Sunday, 3 July 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 July 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधानसभा अध्यक्ष पदाची आज निवडणूक, शिवसेनेकडून राजन साळवी यांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून व्हीप जारी

·      अधिवेशनासाठी बंडखोर आमदार मुंबईत दाखल, भारतीय जनता पक्षाच्या आमदारांसोबत एकत्रित बैठक

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देण्याचा शिंदे गटाचा निर्णय

·      अमरावतीच्या उमेश कोल्हे व्यावसायिकाच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचा केंद्रीय गृह मंत्रालयाचा आदेश

·      अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौसेनेत अग्निवीरांच्या भरतीच्या नोंदणीला सुरुवात

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ९७१ रुग्ण, मराठवाड्यात ८९ बाधित

·      वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडथळा केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्ष कारावास आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा

आणि

·      पाचव्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंडच्या तीन बाद ५५ धावा,  भारताचा पहिला डाव ४१६ धावावर संपुष्टात

****

 

विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून मुंबईत प्रारंभ होत आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून म्हणजेच फेब्रुवारी २०२१ पासून विधानसभाध्यक्ष पद रिक्त आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत काल दुपारी संपली. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदार संघातून निवडून आलेले साळवी शिवसेनेचे उपनेते आहेत. साळवी यांचा अर्ज भरताना महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, तसंच सुनील प्रभू उपस्थित होते. भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत होत आहे. या निवडणुकीत मविआ उमेदवाराला मतदान करण्यासंदर्भात शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हीप अर्थात पक्षादेश जारी केला आहे.

दरम्यान या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकारी आमदारांच्या गटासह काल सायंकाळनंतर गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर  या आमदारांसह भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची एकत्रित बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना यावेळी मार्गदर्शन केलं. या अधिवेशनात नव्या सरकारच्या बहुमत प्रस्तावावर मतदान होण्याची शक्यता आहे. भाजपाकडे १२० आणि आमच्याकडे ५० आमदारांचं पाठबळ आहे, त्यामुळं १७० आमदारांच्या बळावर सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरुन हकालपट्टी केल्याप्रकरणी शिवसेनेविरुद्ध कायदेशीर लढा देणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. ते काल गोव्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेनेच्या विरोधात जाण्यासाठी नव्हे तर अन्यायाविरोधात जाण्यासाठी बंडाचं पाऊल शिंदे गटानं उचललं असून आजही शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्या गटाला प्रचंड आदर असल्याचं केसरकर यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी परवा स्पष्ट केलं होतं, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं, हे लोकशाहीला शोभणारं नाही असंही केसरकर म्हणाले.

****

अमरावती इथल्या उमेश कोल्हे या व्यावसायिकाच्या हत्येचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रीय तपास यंत्रणा- एनआयए कडे सोपवला आहे. ‘एनआयए’चं पथक शहरात दाखल झालं असून, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली तसंच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचीसुद्धा झाडाझडती घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक झाली आहे. हत्याकांडातील मास्टरमाईंड इरफान खानला पोलिसांनी नागपूरमधून अटक केली. या हत्येमागचा हेतू, आणि या हत्येशी काही आंतरराष्ट्रीय संस्थांचा संबंध आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा, अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांच्यासह इतर नेत्यांनी केली होती.

दरम्यान, सखोल चौकशीअंती ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून ही माहिती दिली. २१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ त्यांनी समाजमाध्यमांवर काही मजकूर टाकला होता, असं सांगण्यात आला आहे.

****

लोकपाल आणि लोकायुक्त बाबत सरकार जनजागृती करतांना दिसत नाही, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथं लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम २०१३ या कायद्याच्या पुस्तकाचं प्रकाशन हजारे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. हा कायदा परिणामकारक असून कार्यकर्त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. या पुस्तकाचं लेखन शिवाजी खेडकर यांनी केलं आहे.

****

बँकांमधे नोटा मोजण्यासाठी वापरली जाणारी यंत्रं व्यवस्थित काम करत आहेत की नाही याची तपासणी दर तिमाहीला करावी असं भारतीय रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. चलनी नोटांवरचा वैधतेचा तपशील नीट वाचता येईल असा स्वच्छ असला पाहिजे. दुर्दशा झालेल्या नोटा तसंच चलनातून बाद ठरवलेल्या मालिकेतल्या नोटा पुनर्प्रक्रीयेसाठी पाठवाव्या असंही रिझर्व बँकेनं सांगितलं आहे. अशा नोटा तसंच बनावट नोटा वेगळ्या काढण्याची क्षमता या यंत्रांमधे असावी. या यंत्रांची देखभाल दुरुस्ती नियमितपणे करण्याचे आणि तसं प्रमाणपत्र वेळोवेळी जारी करण्याचे निर्देश रिझर्व बँकेनं  जारी केले आहेत.

****

अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर आणि नौसेनेत अग्निवीरांच्या भरतीच्या नोंदणीला सुरुवात झाली असल्याची घोषणा रक्षा मंत्रालयानं केली आहे. या योजनेअंतर्गत लष्करात अग्निवीरांची भरती चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात येणार आहे. ४ वर्षात २५ टक्के अग्निवीरांना त्यांची योग्यता, इच्छा आणि शारिरीक पात्रतेच्या निकषांवर नियमित केलं जाणार आहे. उर्वरित ७५ टक्के अग्निवीर ११ ते १२ लाख रुपयांच्या सेवानिधी पॅकेजसाठी पात्र राहतील. पहिल्या ४ वर्षात अग्निवीरांना ३० ते ४० हजार रुपये मासिक वेतन दिलं जाणार आहे.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ९७१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ८२ हजार ३३४ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९३४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल तीन हजार ५१५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख १० हजार ९५३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २३ हजार ४४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ८९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद जिल्ह्यात ३१, उस्मानाबाद २३, जालना १८, लातूर ७, बीड ६ तर नांदेड जिल्ह्यात काल ४ नवे रुग्ण आढळल्याची नोंद आहे.

