जुलूस, मजमा भरवण्यास पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. औरंगाबाद इथं शिया बांधव कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत मजलिसमध्ये सहभागी झाले.

****

परभणी जिल्ह्यातल्या नागरिकांचा डेंग्यू, हिवताप, मलेरिया, चिकनगुनिया इत्यादी सारख्या साथीच्या रोगांपासून बचाव व्हावा, म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी, जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. ते काल याबाबतच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, ग्रामपंचायतींनी गप्पी मासे पाळण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून हौद बांधावा, नागरिकांनी पाणी उकळून प्यावं, नाल्या प्रवाही कराव्यात, आशाताई, अंगणवाडीताई, आरोग्य सेवकांनी लोकांमध्ये माहिती पोहोचवावी, असं आवाहन टाकसाळे यांनी केलं.

****

औरंगाबाद महानगरपालिका, लायन्स कल्ब आणि औरंगाबाद फर्स्टच्या वतीनं, शहरातल्या कैलास नगर स्मशानभुमीत उभारण्यात आलेल्या एलपीजी गॅस शवदाहिनी आणि नूतन इमारतीचं लोकार्पण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते काल झालं. पर्यावरण आणि प्रदुषणाच्या दृष्टीनं एलपीजी गॅस शव दाहिनी ही काळाची गरज असून, शहरातल्या इतर स्मशानभूमीतही टप्प्याटप्प्यानं गॅस शव दाहिनी सुरू करण्यात येणार असल्याचं, पाण्डेय यांनी यावेळी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, हा पाऊस खरिपातल्या पिकांना फायदेशीर ठरला आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही काल दिवसभर पावसाळी वातावरण होतं, पावसाची रिमझिम दिवसभर सुरू होती.

****

हवामान

राज्यात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुण्याच्या हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...