Tuesday, 5 August 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.08.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 August 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

बिहारमधल्या मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी, अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळातच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्ष जाणूनबुजून सदनाचं कामकाज होऊ देत नसल्याचं ते म्हणाले. घोषणाबाजी वाढत गेल्यानं त्यांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

राज्यसभेतही हेच चित्र पहायला मिळालं. कामकाज सुरु होताच बिहारच्या मुद्यावर चर्चेची मागणी विरोधी पक्षांनी लाऊन धरली. उपसभापती हरीवंश यांनी कामकाज होत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करत, विरोधकांना शांततेचं आवाहन केलं. मात्र गदारोळ सुरुच राहील्यानं राज्यसभेचं कामकाजही दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. केंद्रीय मंत्री तसंच एनडीएचे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यांच्या यशानंतरची ही पहिली बैठक असून, "हर हर महादेव" च्या घोषणांनी पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ऑपरेशन सिंदूर आणि महादेवच्या यशाबद्दल या बैठकीत अभिनंदनाचा ठराव एकमतानं मंजूर झाला, तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. चालू संसदीय अधिवेशनातल्या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात झाली.

****

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्निनांड मार्कोस ज्युनिअर पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. राष्ट्राध्यक्ष मार्कोस आणि पंतप्रधान मोदी यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होत असून, यावेळी अनेक संयुक्त सहकार्य करारांवरही स्वाक्षर्या केल्या जाणार आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत कर्तव्य पथावरील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी होणार्या सार्वजनिक कार्यक्रमात ते संबोधित करतील. कर्तव्य भवन हा सेंट्रल व्हिस्टाच्या माध्यमातून घडवलेल्या व्यापक परिवर्तनाचा एक भाग आहे. प्रशासनिक प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी आणि गतिमान प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सामान्य केंद्रीय सचिवालय इमारती उभारण्याची सरकारची योजना असून, त्यापैकी कर्तव्य भवन ही पहिली इमारत आहे. विविध मंत्रालयं आणि विभाग सध्या दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असून, त्यामुळे कामं पूर्ण करण्यात अडथळे येतात आणि त्याला विलंबही होतो. त्यामुळे हे विभाग आणि मंत्रालयं एकाच ठिकाणी आणण्यात आली आहेत.

****

राज्यातल्या ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना स्थायी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी "उमेद मॉल" उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून, त्याचा थेट फायदा महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला होणार आहे, असं ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल्स उभारण्यात येणार असून, त्यांची नाव लवकरच जाहिर केली जातील, असं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांसाठी पीएम श्री शाळा ही योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये बीड जिल्ह्यात हरिनारायण आष्टा इथल्या जिल्हा परिषद शाळेचा समावेश झाल्यानं शाळेचा कायापालट झाल्याचं दिसून येत आहे. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतची असलेली ही शाळा योजनेच्या लाभांमुळे अत्याधुनिक बनली आहे. या शाळेतले विद्यार्थी संगणक हाताळताना दिसत आहेत, तर शाळेला मिळालेल्या एस्ट्रॉनॉमी लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रातली माहिती मिळत आहे. या सुविधांमुळे या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होताना दिसत असल्याचं, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके यांनी सांगितलं.

****

मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहिम राबवली जात आहे. लंपी आजार संसर्गजन्य असल्यानं त्याच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचं लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

रत्नागिरीतल्या हातखंबा-निवळी परिसरात गेल्या दोन महिन्यांमध्ये गॅस टँकरचे चार अपघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विशेष बैठक घेतली. गॅसची वाहतूक करणाऱ्या टँकर्सचा कमाल ताशी वेग २० किलोमीटर असावा असं सांगत त्यांनी, क्षमतेपेक्षा जास्त भार नेणाऱ्या, तसंच मद्यपान करून आणि मोबाइलचा वापर करत वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचंही सूचित केलं.

****

No comments: