Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
ओबीसी आरक्षणाबाबत पाच आठवडे यथास्थिती कायम ठेवण्याचे सर्वोच्च
न्यायालयाचे निर्देश.
·
नगराध्यक्ष तसंच सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याबाबत सुधारणा
विधेयक विधानसभेत मंजूर.
·
शंखी गोगलगायीमुळे झालेल्या नुकसानाबाबत विचारासाठी समिती स्थापन
करण्याची घोषणा.
·
शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांची महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी
गर्दी.
आणि
·
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बॉब्वेसमोर २९०
धावांचं आव्हान.
****
राज्यातील
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने
पाच आठवडे यथास्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच या संदर्भातल्या सुनावणीसाठी
विशेष पीठ स्थापन करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यावर
ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला, मात्र ज्या ९२ नगर
परिषदांची निवडणूक प्रक्रिया पूर्वीच सुरू झाली होती अशा नगरपालिकामध्ये हे आरक्षण
लागू होणार नाही असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याबाबत सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने पाच आठवडे स्थिती जशी आहे
तशी ठेवण्याचे निर्देश देत, विशेष पीठ स्थापन केलं जाईल असं सांगितलं आहे.
****
नगराध्यक्ष
आणि सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याबाबतची सुधारणा विधेयकं आज विधानसभेत मंजूर झाली.
लोकाभिमुख
आणि पारदर्शक कारभारासाठी लोकांमधून नगराध्यक्ष थेट निवडून येणं योग्य असून त्यांना
वाढीव अधिकार देण्याबद्दल विचार केला जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
विधानसभेत मांडली. या विधेयकांवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. दरम्यान, हे
विधेयक लोकशाहीला घातक असून सर्वसामान्य लोक इथे निवडून येऊ शकणार नाहीत, आर्थिक पाठबळ
आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मोकळं रान यामुळे मिळणार असल्यानं हे विधेयक मागं घेण्याची
मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या विधेयकाच्या चर्चेत केली.
शिवसेनेचे
भास्कर जाधव यांनी यावेळी बोलताना, या विधेयकात समाजाच्या हिताचं नेमकं काय याचं उत्तर
मिळत नाही, नगराध्यक्षांच्या हातात निरंकुश सत्ता देऊ नका अशी मागणी केली. तर या विधेयकासाठी
मुख्यमंत्र्यांवर बाहेरून दबाव आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
केला. अविश्वास ठराव, उपनगराध्यक्ष याबाबत विधेयकात काहीच उल्लेख नाही, कलम दहा नुसार
सभागृहाला बाजूला सारून स्वतःकडे अधिकार घेण्याची तरतूद या विधेयकात असल्याची टीकाही
चव्हाण यांनी केली.
****
दरम्यान,
ग्रामपंचायत हद्दीत जनतेमधून थेट सरपंच निवडून येण्याची तरतूद असणारं विधेयक सभागृहात
मंजूर करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या कारभारात स्थैर्य आणणं हा याचा मुख्य उद्देश आहे
असं ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. त्याआधी नगराध्यक्ष थेट निवडून येण्याच्या
विधेयकावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ हजार ग्रामपंचायतींनी थेट
सरपंच निवडून देण्याची मागणी केल्याचं सांगितलं.
****
ऊर्ध्व
गोदावरी प्रकल्पाच्या प्रस्तावाला लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता घेऊन
प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाईल, असं उपमुख्यमंत्री
तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. या प्रकल्पाचा प्रस्ताव
राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारशींसह शासनाकडे प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगितलं.
समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याबाबतही एक बैठक घेण्यात आली आहे. त्याबाबतचा जल आराखडा
तयार करण्यात आलेला असून त्याची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यात येत आहे. याबाबतचं
काम कालबध्द पध्दतीनं करण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
****
शंखी
गोगलगायीमुळें नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असून शेतीच्या नुकसानाबाबत
विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अब्दुल सत्तार
यांनी आज विधानसभेत सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत आणि इतरही काही
जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायी मुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान नेमकं
किती झालं आहे, नुकसान भरपाई किती द्यावी लागेल याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
केली जाईल. समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल, असं कृषी मंत्री
सत्तार यांनी सांगितलं.
****
मुंबई-
पुणे द्रुतगती महामार्गाच्या चौथ्या मार्गिकेचा विस्तार करण्याबाबत राज्य शासन विचार
करेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. एका लक्षवेधी
सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक
वाढली असून, या महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी इंटेलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट
सिस्टीम अंमलात आणली जाईल. यामुळे लेन सोडून वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तत्काळ
मिळेल असं त्यांनी सांगितलं. अपघातग्रस्तांना तातडीनं मदत मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करून यंत्रणा विकसित करण्यात येईल असं सांगून अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण आणि
जनजागृती मोहीम राबवण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.
