Sunday, 3 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 August 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ ऑगस्ट २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधानांचं आवाहन, पीएम किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता जारी

·      स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा- सरन्यायाधीश भूषण गवई यांचं आवाहन

·      ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा राज्य शासनाकडून सत्कार-तीन कोटी रुपये पारितोषिक प्रदान

आणि

·      नांदेड इथं विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप

****

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते:

बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु केल्यानंतर विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र, सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण पावणे चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कालच्या कार्यक्रमात २० हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम, नऊ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काल या योजनेच्या विसाव्या हप्त्यापोटी दोन हजार कोटींहून अधिक रुपये प्राप्त झाले.

दरम्यान, सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी ही नवी योजना सुरु केल्याचं पंतप्रधान मोदी यांनी याच कार्यक्रमात सांगितलं. कृषी उत्पादनात पिछाडीवर असलेल्या जिल्ह्यांसाठी ही योजना असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्यदलाचं अभिनंदन करत, सैन्यदलाच्या स्वदेशी आयुधांची ताकद जगानं पाहिल्याचं नमूद केलं.

**

छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. यावेळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉ. दिप्ती पाटगावकर आणि इतर तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप पीक, एकात्मिक कीड व्यवस्थापन, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी, यासह विविध विषयांवर मागर्दर्शन केलं.

**

परभणी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं. खरिपाच्या पेरणीनंतर आता इतर कामांसाठी हा हप्ता मिळाल्याने थोडा हातभार लागेल, असं कातनेश्वर इथले शेतकरी विश्वंभर पांडे यांनी सांगितलं. ते म्हणाले,

बाईट-शेतकरी विश्वंभर पांडे

****

स्वत:सोबत समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आत्मसात करण्याचं आवाहन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं आहे. नागपूर इथं काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करतांना सरन्यायाधीश म्हणाले...

बाईट-सरन्यायाधीश भूषण गवई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला दिलेल्या संविधानानं देशात समतेचं राज्य निर्माण करण्याबरोबरच, समान संधी आणि प्रत्येक व्यक्तीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्था तयार करण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले..

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आणि राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार करण्यात आला. दिव्या देशमुखने जागतिक स्पर्धेत मिळवलेलं देदीप्यमान यश हे देशातील हजारो मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दिव्याला तीन कोटी रुपये बक्षीस सरकारकडून प्रदान करण्यात आलं. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही दिव्याला ११ लाख रुपये बक्षीस देण्यात आलं. खासदार क्रीडा महोत्सव समितीकडूनही तिचा सन्मान करण्यात आला.

****

राज्यातल्या खासगी बाजार समित्यांना दिलेल्या वन टाईम परवान्यांबाबत पुनर्विचार सुरु असून, केवळ शेतकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणाऱ्या खासगी बाजार समित्यांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाईल, असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल नंदुरबार इथं बोलत होते. आगामी काळात एक तालुका एक बाजार समिती’ हे धोरण राहणार असल्याचं रावल यांनी सांगितलं.

****

केंद्रीय निवडणूक आयोगानं मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या वार्षिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा, तसंच मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना यावर्षीपासून मानधन देण्यात येणार आहे.

****

वैद्यकीय पदव्यूत्तर प्रवेशासाठीची नीट-पीजी आज देशभरात विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा पर्यंत, जवळपास अडीच लाख विद्यार्थी, ही संगणक आधारित परीक्षा देणार आहेत.

****

राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील, एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या, निकाल राखून ठेवलेल्या, तसंच अनुत्तीर्ण विद्यार्थी यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार आता येत्या २३ ऑगस्ट रोजी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.

****

नांदेड इथं आयोजित विसाव्या समरसता साहित्य संमेलनाचा आज समारोप होणार आहे. काल ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरूवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, यांनी यावेळी केलेल्या भाषणात, समरसतेवर आधारित जीवनमूल्यांशी बांधिलकी मानणारी समाजनिष्ठ साहित्य निर्मिती ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री भिकुजी दादा इदाते, प्राध्यापक रमेश पांडव, पूर्व संमेलन अध्यक्ष प्राध्यापक शेषराव मोरे, गोविंद नांदेडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या दोन दिवसीय संमेलनात मुलाखती, परिसंवाद, कवी संमेलनं, चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

आकाशवाणीचे निवृत्त उद्घोषक मंगेश वाघमारे यांचं काल रात्री पुणे इथं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते यकृताच्या विकाराने आजारी होते. जालना जिल्ह्याच्या अंबड इथले मुळ रहीवासी असलेले वाघमारे यांनी छत्रपती संभाजीनगर केंद्रातही निवृत्तीपूर्वी सेवा बजावली होती. त्याआधी अनेक वर्ष ते पुणे आकाशवाणी केंद्रात कार्यरत होते. उत्कृष्ट संतूर वादक तसंच उत्तम निवेदक असलेले वाघमारे यांनी अनेक सांगितिक कार्यक्रमांत संवादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं संडे क्लब आणि देशपांडे परिवाराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्काराचं वितरण आज होणार आहे. अंबाजोगाई इथले वाचन चळवळीतले कार्यकर्ते अभिजित जोंधळे यांना आज हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या काल नाशिक इथं बोलत होत्या. अनेक ठिकाणी कारखान्यांनी रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारल्याचं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्ष वस्तूस्थिती तपासण्यासाठी पथकांनी अशा कारखान्यांना अचानक भेटी द्याव्यात, असं मुंडे यांनी सूचित केलं.

****

राज्यात आजपसून अवयवदान पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ही चळवळ राबवण्यात येणार आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.

****

परभणी शहरात यशस्विनी महिला मंचच्या वतीनं श्रावणमासा निमित्त महिलांना बेल वृक्ष रोपांचं वाटप करण्यात येत आहे. संपूर्ण महिनाभर हा उपक्रम सुरु राहणार असल्याची माहिती, यशस्विनी महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया पाटील यांनी दिली. सर्व इच्छुकांना ही रोपे दिली जाणार असल्याचं ते म्हणाल्या.

****

क्रिकेट

ओवल कसोटी सामन्यात भारताला जिंकण्यासाठी नऊ गडी बाद करण्याची, तर इंग्लंडला ३२४ धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा आजच्या चौथ्या दिवशी इंग्लंड आपल्या दुसर्या डावात एक बाद पन्नास धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात करेल. भारतानं आपल्या दुस-या डावात सलामीवीर यशस्वी जायस्वालच्या शतकी खेळीच्या जोरावर ३९६ धावा केल्या.

****

No comments: