Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 August 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
यूपीआय
पेंमेंट ॲपच्या वापरासंबंधीचे नवे नियम आजपासून लागू
·
उपराष्ट्रपती
निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर
·
सत्ताकारणाचं
रुपांतर राष्ट्रकारण आणि समाजकारणात होणं आवश्यक-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं
प्रतिपादन-
·
लोकमान्य
टिळक तसंच अण्णाभाऊ साठे यांना सर्वत्र अभिवादन
आणि
·
प्रधानमंत्री
किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते वितरण
****
यूपीआय पेंमेंट ॲपच्या वापरासंबंधीचे
नवे नियम आजपासून लागू आले. सर्व्हरवरचा ताण कमी करून ऑनलाइन पेमेंटची कार्यक्षमता
वाढण्याच्या उद्देशानं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं हे नवे नियम लागू केले
आहेत. नव्या नियमांनुसार आता ग्राहकांना अशा ॲपवरून दिवसभरात आपल्या बँक खात्यातली
शिल्लक ५० वेळा तपासता येईल. याशिवाय आता ऑटो पेमेंटचे व्यवहार आता सकाळी १० वाजण्यापूर्वी, दुपारी
१ ते ५ आणि रात्री साडेनऊ वाजेनंतर केले जाणार आहेत.
बँकिंग कायदा सुधारणा अधिनियमही आजपासून
लागू झाला. हा कायदा यावर्षी १५ एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता.
****
विविध मुद्यांवर गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं
कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा
तास पुकारताच विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी
दोन वेळा आणि नंतर सोमवारपर्यंत स्थगित केलं.
राज्यसभेत विरोधकांनी दाखल केलेले ३०
स्थगन प्रस्ताव उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळून लावले. त्यानंतर सुरू झालेल्या गदारोळानंतर
कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
****
नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ७ ऑगस्टला निवडणुकीसाठीची
अधिसूचना जारी होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर ९ सप्टेंबरला
मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य
उपराष्ट्रपतींची निवड करतात.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त
तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात
आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली.
****
सत्ताकारणाचं रुपांतर राष्ट्रकारण आणि
समाजकारणात होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं
आहे. ते आज पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलत होते. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
अजित पवार, माजी
मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, तसंच लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्यासह अनेक
मान्यवरांच्या हस्ते गडकरी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र,
स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्काराला
उत्तर देतांना गडकरी म्हणाले –
बाईट - केंद्रीय मंत्री
नितीन गडकरी
देशात पैशाचा किंवा तंत्रज्ञानाचा अभाव नसून,
प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांचा
अभाव जाणवत असल्याचं, गडकरींनी
नमूद केलं. पुण्यात ५० हजार कोटी रुपयांची विकास कामं लवकरच करणार असल्याचं,
गडकरी यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलतांना, गडकरी यांच्या स्वभाववैशिष्ट्यांकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त
त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
दिल्ली इथं महाराष्ट्र सदनात सहायक
निवासी आयुक्त स्मिता शेलार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली. पुण्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते साहित्यरत्न, लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचं प्रकाशन करण्यात आलं.
अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या
वाटेगाव इथल्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेच्या बाबतीतले सर्व दावे इस्लामपूर न्यायालयानं
फेटाळून लावले आहेत. त्यामुळे इथं अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक
उभारण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला असून, यासाठी २५ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेडसह मराठवाड्यात
सर्वत्र अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं. बीड इथं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा
भाऊ साठे विकास महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात,
महिला समृद्धी योजनेतील लाभार्थ्यांना
कर्ज वाटप करण्यात आलं, तसंच
दहावी, बारावी
आणि पदवीधर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले.
****
भाषा राजाश्रीत असली तरी ती लोकाश्रीत
असली पाहिजे, संस्कृत
बोलचालीची भाषा व्हावी, याकरता
प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी
म्हटलं आहे. नागपूर इथं, कविकुलगुरू
कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभिनव भारती आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिसरात डॉ. केशव
बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचं लोकार्पण आज भागवत यांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी
उपस्थित होते. संस्कृत फक्त शासनाच्या ब्रीदवाक्यापुरतीच मर्यादित न राहता ती जनमानसात
रुजावी अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या
विसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. उद्या
उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते,
नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना २० हजार
५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल.
छत्रपती संभाजीनगर इथं,
पैठण रस्त्यावरच्या कृषी विज्ञान केंद्रात
या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. केंद्रप्रमुख ज्येष्ठशास्त्रज्ञ डॉ. दिप्ती
पाटगावकर यांनी ही माहिती दिली. या प्रसारणासोबत विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
केलं जाणार असून, याचा
सर्वांनी लाभ घेण्याचं आवाहन डॉ पाटगावकर यांनी केलं,
त्या म्हणाल्या –
बाईट - डॉ. दिप्ती पाटगावकर
****
जालना जिल्हा क्रीडा प्रबोधिनीतील अल्पवयीन
मुलींवरील अत्याचार प्रकरणी सखोल चौकशी तसंच दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही आमदार चित्रा
वाघ यांनी दिली आहे. आज जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची
बैठक घेतली. त्यानंतर क्रीडा प्रबोधिनीस भेट देऊन त्यांनी मुलींसोबत संवाद साधला. त्यानंतर
वार्ताहरांशी संवाद साधतांना, त्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. त्या म्हणाल्या –
बाईट – आमदार चित्रा वाघ
****
महसूल दिन आज साजरा होत आहे. छत्रपती
संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. महसूल कर्मचाऱ्यांनी
नोकरीचे कर्तव्य बजावत असतांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन समाजसेवा करावी,
असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
यांनी यावेळी बोलताना केलं. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी,
कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी
स्वामी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातही
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तेरा अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या
हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ इथल्या
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे बांधकाम आणि कार्यशाळेसाठी शासनातर्फे
पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कौशल्य विकास विभागानं याबाबतचा शासन
निर्णय जारी केला आहे.
****
क्रिकेट
भारत आणि इंग्लंड दरम्यान ओवल इथं सुरु
असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात आज दिवशी भारताचा पहिला डाव २२४ धावांवर संपुष्टात
आला. पहिल्या डावात इंग्लंड संघाच्या आतापर्यंत एक बाद १०९ धावा झाल्या आहेत. पाच सामन्यांच्या
मालिकेत इंग्लंडचा संघ दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
No comments:
Post a Comment