Monday, 4 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी बिहारमधल्या मतदार यादी पुनरिक्षणासह इतर मुद्यांवरुन घोषणाबाजी सुरु केली. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासूनच लोकसभेत कामकाज सुरळीत होत नसल्याबद्दल बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधक जाणीवपूर्वक सदनाचं कामकाज होऊ देत नसल्याचं सांगत त्यांनी कामकाज स्थगित केलं. ते म्हणाले, 

बाईट-ओम बिर्ला

दरम्यान, राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोरेन यांना आदरांजली म्हणून राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. स्वतंत्र झारखंड राज्य निर्मितीसाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला होता. त्यानंतर ते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री झाले होते. केंद्रात काँग्रेसप्रणित मनमोहनसिंग सरकारमध्ये कोळसा मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. शिबू सोरेन हे ३८ वर्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबू सोरेन यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. सार्वजनिक जीवनासाठी समर्पित असलेले शिबू सोरेन हे समाजाच्या तळागाळातून वर आलेले नेते होते, त्यांनी आदिवासी समुदाय, गरीब आणि उपेक्षितांच्या सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, आजपासून झारखंडमध्ये तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. राज्यातली सर्व सरकारी कार्यालयं आज आणि उद्या बंद राहतील. शिबू सोरेन यांच्या निधनामुळे झारखंड विधानसभेचं पावसाळी अधिवेशनही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.

****

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर, सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी राबवलेल्या ऑपरेशन महादेव मध्ये मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं न्याय वैद्यक पुराव्यानं स्पष्ट झालं आहे. या तिघांच्या मृतदेहाचे फॉरेन्सिक अहवाल आणि इतर माहितीवरुन ही बाब समोर आली. हे तीन दहशतवादी लष्कर - - तय्यबा या संघटनेचे सदस्य होते. पहलगाम इथं हल्ला केल्यानंतर ते चिगाम हरवन जंगलात लपून बसले होते, असं तपासातून निष्पन्न झालं आहे.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरु झाली. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती येत्या बुधवारी आपला निर्णय जाहीर करेल.

****

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात औसा-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी दरोडेखोर टोळीला जेरबंद केलं. नागरिकांनी दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारील असलेली ही गँग पकडण्यात यश आलं. औसा -तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा गावा जवळ एक वाहन सारखं ये-जा करत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर सावध असलेल्या नागरीकांनी वाहन आडवून तपास केला असता त्यात आठ जण शस्त्रास्त्र आणि हत्यारासह आढळून आले. नागरिकांनी तात्काळ औसा आणि भादा पोलिसांना घटनेची माहीती दिली. पोलिसांनी आठ पैकी पाच जणांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून एकूण सात लाख ७१ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या कौटुंबिक न्यायालयात जवळपास ३२ वर्षानंतर वकील संघाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात १९९३ मध्ये कौटुंबिक न्यायालयाची सुरुवात झाली होती. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून नुकतंच यासंबंधीचं नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे. त्यानुसार, संस्थापक कार्यकारिणी निश्चित केल्याची माहिती वकील संघाचे सचिव वैभव आमले यांनी दिली. कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनंतकुमार गुंगे, उपाध्यक्ष नवनाथ सिनगारे, सहसचिव परमेश्वर पिसे यांच्यासह आणखी सात सदस्यांचा समावेश आहे. 

****

महादेवी ऊर्फ माधुरी हत्तिणीला वनतारा इथून परत पाठवावं अशी मागणी करत कोल्हापूरकरांनी काल नांदणी ते कोल्हापूर असा विराट मोर्चा काढला. भगवान महावीर जयंती उत्सव समिती, इचलकरंजी आणि समस्त जैन बांधवांच्या वतीनं माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या पदयात्रेत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नांदणी मठातली महादेवी हत्तीण वनतारा इथं पाठवल्यामुळे ग्रामस्थांसह कोल्हापुरातल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

****

 

No comments: