Thursday, 11 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 11.08.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 11 August 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ११ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. तत्पूर्वी धनखड यांनी राजघाट इथं राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं.

****

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या दरहाल परिसरात लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी मारले गेले. आज सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. मात्र यात लषकराचे तीन सैनिक हुतात्मा झाल्याचं वृत्त आहे.

****

रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा, बहीण भावाच्या नात्यात प्रेमबंध अधिक दृढ करण्याचा दिवस आज साजरा होत आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या सणांच्या माध्यमातून आपण निसर्ग, मानवी नातेसंबंध आणखी दृढ व्हावेत‌, त्यातून आपण सर्व समृद्धीकडे वाटचाल करूया, असं मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. २५ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालेल. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत अधिवेशनाची रुपरेषा ठरवण्यात आली.

****

कोरोना काळात विमान तिकीटांच्या दरांवर लादलेले निर्बंध केंद्र सरकारनं हटवले आहेत. दैनंदिन मागणी आणि हवाई इंधनाच्या दरांचा काटेकोरपणे आढावा घेतल्यानंतर ३१ ऑगस्टपासून निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. कोविड विषयक दिशानिर्देश आणि इतर खबरदारीचं पालन करण्याच्या सूचना हवाई वाहतूक मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना दिल्या आहेत.

****

कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या १८ वर्षांवरील व्यक्तींना खबरदारीची मात्रा म्हणून कॉर्बेवॅक्स लसही आता घेता येणार आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर आवश्यक बदल केले असून, उद्यापासून सुविधा मिळेल, असं केद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. खबरदारीची मात्रा म्हणून सध्या उपलब्ध असलेल्या लसींबरोबरच कॉर्बेवॅक्सचा पर्यायही उपलब्ध असेल. त्यासाठी सध्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कसलाही बदल केलेला नाही, असं या पत्रात स्पष्ट केलं आहे. 

****

विविध वेबसाइट आणि अॅपच्या माध्यमातून कर्ज घेऊन ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं काही दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. यानुसार सर्व प्रकारच्या कर्जांचे व्यवहार कर्जदार आणि कर्जदात्यांच्या बँक खात्यातचं व्हावेत, यात कुठलाही त्रयस्थ पक्ष किंवा बँक खातं असून नये, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. याप्रकारच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं एका कृतीदलाची स्थापना केली होती, त्याच्या शिफारशी बँकेनं स्वीकारल्या आहेत.

****

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होण्याकरता तिरंगा ध्वज हवा असेल, तर आता तो टपाल कार्यालयातही मिळू शकेल. तिरंग्याचं शुल्क २५ रुपये असून, तो विनाशुल्क घरपोच पाठवला जाईल. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पोस्ट ऑफिस डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टल वरून देखील १२ ऑगस्टपर्यंत तिरंगा विकत घेता येईल, असं टपाल विभागानं कळवलं आहे.

****

जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर आयकर विभागानं छापेमारी केली. या छाप्यांमध्ये सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. एक ऑगस्टपासून आयकर विभागाची ही कारवाई सुरु होती.

****

मध्य रेल्वेच्या माजरी ते वणी दरम्यान रेल्वे पुलावरून पावसाचं पाणी वाहत असल्यामुळे पूर्णा - पाटणा एक्स्प्रेसच्या मार्गात आज तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ही रेल्वे वसमत-हिंगोली-वाशीम-अकोला-बडनेरा मार्गे वळवण्यात आली आहे. या बदलामुळे आज ही गाडी नांदेड, हिमायत नगर, सहस्त्रकुंड, किनवट, आदिलाबाद, वणी, माजरी आणि वरोरा रेल्वे स्थानकांवरून धावणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड - हुबळी तसंच नांदेड - तिरुपती या विशेष साप्ताहिक रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड - हुबळी ही गाडी १३, २० आणि २७ ऑगस्टला नांदेडहून सुटेल, तर नांदेड तिरुपती ही गाडी १५ आणि २२ ऑगस्टला नांदेडहून - सुटणार आहे.

****

हवामान

राज्यात १४ ऑगस्टपर्यंत कोकणात सर्वदूर पाऊस पडेल, मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहील, विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

//**********//

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...