Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 August
2022
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०६ ऑगस्ट २०२२ सकाळी ७.१०
मि.
****
·
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाची स्थगिती
·
उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान;सायंकाळी
मतमोजणी
·
राज्यात कोविड संसर्गाचे नवे २ हजार
२४ रुग्ण;मराठवाड्यात ११५ नवे बाधित
·
रिझर्व्ह बँकेची रेपो दरात अर्ध्या टक्क्याने वाढ
·
वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसची देशभरात निदर्शनं
आणि
·
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत काल कुस्तीत तीन
सुवर्ण;पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर
****
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगानं स्थगिती दिली आहे. राज्य शासनाने जिल्हा
परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये सुधारणा करत, जिल्हा परिषदेच्या सदस्यपदांच्या
जागांच्या संख्येत बदल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात
आली आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांसह राज्यातल्या २५ जिल्हा परिषदा तसंच त्यांतर्गतच्या
२८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना काल प्रसिद्ध करण्यात येणार होती.
आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असून, यथावकाश पुढील आदेश
देण्यात येतील, असं, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे.
****
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी परवा
झालेल्या मतदानाची काल मोजणी झाली. भारतीय जनता पक्षाने एकूण २७१ पैकी ८२ ग्रामपंचायती
जिंकल्याचा दावा केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात
१९ पैकी ११, उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात पाच पैकी चार, बीड जिल्ह्यात
तीन तर लातूर जिल्ह्यात एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात
सात पैकी सहा जागांवर आमदार संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वात, तर सिल्लोड तालुक्यात
तीन ग्रामपंचायतींवर आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिंदे गटाने
विजय मिळवल्याचं वृत्त आहे.
****
शासनाने प्रदान केलेल्या जमिनीच्या
हस्तांतरण प्रक्रियेसाठी अधिमूल्य भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्यात येणार असल्याचं,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या
बैठकीत बोलत होते. भोगवटादार वर्ग दोनचं रुपांतर वर्ग एक मध्ये करण्याच्या सवलतीच्या
दराने, अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या तीन वर्षाच्या पहिल्या टप्प्याच्या कालावधीस,
कोविड पार्श्वभूमी विचारात घेऊन दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. हे शुल्क बाजारमूल्यावर
१० ते १५ टक्के एवढं आकारलं जातं, ते कमी करता येईल का याबाबत महसूल विभागाने अभ्यास
करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केली.
पश्चिम महाराष्ट्रात वारंवार
येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी, सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यात,
राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल तसंच पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी, महसूल विभागानं
जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले
आहे. मंत्रालयातल्या मुख्यमंत्री समिती कक्षात काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, पाटण तालुक्यात भुस्खलन
झालेल्या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी चार कोटी रूपये निधीची तरतूद करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. आंबेघर खालचे, अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव,
हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी या गावांचा यात समावेश आहे.
****
उपराष्ट्रपती
पदासाठी आज संसद भवनात सकाळी १० ते संध्याकाळी पाच
वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती
पदासाठी थेट लढत होणार आहे. संसदेच्या दोन्ही सदनातल्या
सदस्यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या
सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३
राजसभा सदस्य आणि १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. आज
मतदानाची वेळ संपताच संसदेतच मतमोजणी होईल.
सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या
बुधवारी १० तारखेला पूर्ण होत आहे.
****
संसद सत्रादरम्यान किंवा इतरही
सामान्य दिवसांत सक्तवसुली संचालनालयाचं समन्स खासदारांना टाळता येणार नाही, असं उपराष्ट्रपती
तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन
खरगे यांना परवा ईडीने चौकशीसाठी बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर, काल राज्यसभेचं कामकाज
सकाळच्या सत्रात स्थगित होऊन पुन्हा सुरू झाल्यावर, नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली.
सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेच्या विविध निर्णयांचा दाखला देत, आपराधिक प्रकरणांच्या
चौकशीसाठी खासदार आणि सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव करता येत नसल्याचं नमूद केलं.
खासदार असल्याचं कारण देत, अशी चौकशी टाळता येणार नसल्याचं नायडू यांनी सांगितलं.
****
खाद्य
तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपात केली जावी असे
निर्देश सर्व खाद्यतेल संघटनांना देण्यात आल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे.
खाद्यतेल उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी
करण्याचेही निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या
बैठकीत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं हे
निर्देश दिले.
****
राज्यात काल
कोविड संसर्ग झालेले नवे २ हजार २४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड
बाधितांची एकूण संख्या, ८० लाख ५५ हजार ९८९ झाली आहे. काल या संसर्गानं पाच रुग्णाचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या,
एक लाख ४८ हजार १२९ इतकी झाली असून, मृत्यूदर
एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल दोन हजार १९० रुग्ण बरे झाले. राज्यात
आतापर्यंत, ७८ लाख ९५ हजार ९५४ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक शून्य एक शतांश
टक्के झाला आहे. राज्यात सध्या ११ हजार ९०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ११५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या ३५, उस्मानाबाद ३२, औरंगाबाद १९, लातूर
१२, बीड दहा, तर जालना जिल्ह्यातल्या सात रुग्णांचा समावेश आहे
****
भारतीय रिझर्व्ह
बँकेनं रेपो दरात अर्धा टक्क्याने वाढ केली असून, रेपो दर पाच पूर्णांक चार
टक्के इतका झाला आहे. बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल
जाहीर केलेल्या द्वैमासिक पत धोरण आढाव्यात रेपो दरात वाढ
केल्याचं जाहीर केलं. २०२२-२३ या वित्तीय वर्षात महागाई दर सहा
पूर्णाक २३ शतांश टक्के तर आर्थिक विकास
वाढीचा दर सात पूर्णांक दोन दशांश
टक्के राहण्याचा अंदाज दास यांनी वर्तवला आहे.
****
वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील
जी.एस.टी आदी विषयावरून काँग्रेस पक्षानं काल ठिकठिकाणी
निदर्शनं केली.
नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल
गांधी यांच्या नेतृत्वात संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणाऱ्या आंदोलकांना
पोलिसांनी ताब्यात घेतलं. तत्पूर्वी वार्ताहरांशी बोलताना राहुल गांधी यांनी, देशात
हुकुमशाही सुरु झाली असून, लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला.
मुंबईत राजभवन
परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात
आली.
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ
कल्याण काळे आणि शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे
सर्व नेते, पदाधिकारी, यांनी या आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.
****
हिंगोली इथं
काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन
करण्यात आलं. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाड्यांमध्ये
दुचाकी वाहनं उभी करून बैलगाडा हाताने ओढण्यात
आला तसंच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
उस्मानाबाद इथं काँग्रेस पक्षाचे
जिल्हाध्यक्ष अॅड.कुलदीप उर्फ धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
आंदोलन करुन मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावर्षीचं पीककर्ज माफ करावं, जीएसटी कर
तात्काळ हटवण्यात यावा, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये
मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली. मागण्यांचा गांभीर्याने
विचार न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे
देण्यात आला आहे.
****
उस्मानाबाद नगर परिषद कार्यालयात
तिरंगा राष्ट्रध्वज विक्री केंद्राचं काल उद्घाटन झालं. मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण
येलगट्टे यांनी यावेळी बोलताना, या केंद्राचा लाभ घेऊन नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा
फडकवण्याचं आवाहन केलं.
****
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत
राष्ट्रध्वजाप्रती आदर बाळगत असतांनाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये गुणात्मक
वाढ करणं ही देशाप्रती खरी आदरांजली ठरणार असल्याचं मत, औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील
चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा
परिषदेत काल ग्रामपंचायतींना ध्वज वितरण, ध्वज कक्षाचं उद्धाटन करून, हर घर तिरंगा
उपक्रमाविषयी आणि ध्वजसंहिते विषयी प्रचार प्रसार करणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण
भागात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा उपक्रमाबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे
यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले……
‘‘हर घर तिरंगा यासाठीचं सुक्ष्म नियोजन माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये निश्चित झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी निविदा अंतिम केलेली असून पाच लाख ७७ हजार ग्रामीण भागातील घरं, नगरपालिकाहद्दीतील ४६ हजार घरं यासाठी हे ध्वज खरेदी केलेले आहेत आणि त्याचं वितरण सात तारखेपर्यंत पूर्ण होत आहे. २९ रुपयाला एक ध्वज या पद्धतीनं आता हा ध्वज आम्ही ग्रामपंचायतींकडे पोहचता करत आहोत. एकदा १३ तारखेला ध्वजा रोहण केलं तर घरांवरचा ध्वज हा १५ तारखेलाच सायंकाळी काढू शकतो.’’
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या
निमित्ताने अन्न आणि औषध प्रशासन औरंगाबाद कार्यालयाच्या वतीनं आजपासून ते १२ ऑगस्ट
दरम्यान अन्न सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये अन्नपदार्थांच्या
सुरक्षिततेबाबत विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
स्वातंत्र्याचा
अमृत महोत्सवानिमित्त परभणी जिल्ह्यात फळबाग लागवड अभियान राबवण्यात येत आहे. काल
सेलू तालुक्यातल्या ढेंगळी पिंपळगाव आणि दिग्रस बुद्रक इथं जिल्हाधिकारी आंचल
गोयल यांच्या हस्ते, नरेगा अंतर्गत कृषी विभागामार्फत फळझाडं लावण्यात आली. 'हर घर तिरंगा'
अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते शेतकऱ्यांना
तिरंगा झेंडा वितरीत करण्यात आला.
****
बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारतानं काल
आठव्या दिवशी कुस्तीत पदकांची लयलूट करत, तीन
सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली.
पुरुषांमध्ये
बजरंग पुनिया, दीपक पुनिया तर महिलांमध्ये साक्षी मलिक यांनी सुवर्ण पदक
पटकावलं. बजरंगनं ६५ किलो वजनी गटात कॅनडच्या लॅचलन मॅकलिन याचा, दीपकनं ८६ किलो वजनी
गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनाम याचा, तर साक्षीनं ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या गोलीनेज
गोंजालेजचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं.
अंशु मलिकनं ५७ किलो वजनी गटात
रौप्य पदक जिंकलं. मोहित ग्रेवालनं १२५ किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकरात, तर दिव्या
काकरननं ६८ किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं.
लॉन बॉल्स तसंच चारशे
मीटर रिले मध्ये पुरुषांचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या
शर्यतीत हिमा दास देखील अंतिम फेरीत दाखल झाली आहे.
या स्पर्धेत ९ सुवर्न, ८ रौप्य
तर ९ कांस्य पदक पटकावत पदकतालिकेत भारत पाचव्या स्थानावर पहोचला आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात काल
पाऊस झाला. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात काल सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. नदी
नाले दुथडी भरुन वाहिल्यानं शेतात पाणी घुसून पिकांचं मोठं नुकसान झालं.
हिंगोली जिल्ह्यात इसापूर धरणाचे
सात दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडून ११ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी पैनगंगा
नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा ९३ टक्क्याच्या वर पोहोचला आहे.
उस्मानाबाद
जिल्ह्यात सततच्या पावसामुळे तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. त्यामुळे उस्मानाबाद
शहरासह ढोकी, तडवळा, येडशी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
औरंगाबाद शहरात काल अधूनमधून
पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या.
दरम्यान,
राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment