Sunday, 3 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी आज आणखी एका दहशतवाद्याला ठार केलं आहे. आतापर्यंत या चकमकीत एकूण तीन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून कारवाई सुरूच आहे. परवा शुक्रवारी रात्री आठ वाजता देवसरमधील अखलच्या जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर भारतीय लष्करानं शोधमोहिम सुरु केली. दरम्यान, गोळीबार करुन अंधाराचा फायदा घेत दहशतवादी जंगलात पळुन गेले होते.

****

जम्मु-काश्मीरमधील पवित्र अमरनाथ यात्रा आता नियोजित वेळेपुर्वीच म्हणजेच एक आठवड्यापुर्वीच स्थगित करण्यात आली आहे. खराब हवामान आणि जोरदार पावसामुळे बालताल आणि पहलगाम येथील दोन्ही यात्रा मार्गांची झालेली खराब स्थिती हे यामागचं कारण असल्याचं वृत्त आहे. येत्या नऊ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला ही यात्रा संपन्न होणार होती. जवळपास चार लाख भाविकांनी अमरनाथांचं दर्शन घेतल्याचं संबंधीत यात्रा मंडळानं कळवलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मुंबई इथं येत्या ५ ऑगस्टला मंगळवारी वरळी इथं होणार आहे. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारानं गजलगायक भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात २०२४ या वर्षातील चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान केला जाईल. तसंच, गेल्या वर्षीचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. यासह, छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली असून, सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव सोहळ्यात होणार आहे.

****

राज्यात आज अवयवदान पंधरवड्याला प्रारंभ झाला आहे. अवयवदान व्यापक समाज चळवळीचे पाऊल या अनुषंगानं राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनात राज्यभर हा उपक्रम राबवला जात आहे.

****

शैक्षणिक संस्था विशेषतः शाळांमधून ग्रंथालयांची अवस्था सुधारण्याची गरज, वाचक चळवळीतले कार्यकर्ते अभिजीत जोंधळे यांनी व्यक्त केली आहे. आज छत्रपती संभाजी नगर इथं, ग्रंथसखा श्याम देशपांडे पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. अंबाजोगाई परिसरातल्या शाळांमध्ये राबवलेल्या पुस्तक पेटी उपक्रमाबद्दल जोंधळे यांनी यावेळी माहिती दिली. प्रत्येकी सरासरी शंभर पुस्तकं असलेल्या पुस्तक पेट्यांची संख्या पावणे दोनशेपर्यंत पोहोचल्याचं जोंधळे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या गट गणांच्या प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर जवळपास ६६ आक्षेप आले आहेत. त्यामुळे आता या आक्षेपासंदर्भात परवा पाच ऑगस्टला विभागीय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. त्यानंतरच जिल्ह्यातील गट गण रचनेचं भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या ६१ गट आणि ११ पंचायत समित्यांमधील १२२ गणांसाठीची प्रारूप रचना जाहीर झाली होती. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतलेले आहेत. गावांची फेरबदल, भौगोलिक सलगतेकडे दुर्लक्ष, नैसर्गिक सीमा विचारात न घेणं, गट किंवा गांवापासूनचे अंतर आदींबाबत बहुतांश हरकती घेण्यात आलेल्या आहेत. हरकत घेणाऱ्याला स्वतः किंवा वकिलांमार्फत म्हणणे मांडता येणार आहे.

****

लंडन इथं सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी आज इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात १ बाद ५० धावांवरून खेळण्यास सुरुवात करेल. भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ३९६ धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. या मालिकेत इंग्लंडकडे २-१ अशी आघाडी आहे.

****

ब्राझीलमधील फोज दो इगुआचू इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्टार कंटेंडर स्पर्धेत भारताची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. मानुष शाह आणि दिया चितळे ही जोडी आज मिश्र दुहेरीचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री नऊ वाजता सुरू होईल. अंतिम फेरीत भारतीय जोडी जपानच्या सातोशी इडा आणि होनोका हाशिमोटो यांच्याशी लढेल. दुसरीकडे, काल झालेल्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताची अव्वल मानांकित जोडी मानव ठक्कर आणि मानुष शाह यांना जर्मनीच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला आणि ते उपविजेतेपदावर राहिले. यंदा पहिल्यांदाच दोन भारतीय दुहेरी संघ जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले.

****

राज्यात पावसानं विश्रांती घेतल्याची स्थिती आहे, सध्या मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचं वृत्त आहे. अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. मात्र, विदर्भात येत्या चार दिवसांत काही भागात मध्यम तसंच मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, यासोबतच लातूर, धाराशिव आणि हिंगोली भागांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 23 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 23 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...