****
राज्यातल्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्यासाठी लवकरच राज्य लोकसेवा
आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबवली जाईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी
आज विधान परिषदेत सांगितलं. राज्यातल्या सर्व २२ वैद्यकीय महाविद्यालयातील ही रिक्त
पदं तातडीनं भरण्यासाठी राज्य शासन महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिस कमिशन तयार करण्यासंदर्भात
गांभीर्यानं विचार करीत असल्याचंही महाजन म्हणाले.
****
ज्येष्ठ
कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण
विभाग -सीआयडीकडून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक -एटीएसकडे वर्ग करण्यात आला आहे. कॉम्रेड
पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर कोल्हापूर इथं १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोळ्या झाडण्यात
आल्या. उपचारादरम्यान पानसरे यांचं चार दिवसांनी २० फेब्रुवारी रोजी निधन झालं. या
प्रकरणी आतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. तर, दोन मुख्य आरोपी अद्याप फरार
आहेत. हत्येला सात वर्षे उलटूनही सीआयडीच्या विशेष तपास पथकाच्या तपासात अपेक्षित प्रगती
नसल्याने, हा तपास एटीएसकडे सोपवण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात
केली होती. त्यानुसार आज हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. एटीएसच्या पुणे शाखेकडून
तपास करण्यात येणार आहे.
****
शेवटच्या
श्रावणी सोमवारमुळे आज ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं
दिसून आलं.
नाशिकमध्ये
श्री त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. श्रावणी
सोमवारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असून काल सायंकाळपासून भाविक त्र्यंबकेश्वरला
येत आहेत. मध्यरात्रीपासूनच ब्रम्हगिरीच्या फेरीला प्रारंभ झाला.
हिंगोली
जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथंही आज शेवटच्या सोमवारनिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात
गर्दी केली. दर्शनासाठी पहाटे पासूनच एक किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रात्री एक वाजता नागनाथाची महापूजा करण्यात आली. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम सह
कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, मध्यप्रदेश या राज्यांतूनही भाविक मोठ्या
संख्येने दर्शनासाठी आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
औरंगाबाद
जिल्ह्यात वेरुळ इथं घृष्णेश्वर तसंच बीड जिल्ह्यात परळी इथं वैद्यनाथाच्या दर्शनासाठी
आज पहाटेपासूनच शिवभक्त मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
****
देशव्यापी
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१० लसमात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात सुमारे
दोन कोटी ७९ लाख पन्नास हजार लयीकरण सत्रातून २१० कोटी दोन लाख ४० हजार ३६१ लसमात्रा
टोचण्यात आल्या आहेत. १२ ते १४ वयोगटातल्या तीन कोटी ९९ लाखांहून अधिक किशोरवयीनांना
आतापर्यंत या लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
****
झिम्बॉब्वे
विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं यजमान संघाला विजयासाठी
२९० धावांचं लक्ष्य दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारतानं आठ बाद २८९ धावा केल्या. शुभमन
गिलच्या १३० धावांना इशान किशनच्या ५० आणि शिखर धवनच्या ४० धावांची साथ लाभल्यानं,
भारत ही धावसंख्या उभारू शकला. कर्णधार के एल राहुलनं आज ३० धावा केल्या. संजू सॅमनसच्या
१५ धावा वगळता, इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाहीत. अखेरचं वृत्त हाती आलं
तेव्हा झिम्बॉब्वेच्या चौदाव्या षटकात एक बाद ६१ धावा झाल्या होत्या. मालिकेत पहिले
दोन सामने जिंकून भारतानं मालिका यापूर्वीच जिंकली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातील जवळपास १३० ग्रामपंचातींच्या इमारतींचं बांधकाम महात्मा गांधी राष्ट्रीय
रोजगार हमी योजना - मनरेगा च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ.नीलेश गटणे यांनी ही माहिती दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. यासाठी मनरेगा आणि १५व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात येणार
आहे. या कामासाठी कुशल अकुशल कामगार आणि पंचयायत समिती गणावरती एक अधिकाऱ्याची नेमणूक
करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. बीओटी अर्थात बांधा, वापरा हस्तांतरीत करा
यामाध्यमातून काही ग्रामपंचायतींमध्ये आस्थापनासाठी गाळे काढण्यात येणार आहे. त्या
माध्यमातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्नही मिळणार असल्याचं गटणे यावेळी म्हणाले.
****
No comments:
Post a Comment