Friday, 25 March 2022

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.03.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 March 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

पश्चिम बंगालमधल्या बीरभूम हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिले आहेत. बीरभूम जिल्ह्यातल्या रामपूरहाट मध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता, यात दोन मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या प्रकरणावरुन आज राज्यसभेत झालेल्या गोंधळामुळे कामकाजात व्यत्यय आला. भाजपच्या खासदार रुपा गांगुली यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. यावरून तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे सदनाचं कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं.

****

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवरचं प्रशासक तातडीनं हटवण्याची मागणी शिवसेनेनं आज विधानसभेत केली. बॅंकेवर सलग दहा वर्ष एकच प्रशासक असल्यानं तातडीनं निवडणूक जाहीर करावी, असं शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले. बँकेच्या कामकाजामध्ये झालेल्या अनियमिततेमुळे रिजर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार शासनाच्या सहकार विभागानं मे, २०११ मध्ये बँकेचं तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन करून विनंती केली असून, मुख्यमंत्री न्याय देतील असा विश्वास आबिटकर यांनी व्यक्त केला.

दम्यान, राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेधनाचा आज समारोप होत आहे.

****

देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८२ कोटी ५५ लाख मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात देशात लसीच्या २६ लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या. १२ ते १४ वयोगटातील ९० लाख सहा हजार मुलांना लसीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर दोन कोटी २२ लाख ६२ हजार ५८८ पात्र नागरीकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

दरम्यान, देशात काल नव्या एक हजार ६८५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ८३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ४९९ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २१ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम या वर्षी येत्या एक एप्रिलला नवी दिल्लीतल्या तालकटोरा मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमाची ही पाचवी आवृत्ती असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेतला ताणतणाव बाजूला ठेवून परीक्षेला सामोरे कसं जावं, याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववी ते बारावीचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ मार्चला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ८७वा भाग असेल.

****

बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीचा धर्म कुठेही पाहावयास मिळत नाही, असं उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र आघाडीचा धर्म पाळला जात असताना फक्त बीड मध्ये सातत्याने विरोधाला विरोध असं राजकारण सुरू आहे, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब घालू असं त्यांनी सांगितलं. शिव संपर्क अभियानांतर्गत लोकांना भेटून सरकारने केलेल्या विकास कामावर प्रतिक्रिया जाणून घेतल्या असत्या, काही लोकांनी समाधान व्यक्त केलं, काहींनी सूचना केल्या तर काही ठिकाणी तक्रारींचा सामना करावा लागला, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.

****

जालना-जळगाव या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या मध्य रेल्वेच्या पथकानं काल भोकरदन आणि राजूर इथं पाहणी केली. या भागातून कृषी मालाची होणारी आयात-निर्यात, प्रवासी वाहतूक, उद्योग, व्यवसाय याचा आढावा पथकानं घेतला. मुंबई मध्य रेल्वे विभागाच्या मुख्य परिचालन अधिकारी व्ही. नलिनी, मुख्य यातायात अधिकारी रवीप्रकाश गुजराल, मुकेशलाल यांचा या पथकात समावेश आहे.

****

पी.व्ही.सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय आणि पारुपल्ली कश्यप हे चार भारतीय खेळाडू स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. पी.व्ही.सिंधूचा सामना आज कॅनडाच्या मिशेल ली सोबत होईल तर श्रीकांतची लढत आज डेन अँडर्स अँटोनसेन सोबत होणार आहे. तर दुसरीकडे, एचएस प्रणॉयचा सामना पारुपल्ली कश्यपशी होणार आहे.

****

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आय पी एल २०२२ उद्यापासून सुरु होत आहे. यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांना यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळांनं नव्यानं लीगमध्ये सहभागी करून घेतलं आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर उद्या पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 06 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 06 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...