Saturday, 21 August 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 21.08.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२१ ऑगस्ट २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

भविष्य निर्वाह निधी - ईपीएफओच्या वर्गणीदारांमध्ये जून महिन्यात १२ लाख ८३ हजार जणांची भर पडली आहे. जून महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरून एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाल्याचं हे निदर्शक असल्याचं, श्रम आणि कामगार मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

शेतमाल आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थांच्या निर्यातीत एप्रिल ते जून दरम्यानच्या तिमाहीत ४४ पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या तिमाहीत एकूण निर्यात चार हजार ८१७ दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा - मेहकर महामार्गावर तढेगाव फाटा इथं झालेल्या भीषण अपघातप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत दिली जाणार आहे. मजुरांना घेऊन जाणाऱ्या टिप्परचा भीषण अपघात होऊन, १३ मजुरांचा मृत्यू झाला आहे.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं देशातल्या तरुणाईला तंदुरुस्त राहण्याचा संदेश देण्यासाठी, देशातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ७५ ठिकाणी, फिट इंडिया फ्रिडम रन आयोजित करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं नेहरु युवा केंद्राच्या वतीनं आज औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्य इमारतीपर्यंत, या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं.

****

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातल्या बामणी गावचे जवान सुधाकर शिंदे यांना छत्तिसगड मधल्या नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आलं. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शिंदे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे काल सलग दुसऱ्या वर्षी मुहर्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मातमी जुलूस, मजमा भरवण्यास पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. औरंगाबाद इथं शिया समाजानं कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत मजलिसचं आयोजन केलं होतं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 07 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...