Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 07 August 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७
ऑगस्ट २०२२ दुपारी १.०० वा.
****
उपराष्ट्रपती
जगदीप धनखड येत्या गुरुवारी म्हणजे ११ ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. काल त्यांच्या विजयाची
घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद
जोशी आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांची भेट घेतली.
****
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री तसंच वितरण प्रक्रिया सुलभतेनं
सुरु रहावी यासाठी देशभरातली टपाल कार्यालयं येत्या १५ तारखेपर्यंत सुटीच्या दिवशीही
सुरु राहणार आहेत. या काळात महाराष्ट्रातल्या १० हजार ९३९ टपाल कार्यांलयांमध्ये राष्ट्रध्वज
विक्री सुरु असेल. या कार्यालयांना ६ लाख १८ हजारांहून अधिक राष्ट्रध्वज विक्रीसाठी
उपलब्ध करुन देण्यात आले असून आतापर्यंत २ लाख ८६ हजारांहून अधिक राष्ट्रध्वजांची विक्री
या कार्यालयांमार्फत झाली आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला असलेली भावनिक छटा हा या अभियानाचा केंद्र बिंदू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाशी संबंधित राष्ट्रीय
समितीच्या तिसऱ्या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकानं
योगदान दिल्यामुळे तसंच या महोत्सवासाठी नेमेलेल्या राष्ट्रीय,राज्य आणि जिल्हा पातळीवरील समित्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनसामान्यांपर्यंत
नेण्यासाठी अहोरात्र कार्य केल्यामुळे हे अभियान यशस्वी होत असल्याचं पंतप्रधान मोदी
यावेळी म्हणाले.
****
कृषि आणि अन्न उत्पादनांच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या
पहिल्या तिमाहीत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा एप्रिल ते जून या ३ महिन्यात ७ अरब ४० कोटी ८० लाख अमेरिकन डॉलर्स मूल्याची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी
याच कालावधीत ५ अरब ६६ कोटी ३० लाख अमेरिकन डॉलर्स मूल्याची निर्यात
झाली होती.
****
बर्मिंगहॅम इथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस मध्ये सुवर्णपदक
पटकावणाऱ्या भाविना पटेलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भाविनाच्या
या यशामुळे देशातल्या युवकांना टेबल टेनिस खेळ्ण्याची प्रेरणा मिळेल असं सांगून मोदी
यांनी भाविनाला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टेबल टेनिस मध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या
सोनल पटेलचं ही मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात बोदली या गावात काल सायंकाळी वाघानं केलेल्या हल्ल्यात ७५ वर्षीय
मारोती पिंपरे या इसमाचा मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली. गुर चारण्यासाठी पिंपरे जंगलात गेले होते.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.
काल २४ लाखांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०६ कोटी
१८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरातल्या १०२ कोटी नागरिकांनी लसीची
पहिली तर ९३ कोटी ५४ लाख नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. तर
१० कोटी ५७ लाखांहून अधिक नागरीकांनी तिसरी वर्धक मात्रा घेतली असल्याचं केंद्रीय आरोग्य
मंत्रालयानं म्हटलं आहे.
१२ ते १४ वर्ष वयोगटातल्या ६ कोटी ८१ लाख बालकांचं आतापर्यंत लसीकरण झालं असल्याचंही
मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, देशात काल नव्या १९ हजार ४०६ कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची नोंद झाली, ४९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला, तर १९ हजार ९२८ रुग्ण बरे झाले.
****
हर
घर तिरंगा मोहिमेत सर्वांनी सहभागी होत आपल्या घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज
फडकवावा असं आवाहन आमदार अतुल सावे यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि आसावा ब्रदर्स वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं
औरंगाबाद इथल्या कलाग्राममध्ये आयोजित ‘स्टर्टअप आखाडा’ या कार्यक्रमाचं उद्धाटन आमदार
सावे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी आज ते बोलत होते. “स्टार्टअप आखाडा” म्हणजे वाणिज्य
शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या कल्पनांचे दालन उभारले असून
या माध्यमातून त्यांना संवाद कौशल्य, टीमवर्क, व्यवहार कौशल्य, मॅनेजमेंट आदी बाबींचा
वापर कसा करावा हे समजणार असल्याचं आमदार सावे यावेळी म्हणाले.
****
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत परभणी मध्ये विविध तालुक्यात एलईडी वाहनाच्या माध्यमातून
जाणीव जागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ गटविकास अधिकारी शिवाजी
कांबळे यांच्या हस्ते काल करण्यात आला.
//********//
No comments:
Post a Comment