****

शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित प्रकरणाचा तपास बंद करण्याची परवानगी विशेष न्यायालयानं गुन्हे अन्वेषण विभागाला दिली आहे. युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ज्वेलर्स आणि पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड या सराफा ट्रेडिंग कंपनीच्या संचालकांवर ८४ कोटी ६ लाख रुपयांची फसवणूक आणि बनावट कागदपत्र सादर केल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आणि या रकमेपैकी काही रक्कम श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडकडे वळते केल्याचा आरोप आहे. पाटणकर यांच्यासह इतर आरोपींवर खटला चालवण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा अहवाल गुन्हे अन्वेषण विभागानं विशेष न्यायालयाला सादर केला. त्यानंतर हा अहवाल स्वीकारुन न्यायालयानं पाटणकर यांना दिलासा देत हा तपास बंद करण्याची परवानगी सीबीआयला दिली.

****

वाहतूक पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना काल अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोन वर्ष कारावास आणि ७ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. १९९९ मध्ये पोलीस जमादारानं कर्तव्यावर असताना एक ट्रक अडवून त्या ट्रकचालकाविरुद्ध कारवाई सुरु केली असता तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख गावंडे यांनी कारवाई करण्यावरुन त्या पोलीस जमादाराशी वाद घालत कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, या प्रकरणी गावंडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या प्रकरणी न्यायालयानं गावंडे यांना ही शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी गावंडे यांना ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

****

स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून राज्यात ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव” कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. गावपातळीपासून राज्यापातळीपर्यंत विविध कार्यक्रम आणि उपक्रम लोकसहभागातून होणार आहेत. स्वातंत्र्य संग्रामातल्या महत्त्वाच्या स्थळांचं आणि स्मारकांचं सुशोभन, राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, पदयात्रा, प्रभातफेऱ्या, सायकलयात्रा, अशा क्रीडास्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा कार्यक्रमांचा यात समावेश आहे.

****

अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तिदंत तस्करी प्रकरणी सहा तस्करांना काल अटक केली. औरंगाबाद महामार्गावर जेऊर टोलनाका इथं हस्तिदंतांची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, सापळा रचून पोलिसांनी या सहा तस्करांना अटक केली. व्यंकटेश स्वामी, महेश काटे, महेश मरकड, सचिन पनाले, विशाल पनाले, संकेत मजल अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांच्या ताब्यातून कोट्यवधी रुपयाचं हस्तिदंत जप्त करण्यात आलं आहे.

****

खासदार शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महासंघाच्या सूचनेनुसार राज्य कुस्तीगीर परिषदेने १५ तसंच २३ वर्ष वयोगटांतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन केलं नाही, त्यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. महासंघाने त्यावर संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देऊनही, राज्य कुस्तीगीर परिषदेनं दुर्लक्ष केल्यानं ही कारवाई केल्याची माहिती, भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी दिली.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या काल दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड संघानं तीन बाद ५५ धावा केल्या.

त्यापूर्वी काल सकाळी भारताने आपला डाव ७ बाद ३३८ धावांवरून पुढे सुरू केला. रवींद्र जडेजा १०४, मोहम्मद शमी १६, तर मोहम्मद सिराज दोन धावांवर बाद झाला. कर्णधार जसप्रित बुमराह १६ चेंडूत ३१ धावा करून नाबाद राहिला. भारताने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या. बुमराहने गोलंदाजीतही करिष्मा दाखवत इंग्लंड संघाचे तीन फलंदाज बाद केले.

****

विद्यार्थ्यांनी आपली रूची ओळखून आवडीच्या क्षेत्रातच करिअर करावं, असा सल्ला मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं मुप्टा शिक्षक संघटना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गंगापूर शाखेच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव इथं दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आज प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिध्द करू लागला आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी-सुविधा, योग्य मार्गदर्शन मिळालं तर निश्चितच ते मोठी झेप घेतल्याशिवाय राहणार नाहीत असंही चव्हाण म्हणाले.

****

 

पर्यावरणीय समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारनं सुरू केलेली प्लास्टिक बंदी ही आणखी एक स्वातंत्र्य चळवळ व्हावी, विद्यार्थ्यांनी या चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन पर्यावरणतज्ज्ञ आणि तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेश शेंडे यांनी केलं आहे. एक जुलैपासून देशभरात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काल पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर मानवी साखळी केली होती. या वेळी राजेश शेंडे बोलत होते.

****

लातूर जिल्हात मांजरा नदीच्या दुतर्फा येत्या दोन आठवड्यात १८ हजार वृक्षाची लागवड केली जाणार आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली. मांजरा नदीच्या काठावरील गावांचे सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, लातूर मधील महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य यांच्या बरोबर ग्रीन लातूर संकल्पाच्या नियोजन बैठकीत ते काल बोलत होते. यासाठी लातूर जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयांचा सहभाग घेऊन दहा किलोमीटरची मानवी साखळी तयार केली जाणार आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...